आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

लातूर जिल्ह्यातील चार नगरपालिकांसाठी सरासरी 70 टक्के मतदान, औशाला सर्वाधिक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
लातूर - जिल्ह्यातील उदगीर, अहमदपूर, निलंगा व औसा नगरपालिकेसाठी बुधवारी शांततेत सरासरी ७० टक्के मतदान झाले. नगराध्यक्षपदासाठी थेट जनतेतून निवड होणार असल्याने आणि नगरसेवकांसाठी उमेदवारांची भाऊगर्दी झाल्याने बहुरंगी लढतीत मतदारांनीही रांगा लावून उत्स्फूर्तपणे मतदान केले.
मतदानासाठी जिल्हा प्रशासनाने जय्यत तयारी करून चोख बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा प्रशासनाने पूर्ण तयारी केली असून मतदान यंत्रे केंद्रांवर पोहोचवण्यात आली आहेत. चार पालिकांमधील ५० प्रभागांमधून १०१ नगरसेवक आणि चार नगराध्यक्षांसाठी मतदान झाले. नगराध्यक्षांच्या ४ जागांसाठी ३८, तर १०१ नगरसेवकपदांसाठी ५०१ उमेदवार रिंगणात होते. त्यांच्या भविष्याचा फैसला बुधवारी मतदान यंत्रात बंद झाल्यानंतर मतमोजणी संबंधित तालुका ठिकाणी गुरुवारी सकाळी १० वाजेनंतर सुरू होणार आहे.

चार पालिकांमध्ये मिळून एक लाख ४९ हजार १५३ मतदार आहेत. त्यात उदगीरमध्ये ६८ हजार ४०४, अहमदपुरात ३० हजार २४, निलंग्यात २५ हजार ९४३ तर औशात २५ हजार १७७ मतदारांचा समावेश आहे. २०३ मतदान केंद्रांवर ६२८ मशीनद्वारे मतदान घेण्यात आले. पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त तैनात केला होता. चारही नपच्या हद्दीत ५४ अधिकारी तर ६९६ पोलिस कर्मचारी तैनात करण्यात आले होते. मतदानानंतर सर्व मतदान यंत्रे संबंधित तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी सीलबंद करून स्ट्राँगरूममध्ये ठेवण्यात आली.

सकाळी साडेसात वाजता मतदानाला सुरुवात झाली. काही ठिकाणी रिमझिम पाऊस झाल्याने आणि थंडी असल्याने सुरुवातीला संथगतीने मतदान झाले.

परंतु दहा वाजेनंतर मतदानाचा वेग वाढला. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत सरासरी ५५ टक्के मतदान झाले होते. मतदारांत उत्साह दिसून आला. तसेच उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांनी मतदारांना घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे मतदानाचा टक्का वाढला.
मतदानाची टक्केवारी
उदगीर ६९.६६ %
औसा ७५.५८ %
निलंगा ६७.८७ %
अहमदपूर ६८.९८ %
बातम्या आणखी आहेत...