आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हक्काच्या पाण्यावर डल्ला- नगरची दांडगाई सुरूच; 2 TMC पाणी पळवले !

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
पैठण - जायकवाडीसाठी सोडलेल्या निळवंडेच्या २ हजार क्युसेक पाण्याची आवक गेल्या २४ तासांत ओझर बंधाऱ्याच्या डाव्या व उजव्या कालव्यातून इतरत्र वळवण्यात आल्याची बाब गुरुवारी समोर आली. जायकवाडीत २००० क्युसेकने येणारे पाणी आता ४०० क्युसेकवर आले असून २.२५ टीएमसी पाणी येणे बाकी असल्याची माहिती शाखा अभियंता अशोक चव्हाण यांनी दिली.

जायकवाडीमध्ये १ हजार ८४४ क्युसेकची आवक होत असताना निळवंडेची आवक वळवली गेल्याने आता आवक थेट चारशे क्युसेकवर आली आहे. सध्या ओझरच्या डाव्या कालव्यातून ७०३ क्युसेक व उजव्या कालव्यातून २०० क्युसेकने जायकवाडीच्या हक्काचे पाणी वळवण्यात आले आहे मात्र, ही आवक कमी असल्याने यापुढे जायकवाडीत विशेष वाढ होणार नसल्याचे पाटबंधारे विभागाच्या वतीने सांगण्यात आले.
रविवारी, १ नोव्हेंबरला जायकवाडीमध्ये मुळा, दारणा, गंगापूर व प्रवरातून पाणी सोडण्यास सुरुवात झाली; परंतु आजपर्यंत या धरणांतून १०.३५ टीएमसी पाणी सोडले गेले आहे. आणखी २.२५ टीएमसी पाणी सोडले जाणे बाकी असले तरी, हे पाणी ओझर बंधाऱ्यातून वळवण्यात आल्याने पाणी येण्याची शक्यता कमी आहे. गंगापूरमधून १.३६ टीएमसी, प्रवरातून ६.५० टीएमसी, दारणातून ३.२४ टीएमसी, मुळातून १.७४ टीएमसी पाणी सोडले गेले. मात्र, सध्या प्रवराच्या समूहापैकी निळवंडेची आवक सुरू होती. मात्र, बुधवारपासून हे पाणी वळवण्यात आल्याने दोन टीएमसी पाण्याचा फटका बसणार आहे. आजपर्यंत केवळ ६.४३ टीएमसी पाणी जायकवाडीत आले. या प्रकल्पात किती पाणी येईल, याचा काही अंदाज येत नाही.
पाणीसाठा ११.२० %
औरंगाबाद, जालना, पैठणसह ४०० गावांची तहान भागेल यासाठी १२.८४ टीएमसी पाणी नगर, नाशिक जिल्ह्यांतील धरणातून सोडण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. १ नोव्हेंबरपासून यापैकी जायकवाडीमध्ये आजपर्यंत ६.४३ टीएमसी पाणी आले आहे. जायकवाडीचा पाणीसाठा ११.२० टक्क्यांवर आला आहे.

- हे पाणी येण्यापूर्वी जायकवाडीचा पाणीसाठा ४.३३ टक्के होता.
- यात नवीन पाणी आल्याने ३ फूट पाण्याची वाढ झाली असून हे पाणी पिण्यासाठी वर्षभर पुरेल, असे पाटबंधारे विभागाने म्हटले आहे.
हक्काचे पाणी घेणारच
जायकवाडीच्या हक्काचे पाणी ही पश्चिम महाराष्ट्रातील पुढाऱ्यांच्या मदतीने इतरत्र वळवण्यात येत आहे, ही गंभीर बाब आहे. अधिकाऱ्यांच्या मिलीभगतमुळे असे प्रकार होत आहेत. जे २.२५ टीएमसी पाणी येणे बाकी आहे. ते आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाहीत.
-संदिपान भुमरे, आमदार.
अधिकाऱ्यावर आता गुन्हे दाखल करा
जायकवाडी धरणातील पाणी शेतीला देणे बंद असताना जायकवाडीत येणारे पाणी पळवले जात आहे. त्यामुळे पाणी पळवणाऱ्या भागातील दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करावेत, मागणी आम्ही करणार आहोत.
विजय गोरे, तालुकाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस, पैठण.
शासनाने यात लक्ष घालावे
आम्हाला पिण्यासाठी जायकवाडीत हक्काचे पाणी सोडले. परंतु ओझरच्या दोन्ही कालव्यातून पाणी पळवण्यात येत असल्याने हा आमच्यावर अन्याय आहे. शासनाने लक्ष घालावे.
- प्रकाश लबडे, शेतकरी, मुधलवाडी.
ही बाब गंभीरच
पश्चिम महाराष्ट्रातील ओझरच्या बंधाऱ्यातून पाणी शेतीसाठी पळवले ही गंभीर बाब आहे. हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला जात आहे. आमचे पंप काढण्यास भाग पाडले.त्यांनी पाणी वळवण्याचा प्रयत्न सुरू केला ही बाब गंभीरच आहे. -साईनाथ सोलाट, सरपंच.