लातूर- बँक आणि सावकारांचे कर्ज, अपुरा पाऊस, नापिकी आदी कारणांनी त्रस्त झालेल्या लातूर तालुक्यातील हरंगूळ (खु.) येथील ५५ शेतक-यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आत्महत्या करण्यास परवानगी देण्याची मागणी केली आहे. या शेतक-यांनी मंगळवारी जिल्हाधिकारी पांडुरंग पोले यांच्याकडे या मागणीचे निवेदन दिले. ते मुख्यमंत्र्यांकडे पाठविले जाईल.
निवेदनात म्हटले आहे की, जनावरांसाठी चारा आणि पिण्यासाठी पाणी नाही. धान्य नाही, खते-बियाणे घेण्यासाठी पैसे नाहीत. मुलांचा खर्च झेपत नसल्याने त्यांच्या शिक्षणाचा खोळंबा होतोय. शिल्लक काहीच नसल्याने पत्नीच्या गळ्यातील मंगळसूत्र विकून प्रपंच भागवावा लागत आहे. त्यामुळे सरकारने मदत करावी, अन्यथा आत्महत्या करण्यास परवानगी द्यावी. निवेदनावर प्रकाश झुंजे पाटील, विश्वनाथ होळकर, शिवनारायण धूत, राजेंद्र सांडूर, सोमनाथ गावकरे, लक्ष्मण मुळगावे आदींच्या सह्या आहेत.