आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

10 दिवसांत तिसरा अपघात; 17 जणांनी गमावला जीव; कुणाचे मातृत्व तर कुणाचे पितृत्व हरवले

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूरकडे प्रवाशी घेऊन जाणा-या क्रूझर गाडीचा पहाटे साडेचार वाजता अपघात झाला आहे. - Divya Marathi
लातूरकडे प्रवाशी घेऊन जाणा-या क्रूझर गाडीचा पहाटे साडेचार वाजता अपघात झाला आहे.

लातूर- दहा दिवसांपूर्वी निलंगा-औसा रस्त्यावर सात, याच रस्त्यावर सोमवारी झालेल्या अपघातात ३ जणांना जीव गमवावा लागल्यानंतर लागोपाठ दुसऱ्याच दिवशी मंगळवारी झालेल्या अपघातात आणखी सात जणांचे प्राण गेले. रस्त्यावरचे खड्डे, चालकांचा निष्काळजीपणा आणि घाई-गडबड यामुळे हे अपघात झाले. यामुळे कुणाचे मातृत्व तर कुणाचे पितृत्व हरवले, तर कुणाचे पोटचे मूल हरवले.   

 
जिल्ह्यातील काही दिवसांपासून वाहनांच्या अपघाताचे सत्र सुरू आहे. दहा दिवसांपूर्वी निलंगा-औसा रस्त्यावर ट्रक आणि बसची समोरासमोर धडक बसून अपघात झाला होता. खड्डा चुकवण्याच्या नादात ट्रक चालकाचा ताबा सुटला आणि थेट बस वर आदळली. त्यामध्ये सात जणांना जीव गमवावा लागला होता. दोन चिमुरड्या नातवांसाह आजीचा मृत्यू झाल्यामुळे हळहळ व्यक्त होत होती. त्यातच सोमवारी दुपारी याच रस्त्यावर दुसरा एक अपघात झाला.

 

व्यंकट माने या शिक्षकाच्या आईचा हात मळणी यंत्रात अडकला. जखमी आईला उपचारासाठी नेतानाची घाई अंगलट आली. त्यामध्ये झालेल्या अपघातात शिक्षकाचा आईसह मृत्यू झाला. आणखी एका नातेवाइकालाही जीव गमवावा लागला. यातून सावरत असतानाच मंगळवारी पहाटे झालेल्या अपघातात सात जणांचे प्राण गेले. चाक पंक्चर झाल्यामुळे पुलावरच गाडी लावून टेम्पोचालक त्यात निवांत झोपला होता. टेम्पोला पाठीमागून आवश्यक तेवढे रेडीयमही लावलेले नव्हते. त्यामुळे भरधाव आलेल्या जीपचालकाला अंधारात थांबलेला टेम्पो दिसला नाही. अगदीच जवळ आल्यानंतर टेम्पो दिसला. मात्र तोपर्यंत ताबा सुटला आणि क्रूझर टेम्पोवर आदळली. टेम्पो त्या ठिकाणी थांबला नसता आणि त्याने किमान प्रकाश परावर्तीत होणारे रेडियम लावले असते तर कदाचित हा अपघात झाला नसता. निष्काळजीपणा, आवश्यकतेपेक्षा जास्त वेग, घाई-गडबड यामुळे हे तिन्ही अपघात घडले आहेत.    

 

महामार्ग पोलिस नावापुरतेच  

लातूर-नांदेड रस्त्यावर घरणी येथे महामार्ग पोलिस मदत केंद्र आहे. पण येथील पोलिस मदत करण्याऐवजी कायम वसुलीत गुंतलेले असतात. या केंद्रावरून मदत मिळाली किंवा महामार्गावरचे अडथळे दूर केले असे किमान पाच वर्षांत तरी घडलेले नाही. सोमवारीही अपघात झाल्यानंतर लातूरचे पोलिस पोहोचले, ग्रामस्थांनी मदत केली पण महामार्ग पोलिसांची मदत मिळाली नाही. त्यामुळे हे मदत केंद्र केवळ शोभेचे ठिकाण बनल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली जात होती.    

