आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 9 Lakh Farmers Get Benefit From Electricity Bill In Marathwada

मराठवाड्यातील ९ लाख शेतक-यांना वीजमाफीचा लाभ

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
जालना - दुष्काळात होरपळून निघालेल्या मराठवाडा व विदर्भातील शेतक-यांसाठी राज्य सरकारने नागपूर अधिवेशनात गुरुवारी ३ हजार ९२५ कोटींचे पॅकेज घोषित केले. याअंतर्गत कृषिपंपांचे तीन महिन्यांचे १७८ कोटी रुपये वीजबिल माफ होणार आहे. याचा मराठवाड्यातील ९ लाख ६२ हजार ४७८ कृषिपंपधारकांना दिलासा मिळणार आहे.

तीन वर्षांतील दुष्काळ, गारपीट व पुन्हा दुष्काळ या दुष्टचक्राने मराठवाड्यातील शेतकरी पार खचून गेला आहे. शेतात लागवड केलेल्या पिकांचा उत्पादन खर्चही निघत नसल्यामुळे नापिकीला सामोरे जावे लागत आहे. शेतीसाठी काढलेल्या कर्जाची परतफेड न झाल्यामुळे कर्जाचा दिवसेंदिवस वाढता डोंगर, मुला-बाळांच्या शिक्षणाचा तसेच मुलीच्या लग्नाचा खर्च भागत नसल्यामुळे खासगी सावकाराचे दार ठोठावण्याची वेळ शेतक-यांवर आली. मात्र, बँक व खासगी सावकाराचे कर्ज फि‍टत नसल्यामुळे शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे. चालू वर्षात मराठवाड्यातील ४६० शेतक-यांनी आपले जीवन संपवले आहे. महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी दुष्काळग्रस्त मराठवाड्याचा आढावा घेतला. शेतक-यांना भरीव मदत करण्यासाठी केंद्र सरकारला प्रस्ताव पाठवला.

मदतीच्या निर्णयास विलंब होत असल्यामुळे सर्वस्तरातून सरकार विरोधात रोष व्यक्त होऊ लागला. यातच नागपूर अधिवेशनात विरोधी पक्षाने शेतक-यांना पॅकेज देण्याची मागणी रेटली व सभागृहाचे कामकाज बंद पाडले. यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी ३ हजार ९२५ कोटींचे पॅकेज घोषित केले. यात ३ महिन्यांच्या कृषिपंप वीजबिल माफीचा समावेश केला. यातून मराठवाड्यातील ९ लाख ६२ हजार ४७८ कृषिपंपधारकांचे १७८ कोटींचे वीजबिल माफ होणार आहे.

उत्पादन घटले, भाव गडगडले
अत्यल्प पावसाने उत्पादनात घट झाली तर दुसरीकडे सध्या शेतमालास भाव नाही. यामुळे शेतक-यांवर भीषण संकट ओढावले आहे. मराठवाड्यात मुख्यत्वे कापूस, सोयाबीन, मका ही नगदी पिके घेतली जातात. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा शेतमाल भावात कमालीची घट झाली आहे.

८ हजार १४९ गावे दुष्काळाच्या खाईत
मराठवाड्यात या वर्षी सरासरीच्या फक्त ५३ टक्के पाऊस झाला. यामुळे शेती उत्पादनात ७५ टक्क्यांहून अधिक घट झाली आहे. परिणामी, मराठवाड्यातील ८ हजार १४९ गावांत पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली. शासनाकडून १५ नोव्हेंबर रोजी ही पैसेवारी घोषित केली. यात औरंगाबाद जिल्ह्यातील १ हजार ३३६, जालना ९७०, बीड १ हजार ३७७, नांदेड १ हजार ५७५, लातूर ९४५, उस्मानाबाद ३१८, हिंगोली ७०७ व परभणीतील ८५२ गावांचा समावेश आहे.

460 मराठवाड्यात शेतक-यांच्या आत्महत्या
चालू वर्षात मराठवाड्यातील ४६० शेतक-यांनी कर्ज व नापिकीस कंटाळून आत्महत्या केली आहे. यात औरंगाबाद ४२, जालना २२, परभणी ४९, हिंगोली २९,नांदेड १०६, बीड १२३, लातूर ३४, उस्मानाबाद ५५ आदींचा समावेश आहे. आणखीही आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे.

३२ लाख हेक्टरवरील नगदी पिके वाया
मराठवाड्यात कापूस, सोयाबीन व मका ही नगदी पिके म्हणून ओळखली जातात. या वर्षी १७ लाख ३३ हजार ८७४ हेक्टरवर कपाशी, १५ लाख ७ हजार ३६ हेक्टरवर सोयाबीन लागवड झालेली आहे. या दोन पिकांचे क्षेत्र ३२ लाख ४० हजार ९१० हेक्टर एवढे आहे. सर्वाधिक नुकसान याच पिकांचे झाले आहे. यापाठोपाठ मका िपकाचे नुकसान झाले आहे. औरंगाबाद व जालना जिल्ह्यात मक्याचे क्षेत्र अन्य जिल्ह्यांच्या तुलनेत अधिक आहे.

काहीसा दिलासा
सरकारने उशिरा का होईना, शेतक-यांना मदत देण्यासाठी पॅकेज घाेषित केले. वीज बिल माफ हा दिलासादायक निर्णय आहे.
रामेश्वर खैरे, शेतकरी, सामनगाव, ता. जि. जालना

शुद्ध धूळफेक
रोहित्र दुरुस्तीसाठी शेतक-यांचे लाखो रुपये वीज कंपनीने उकळले. यामुळे वीजबिल माफ ही शुद्ध धूळफेक आहे.
बालाप्रसाद दरक, शेतकरी, जवखेडा ठोंबरे, ता. भोकरदन