आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिक्षक पात्रता परीक्षेसाठी राज्यातून सहा लाखांहून अधिक नोंदणी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बीड - शिक्षक पात्रता परीक्षेसाठी (टीईटी) राज्यातून 6 लाख 26 हजार 82 उमेदवारांनी नोंदणी केली असून 92 हजार उमेदवार दोन्ही परीक्षा देणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.
15 डिसेंबर रोजी होणा-या परीक्षेच्या अनुषंगाने ‘गुरुजी पात्र व्हा, पण नोकरी मागू नका’ या मथळ्याखाली दै. ‘दिव्य मराठी’ने वृत्त दिल्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षेबाबत विविध प्रतिक्रिया उमटल्या आहेत. या परीक्षा कशासाठी असा सूर एकीकडे असताना दुसरीकडे अशा परीक्षेतून लायक शिक्षक समाजाला मिळतील व गुणवत्ता वाढेल, अशा प्रतिक्रिया अनेकांनी व्यक्त केल्या आहेत.
संयुक्त प्रश्नपत्रिका मिळावी : शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका कशी असेल याबाबत इंग्रजी माध्यमांतून दहावी-बारावी उत्तीर्ण होणा-या उमेदवारांमध्ये संभ्रम असून या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरूप संयुक्त असावे, अशी मागणी होत आहे.
राज्य लोकसेवा आयोग व केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत एकच; परंतु संयुक्त प्रश्नपत्रिका असते. त्यामुळे परीक्षार्थींना परीक्षा देणे सुलभ ठरते. त्याचप्रमाणे शिक्षक पात्रता परीक्षेची प्रश्नपत्रिका स्वतंत्र देण्याऐवजी मराठी वा मातृभाषा तसेच इंग्रजी भाषेत संयुक्त द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे. परीक्षा सुलभ होण्यासाठी राज्य शिक्षण परिषदेने याबाबत निर्णय घेण्याची मागणी भावी शिक्षक अशोक माने यांनी केली.
परीक्षेच्या वेळी गोंधळ नको : केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या धर्तीवर ही परीक्षा होत आहे; परंतु या आधी झालेल्या केंद्रीय शिक्षक पात्रता परीक्षेच्या नियोजनात औरंगाबाद येथे
मोठा गोंधळ उडाला होता. तो टाळण्यासाठी राज्य शिक्षण परिषदेने आतापासून नियोजन करावे. तसेच पर्यवेक्षकांना परीक्षा पद्धतीचे आवश्यक ते प्रशिक्षण दिले, तर असे प्रकार टाळता येतील.
प्रकाशकांची चांदी
शिक्षक पात्रता परीक्षेच्या घोषणेपासून अभ्यासासाठी पूरक मार्गदर्शक पुस्तक प्रकाशक व विक्रेत्यांची चांदी होत आहे. विषयवार स्वतंत्र पुस्तके प्रकाशित करण्याऐवजी संयुक्त पुस्तके काढली आहेत. त्यामुळे गरज नसताना विद्यार्थ्यांना भुर्दंड बसत आहे. एका पुस्तकाची किंमत चारशे रुपयांपासून पुढे आहे. आधी परीक्षा शुल्कातून शासनाची तिजोरी भरली, आता पुस्तक प्रकाशक गल्ला भरू लागल्याचे काही भावी शिक्षकांनी सांगितले. दरम्यान, बाजारात शिक्षक पात्रता व अन्य परीक्षेसंबंधी 15 ते 17 प्रकाशकांची पुस्तके उपलब्ध आहेत. त्यापैकी पाच-सहा प्रकाशकांच्या पुस्तकांना मागणी असल्याचे सनीज् क्लासेसचे प्रा. सुनील राऊत यांनी सांगितले.
गुणवत्ता पुढे येईल
बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकारांतर्गत शिक्षकांसाठी किमान शैक्षणिक व व्यावसायिक अर्हतेबरोबर शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य केल्याने या परीक्षेतून गुणवंत पुढे येतील. शिक्षक होण्यास लायक असणा-यांना संधी आहे. आधी अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांचा प्रश्न सोडवावा लागेल.
कल्पना जायभाये, भावी शिक्षक
15 नोव्हेंबरपर्यंत शिक्षणाधिका-यांकडे हार्ड कॉपी सादर करावी. तसेच अपात्र अर्जांसंबंधी, अस्वीकृत अर्जांसंबंधी व तक्रारींबाबत 17 नोव्हेंबरपर्यंत निवेदन सादर करता येईल. जिल्हा परिषद कन्या शाळेत स्वीकृती कक्ष आहे. कक्षाचे प्रमुख प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी सुखदेव सानप आहेत.
भास्कर देवगुडे, सचिव, शिक्षक पात्रता परीक्षा कक्ष, बीड.