 

ग्रामस्थांनी केली मदत   
अपघाताचे वृत्त कळताच रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांनी आपली वाहने थांबवून अपघातग्रस्तांना मदत केली. क्रूझरचे छत उडाल्यामुळे बहुतांश मृतांच्या डोके, मानेतून रक्तस्राव होत होता. त्याठिकाणचे दृश्य अगदीच भीषण होते. त्याही परिस्थितीत शेजारच्या कोळपा गावातील तरुणांनी, वाहनचालकांनी पोलिस येईपर्यंत जखमींना बाहेर काढले. पोलिसांनीही तातडीने जखमींना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.  

 

 

मुलांचे छत्र हरवले   
या अपघातात मरण पावलेल्या प्रत्येकाचे एक दु:ख आभाळाएवढे आहे. नवीन रेणापूर नाक्यावर राहणाऱ्या उमाकांत कासले आणि त्यांच्या पत्नी मीना यांचा यात मृत्यू झाला. एका अपघातात जखमी झालेल्या भेटण्यासाठी नातेवाइकांकडे गेलेले कासले कुटुंब मुलांची शाळा बुडते म्हणून म्हणून भल्या पहाटे निघाले होते. या दाम्पत्याला आई-वडील नाहीत. त्यामुळे त्यांच्या १२ वर्षीय जुळ्या मुलांचे छत्र हरवले आहे.   

 

 

 

 

 

 

अपघातातील मृतांची नावे

1) विजय तुकाराम पांदे (वय ३०, रा. दापूर, ता. सिन्नर, जि. नाशिक)

2) तुकाराम ज्ञानोबा दळवे (वय ३५, रा. दापेगाव, ता. औसा)

3) उमाकांत सोपान कासले (वय ४०, रा. रेणापूर नाका, लातूर)

4) मीना उमाकांत कासले (वय ४०, रा. रेणापूर नाका, लातूर)

5) शुभम शरद शिंदे (वय २४, रा. बेलपिंपळगाव, ता. जि. अहमदनगर),

6) मनोज चंद्रकांत शिंदे (वय २५, रा. वैशालीनगर, बाभळगाव)

7) दत्तू बळीराम शिंदे (वय ३५, रा. हिंपळनरी, ता. मुखेड, जि. नांदेड).
 


मंगळवारी लातूरजवळ झालेल्या अपघातातील जखमींची नावे

1) अर्जुन रामराव राठोड (वय २७, परतूर, जि. जालना)

2) शब्बीर बालेखॉं खान (वय १९, रा. निलंगा)

3) कृष्णा दौलत भवर (वय १९, रा. नाशिक)

4) मलिकार्जून गोविंद होडे (वय ३२, गातेगाव, ता. लातूर)

5) वैष्णवी धनंजय भालेराव (वय १८, दिपज्योतीनगर, लातूर)

6) मदन विठ्ठल पवार (वय २३, रा. औरंगाबाद)

7) शेख इम्रान इम्तेयाज (वय १९, रा. चाकूर)

8) गणेश उमाकांत कासले (वय १२, रा. रेणापूरनाका, लातूर)

9) विद्या धनंजय भालेराव (वय ४२, दिपज्योतीनगर, लातूर)

10) ज्ञानेश उमाकांत कासले (वय ११, रा. रेणापूरनाका, लातूर)

11) रामराव मारोती घुगरे (वय ४९, रा. नाशिक)

12) रविदास जयराम सानप (वय ३४, रा. नवी मुंबई)

13) अजय दयानंद वाघमारे (वय २४, लातूररोड, लातूर)

 

पुढील स्‍लाइडवर पाहा, फोटोज... 

बातम्या आणखी आहेत...