आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोळ्याला ६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले; नापिकीला कंटाळून उचलले पाऊल

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - दुष्काळाने होरपळलेल्या मराठवाड्यातील शेतकरी आत्महत्येचे सत्र थांबता थांबेना. नापिकी आणि कर्जाला कंटाळून ६ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. जालना जिल्ह्यात तर तीन शेतकऱ्यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली. यामुळे पोळा सणावर दु:खाचे सावट पसरले आहे. विठ्ठल नागोराव व्यवहारे (५८, नायगाव) व उद्धव माणिकराव देशमुख (४५, देवगाव खवणे, दोन्ही ता. मंठा), तर दादाभाऊ भानुदास पाचुंदे (५५, पाथरवाला खु., ता. अंबड) अशी जालन्यातील तिघा मृत शेतकऱ्यांची नावे आहेत.

विठ्ठल व्यवहारे (जालना)
अवघी दीड एकर कोरडवाहू शेती होती. तसेच दोन मुली असून दोघींचे लग्न झालेले आहे. दरम्यान, दुसऱ्याकडून पैसे घेऊन मुलीचे लग्न लावले होते. यातच दोन वर्षांपासून सततची नापिकी, कर्जाची वाढती रक्कम यास कंटाळून अखेर विठ्ठल यांनी राहत्या घरात शनिवारी सकाळी ११ वाजता गळफास घेऊन आत्महत्या केली. राेहिदास व्यवहारे यांनी दिलेल्या माहितीवरून परतूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. तपास जमादार जाधव करत आहेत.

उद्धव देशमुख (जालना)
शेतातील झाडाला गळफास लावून शनिवारी रात्री आत्महत्या केल्याची माहिती त्यांची पत्नी मंगल यांनी परतूर पोलिस ठाण्यात दिली आहे. उद्धव यांच्याकडे फक्त दीड एकर शेती आहे. यावरच त्यांचे घर चालत होते. मृताच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी आहे. याप्रकरणी परतूर पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नांेद करण्यात आली आहे. पुढील तपास जमादार जाधव करत आहेत.

दादाभाऊ पाचुंदे (जालना)
यांनीही राहत्या घरातच शनिवारी पहाटे ४-५ वाजेच्या सुमारास गळफास घेतला. दादाभाऊ यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली व मुलगा आहे. दोन्ही मुलींचे लग्न झालेले असून मुलगा औरंगाबाद येथे कामावर आहे. दरम्यान, दादाभाऊ यांच्याकडे एक एकर शेती असून पाऊस न झाल्यामुळे त्यांनी पेरणीच केली नव्हती.

शेतकरी महिलेने विष प्राशन केले
नांदेड - किनवट तालुक्यातील टेंभी रायपूर तांडा येथील मैनाबाई रामचंद्र पवार (५०) या महिलेने कर्ज व नापिकीला कंटाळून शुक्रवारी मध्यरात्री विष पिऊन आत्महत्या केली. मैनाबाईला ५ एकर शेती आहे. तिने बँकेकडून ५० हजारांचे कर्ज घेतले. त्या कर्जाचे पुनर्गठन झाले नसल्याने तिला नवीन कर्ज मिळू शकले नाही. त्यातच यावर्षी पावसाने दगा दिल्याने शेतातील पीकही नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. यामुळे हताश झालेल्या मैनाबाईने शुक्रवारी रात्री ११ वाजताच्या सुमाराला घरातच विष प्यायले. तिला तातडीने मांडवी येथील शासकीय रुग्णालयात नेण्यात आले; परंतु रात्री १२ वाजता ती मरण पावली. मैनाबाईला दोन विवाहित मुले आहेत. याप्रकरणी मांडवी पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.

पतीचीही आत्महत्या
मैनाबाईचे पती रामचंद्र पवारनेही तीन वर्षापूर्वी कर्ज व नापिकीला कंटाळून विष पिऊन आत्महत्या केली. त्याच मार्गाने मैनाबाईनेही आपली जीवनयात्रा संपवली.

गोरेगाव : एसबीएच बँकेचे कर्ज फिटेना
हिंगोली जिल्‍ह्यातील सेनगाव तालुक्यातील गोरेगाव येथे जनार्दन तुळशीराम खिल्लारी (३५) या शेतकऱ्याने कर्ज आणि नापिकीला कंटाळून आत्महत्या केली. शुक्रवारी रात्री त्याने राहत्या घरी विष प्राशन केले होते. रात्रीच प्रथम गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल करण्यात आले. या ठिकाणी प्रथमोपचार केल्यावर येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यासाठी घेऊन येत असताना रात्री ११ च्या सुमारास मृत्यू झाला. याबाबत गोरेगाव पोलिसांत अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत शेतकऱ्याच्या नावे साडेतीन एकर शेती आहे. तसेच त्याच्याकडे एसबीएच बँकेचे ५० हजारांचे कर्ज आहे. त्याच्या पश्चात पत्नीसह मुलगा, मुलगी आणि आई-वडील असा परिवार आहे.
काकडहिरा : तीन महिने पाऊसच बरसला नाही
बीड जिल्ह्यात एकीकडे पोळा सणाच्या तयारीत शेतकरी असताना पाटोदा तालुक्यातील काकडहिरा येथे शनिवारी पहाटे एक वाजता बाबू पंढरी जायभाये (५५) या कर्जबाजारी शेतकऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यामुळे काकडहिरा गावावर पोळ्याच्या दिवशी शोककळा पसरली आहे. काकडहिरा येथील शेतकरी बाबू पंढरी जायभाये यांना १ हेक्टर ४६ आर जमीन असून त्यांनी सेवा सहकारी सोसायटीकडून १२ हजार रुपयांचे कर्ज घेतले होते. यंदा खरीप हंगामात जवळपास तीन महिने पाऊसच झाला नाही. दुष्काळी परिस्थिती, कर्जबाजारीपणा व नापिकीमुळे जायभाये यांनी शनिवारी पहाटे एक वाजता स्वत:च्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली.