आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

9 फूट दाढीचे सरवनसिंघजी पुन्हा विश्वविक्रमाच्या तयारीत

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नांदेड- शरीराचा एखादा भाग माणसाच्या उंचीपेक्षा लांब, मोठा असणे हे शरीरशास्त्राच्या दृष्टीने अॅबनाॅर्मल मानले जाते. कॅनडात राहणारे सरवनसिंघजी हे मात्र या नियमाला अपवाद आहेत. त्यांच्या याच वैशिष्ट्याने त्यांना गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये दोन वेळा स्थान मिळवून दिले.

शीख संप्रदायाचे दहावे गुरू श्रीगुरुगोविंदसिंघजी महाराज यांनी शीख समाजाला नवी ओळख दिली. ही ओळख कायमस्वरूपी जपण्यासाठी त्यांनी कृपाण, कंगवा, केस, कडा व कच्छा या पाच गोष्टी सदैव सोबत बाळगण्याचे आदेश दिले. यापैकी एकही गोष्ट जवळ नसेल तर तो शीख आहे, असे मानता येत नाही. गुरूच्या आदेशानुसार प्रत्येक शीख या गोष्टीचे पालन करतो, त्यामुळेच लांब केस, दाढी ही शीख बांधवांची आयडेंटिटी बनली आहे. यामुळेच जगात शीख माणसाची ओळख पटते. एखाद्याचे लांब केस, लांब दाढी सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरते. मूळचे अमृतसरचे रहिवासी असलेले व आता कॅनडात स्थायिक झालेले सरवनसिंघजी हे त्यांच्या लांब दाढीमुळे जगप्रसिद्ध झाले आहेत.

दोन वेळा जागतिक विक्रम
सरवनसिंघजी गुरुद्वारात कीर्तन करतात. २००७ च्या सुमाराला त्यांना कॅनडातील शीख भाविकांनी कीर्तनासाठी बोलावून घेतले. त्या वेळी त्यांची दाढी चांगली असल्याने सर्वसामान्यांच्या कुतूहलाचा विषय बनली. काही तरुणांनी हा विश्वविक्रम होईल, असे मानून गिनीज बुकवाल्यांना माहिती दिली. त्या वेळी गिनीज बुकात ६ फूट लांब दाढीचा विश्वविक्रम नोंद झाला होता. २००८ मध्ये सरवनसिंघ यांच्या दाढीचे माप घेण्यात आले. त्या वेळी ती ७ फूट ९ इंच भरली. जगातील सर्वात लांब दाढी ठरल्याने तिची नोंद विश्वविक्रमात झाली. त्यानंतर २०११ मध्ये पुन्हा गिनीज बुकवाल्यांनी त्यांच्या दाढीचे मोजमाप केले असता ती सव्वाआठ फूट लांब भरली. जगातील सर्वात लांब दाढी म्हणून तिची नोंद झाली. आता पुन्हा गिनीज बुकवाले येणार असून या वेळी दाढीची लांबी ९ फुटांच्या आसपास भरेल, असा विश्वास सरवनसिंघजी यांनी व्यक्त केला.

गुरूंचा आशीर्वाद
लांब दाढी हा विश्वविक्रम ठरतो, याची मला मुळीच कल्पना नव्हती. काही तरुणांनी याची जाणीव करून दिली. मी हा गुरूचा- ईश्वराचा प्रसाद समजतो. निष्ठेने सांभाळ करतो. दाढीचा दैनंदिन जीवनात काही त्रास होत नाही, उलट हिच्यामुळेच जीवनाला नवी दिशा मिळाली. माझा भाऊ इंग्लंडमध्ये कीर्तन करतो, त्याच्या दाढीची लांबी ७ फूट आहे. जागतिक क्रमवारीत तो दुसऱ्या स्थानावर आहे. याला केवळ आम्ही गुरूघरचा प्रसाद मानतो.
-सरवनसिंघजी, कॅनडा, विश्वविक्रमी नोंद असलेले कीर्तनकार
बातम्या आणखी आहेत...