आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मराठवाड्यात चार अपघातांत 8 जणांचा मृत्यू

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नांदेड - मंगळवारी मराठवाड्यातील देगलूर, लातूर, परभणीतील जिंतूर व हिंगोलीतील सेनगाव तालुक्यात झालेल्या चार वेगवेगळ्या अपघातांत आठ जणांचा मृत्यू झाला. लातूरजवळ झालेल्या अपघातात ड्यूटीवर असलेल्या पोलिस कॉन्स्टेबलचा मृत्यू झाला.


देगलूर तालुक्यातील तमलूर-शेळगाव शिवेजवळ मंगळवारी पहाटे पाचच्या सुमारास वाळूचा ट्रक (एपी 23 वाय 0240) उलटून चार मजुरांचा मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाले. तमलूर येथील मांजरा नदीतून वाळूचा उपसा करण्याचा परवाना निझामाबाद येथील मजाज अली या ठेकेदाराला देण्यात आला. ठेकेदारामार्फत रात्री नदीतून वाळू उपसा करण्याचे काम सुरू होते. मंगळवारी पहाटे वाळूने भरलेला ट्रक निघाला. या कामावरील मजूरही त्याच ट्रकमधून तमलूरकडे परत येत होते. तमलूरपासून थोड्याच अंतरावर चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रक उलटला. वाळूखाली दबून शिवाजी गंगाराम गड्डमवार (43), दाऊलजी सुभाष कांबळे (23), कपिल गणपतराव गायकवाड (19) व राजअहमद मदार बागवान (23) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला. हनुमंत गंगाराम फरसे, संजय काशीराम फरसे, हनुमंत मारुती कांबळे व हुसेनी मौलाना पिंजारी हे गंभीर जखमी झाले. या दुर्घटनेतील सर्व मृत व जखमी तमलूर येथील रहिवासी आहेत. जखमींना देगलूर येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हाधिकारी धीरजकुमार यांनी भेट देऊन मृतांच्या कुटुंबीयांचे सांत्वन केले.


जीप झाडावर आदळली
परभणी - अवैध प्रवासी वाहतूक करणारी भरधाव जीप झाडावर आदळून एक जण ठार झाला, तर 10 जण गंभीर जखमी झाले. परभणी-जिंतूर
रस्त्यावर जिंतूर शहरापासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या माथला-पांगरी पाटीच्या
दरम्यान मंगळवारी सकाळी सहाच्या सुमारास हा अपघात घडला.
अवैध प्रवासी वाहतूक करणारी जीप (एमएच 20-एए-1628) परभणीहून जवळपास 20 प्रवासी घेऊन जिंतूरकडे निघाली होती. सकाळी सहाच्या सुमारास जिंतूरजवळ असताना चालकाचा वाहनावरील ताबा सुटला व जीप रस्त्याच्या बाजूला बाभळीच्या झाडावर आदळली. अपघातात जीपचा चुराडा झाला. शिवाय जोराच्या धडकेमुळे झाडही उन्मळून पडले. अपघातात वाहनचालक महेश पवार यांचा मृत्यू झाला. ब्रह्मदेव उत्तम पवार (18), आत्माराम लक्ष्मण पवार (35), बबन पडोळकर (50, सर्व रा.भानखेडा, ता.सेनगाव), बालिका भगवान राठोड (16), सुनीता गणेश जाधव (25, रा.केलसुला, ता.सेनगाव), रामा गोविंद मुंडे (रा.मकोडी), रामा सुरेश सरकटे (रा.बोर्डी, ता.जिंतूर) व प्रीती सुरेश वानखेडे (वय सहा) हे जबर जखमी झाले.


लातूरजवळ विचित्र अपघात
लातूर - वासनगाव पाटीवर मंगळवारी दुपारी ट्रक, काळीपिवळी, पोलिस व्हॅन आणि मोटारसायकलचा विचित्र अपघात झाला. यात पोलिसासह मुलाचा मृत्यू झाला, तर सात जण जखमी झाले.
वाळूने भरलेला ट्रक (के.ए. 26-5009) औशाकडे जात असताना चालकाचा ताबा सुटल्याने त्याने काळीपिवळीला (एमएच 24-एफ 1460) धडक दिली. त्यामुळे काळीपिवळी दुभाजकावर जाऊन अडकली. त्याच वेळी अवैध प्रवासी आणि बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाºया वाहनांवर कारवाई करण्यासाठी पोलिसांची जीप (एमएच 24-बी-7684) तेथे उभी होती. ट्रकने पोलिसांच्या जीपलाही ठोकल्याने जीपमागे थांबलेले पोलिस कर्मचारी महादेव खंडागळे व सुवर्णा भारती दोन्ही वाहनांच्या मधोमध सापडले. यात खंडागळे यांचा जागीच मृत्यू झाला तर भारती या गंभीर जखमी झाल्या. पुढे जाऊन ट्रकने मोटारसायकलने जाणाºया पती-पत्नी आणि दोन लहान मुलाला चिरडले. यात राजू शंकर बारस्कार (8) याचा जागीच मृत्यू झाला तर शंकर बारस्कर, करण बारस्कर आणि जयश्री बारस्कर (रा. सावेवाडी) जखमी झाले. गंभीर जखमी सुवर्णा भारती आणि करण बारस्कर यांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अन्य जखमींमध्ये नवनाथ ईटकर, लक्ष्मण धोतरे (रा. सावेवाडी, लातूर) आणि अंकुश गुंजाळ (रा. लातूर) यांचा समावेश आहे.