आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उस्मानाबादेत कर्जबुडव्या ८१ थकबाकीदारांवर जप्तीचा बडगा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
उस्मानाबाद- वैयक्तिक तसेच सहकारी संस्था, फर्मच्या नावे कर्ज उचलून जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ठेंगा दाखवणाऱ्या ८१ थकबाकीदारांविरोधात बँकेने जप्तीच्या कारवाईचा बडगा उगारला आहे. या अनुषंगाने संबंधितांना पंधरा दिवसांच्या मुदतीची नोटीस बजावण्यास प्रारंभ झाला आहे. त्यानंतर थेट संबंधितांच्या मालमत्ता जप्त केल्या जाणार असल्याने पुढील महिन्यात जिल्हाभरात विशेषत: राजकीय क्षेत्रात खळबळ उडणार आहे.

उस्मानाबाद जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची कोट्यवधी रुपयांची कर्जाची रक्कम थकीत आहे. तत्कालीन संचालक मंडळाने मर्जीतील संस्था, व्यक्ती, तसेच फर्मला खैरातीप्रमाणे कर्ज वाटप केले, परंतु सध्या वसुलीसाठी कोणीही पुढाकार घेत नसल्याने जिल्हा बँक आर्थिक अडचणीत सापडली आहे. याबाबत अनेकवेळा नोटीस देऊन, विनंत्या करूनही कोणताच फरक पडत नसल्याने बँकेने थकबाकीच्या वसुलीसाठी कलम १५६ अंतर्गत अधिकार व वसुलीचे प्रमाणपत्र मिळावे म्हणून जिल्हा उपनिबंधकांकडे अर्ज करण्यात आला होता. त्यानुसार ८१ संस्थांकडील थकीत रकमेच्या वसुलीसाठी बँकेने नेमलेल्या ५५ जणांना वसुलीसाठी विशेष अधिकार देण्यात आले आहेत. त्यानुसार याबाबतची पुढील पायरी म्हणून बँकेने जप्तीची कारवाई करण्याचा निर्णय घेतला असून त्यानुसार जिल्ह्यातील ८१ जणांना जप्तीच्या कारवाईची नोटीस बजावण्यास प्रारंभ झाला अाहे.

बड्या माशांचा समावेश
या नोटीस बजावण्यात आलेल्यांमध्ये पायोनिअर प्रिस्ट्रेड काँक्रीट प्रॉडक्टस, अमोल एजन्सीज, वैभव ट्रेडर्स या वैयक्तिक थकबाकीदार फर्मबरोबरच धाराशिव कुक्कुटपालन संस्था, उस्मानाबाद, औद्योगिक संस्थेमध्ये पृथ्वीराज ग्रेप ग्रोव्हर्स, कळंब खरेदी-विक्री संघ, कै. बाजीराव पाटील पॅकेजिंग संस्था, पवनराजे नागरी पतसंस्था, शिराढोण, शिवशक्ती नागरी पतसंस्था, वाशी अशा काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुढारी, पदाधिकाऱ्यांच्या या संस्था आहेत. अनेकांनी कर्ज उचलल्यापासून बँकेला तोंडच दाखवले नाही. परिणामी आज सर्वसामान्य खातेदारांना रुपये काढण्यासाठीही बँकेत हेलपाटे मारावे लागत आहेत.

थकबाकीदार संस्था व रक्कम
पगारदार संस्था-५ कोटी पन्नास लाख
नागरी पतसंस्था- ९९ लाख ३२ हजार
मजूर संस्था- २ कोटी २७ लाख
औद्योगिक संस्था- ५२ लाख ५२ हजार
साखर कारखाने-१०७ कोटी २२ लाख
पृथ्वीराज ग्रेप ग्रोव्हर्स-३० लाख
दूध संस्था-३९ लाख