आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 64 Farmers Took Advantage, In The Second Phase, 100 Proposals

अन् सावकाराकडे तारण ठेवलेले सोने मिळाले परत, ६४ शेतकऱ्यांना लाभ

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना- बाजीउम्रद येथील शेतकरी रवींद्र लोखंडे यांनी वर्षभरापूर्वी खासगी सावकाराकडून कर्ज घेऊन टोमॅटोची लागवड केली. परंतु दुष्काळाने टोमॅटोचे उत्पादन घटले. शिवाय बाजारात दरही चांगला मिळाला नाही, त्यामुळे तारण ठेवलेले सोने सोडवायचे कसे? हा प्रश्न सतावत असतानाच परवानाधारक सावकारांकडील कर्जमाफीचा निर्णय झाला. लोखंडे यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज केला व त्यांचा प्रस्ताव मंजूरही झाला. या योजनेत पहिल्या टप्प्यात तालुक्यातील ६४ शेतकऱ्यांना लाभ मिळाला.
जिल्ह्यात गेल्या चार वर्षापासून दुष्काळी परिस्थिती असल्याने अनेक शेतकरी कर्जबाजारी झाले आहेत. शेतकऱ्यांना या संकटातून दिलासा देण्यासाठी राज्य सरकारने परवानाधारक सावकारांकडून शेतकऱ्यांनी घेतलेले कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला. त्याचा लाभ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना झाला. या योजनेतून पहिल्या टप्प्यात जालना तालुक्यातील ६४ शेतकऱ्यांचे ९ लाख रुपये माफ झाले आहेत. यात काहींनी सोने तर काहींनी जमीन, घर परवानाधारक सावकारांकडे तारण ठेवलेे होते. या योजनेत त्यांचे प्रस्ताव मंजूर झाल्याने शेतकऱ्यांच्या वस्तू व मालमत्तेचे कागदपत्र सहायक निबंधक सहकारी संस्था तालुका कार्यालयातर्फे परत करण्यात आले.
आता १०० शेतकऱ्यांचा प्रस्ताव
दुसऱ्या टप्प्यात तालुक्यातील १०० शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचे प्रस्ताव जिल्हा निबंधक कार्यालयाकडे पाठवले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखालील समितीत यावर निर्णय होईल. शेतकऱ्यांनी परवानाधारक सावकारांकडून घेतलेल्या १८ लाख रुपयांचा प्रस्ताव देण्यात आला आहे. - संजय भालेराव, सहायक तालुका उपनिबंधक
आत्मिक समाधान देणारा क्षण
^शासनाच्या या योजनेतून परिपूर्ण प्रस्ताव दिलेल्या शेतकऱ्यांचे सावकारांकडील कर्ज माफ करण्यात आले.रुक्मिणीबाई लोखंडे यांच्याप्रमाणेच अनेक महिलांनी परवानाधारक खासगी सावकाराकडे सोने तारण ठेवले होते.हे सोने परत घेताना त्यांच्या डोळ्यात अश्रु दाटून आले. माझ्यासाठी हा खऱ्या अर्थाने आत्मिक समाधान देणारा क्षण होता.
डॉ.अशोक खरात, जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था जालना.
योजनेचा लाभ झाला
सावकाराकडे ठेवलेले सोने सोडवून घेण्यासाठी मुलाची तडजोड सुरू होती. याचवेळी आम्हाला शासनाच्या या योजनेची माहिती मिळाली,त्यानुसार आम्ही सर्व कागदपत्रे देऊन प्रस्ताव तयार केला व आमच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली. त्यामुळेच वर्षभरापूर्वी सावकाराकडे ठेवलेली एकदाणी परत मिळू शकली. शासनाच्या या योजनेचा लाभ मिळाल्याने आनंद वाटला.
रुक्मिणीबाई नाथा लोखंडे, बाजीउम्रद