आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरणात 71 टक्के पाणी; ओव्हरफ्लोसाठी पाऊण फुटाची गरज

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तेर- उस्मानाबाद शहरासह पाच गावांना पाणीपुरवठा करणाऱ्या तेर येथील तेरणा धरणात बुधवारी (दि. ३०) सकाळपर्यंत ७१ टक्के पाणी साठा उपलब्ध झाला आहे. धरण भरण्यासाठी अवघे पाऊण फूट पाणी कमी असून, पाण्याची आवक सुरू असल्याने लवकरच धरण भरण्याची शक्यता आहे. पाण्याची आवक सुरूच राहिल्यास सलग दुसऱ्या वर्षी धरण भरेल.  

चार वर्षांपासून धरण कोरडेच असल्याने परिसरातील शेतकरी दुष्काळाचा सामना करत होते. गेल्यावर्षी ३० सप्टेंबर रोजी धरण ओव्हरफ्लो झाले. कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने पाऊस पडून गेल्यावर्षी १७ दिवसांत धरण भरले होते. यावर्षी धरणातील पाणी कमी झाले होते. मात्र, आठवड्यापासून सुरू असलेल्या पावसाने धरणातील पाणी साठा वाढण्यास मदत झाली आहे. 

३० ऑगस्टपर्यंत झालेल्या ६२३ मिलिमीटर पावसाने धरणात २१११ फूट पाणी आले आहे. धरण ओव्हरफ्लो होण्यासाठी २११३.५० फूट पाणी आवश्यक आहे. पावसाळा अजून महिनाभर असल्याने धरण ओव्हरफ्लो होण्याची शक्यता आहे.   

चार गावांना मिळणार पाणी   
धरणात गेल्यावर्षीपासून समाधानकारक साठा असला तरी प्रचंड तोट्यात असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची जलवाहिनी बंद असल्याने तेर, ढोकी, कसबे तडवळे आणि येडशी या चार गावांना पाणीपुरवठा सुरू होऊ शकला नाही. यावर्षी धरणात पाणी साठा वाढला आहे. तसेच १४ व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायतीने वीज बिल भरण्यासाठी रक्कम देण्याचा ठराव घेण्यात आला आहे. हा प्रस्ताव ग्रामविकास विभागाकडे सादर झाला आहे. विभागाची परवानगी मिळाल्यास या चार गावांना पाणीपुरवठा सुरू होऊ शकतो.    
बातम्या आणखी आहेत...