आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

खिचडीत शिजली पाल; ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
हिंगोली - मध्यान्ह भोजनातील खिचडीत शिजलेल्या पालीमुळे तालुक्यातील समगा येथील जिल्हा परिषद शाळेतील ९५ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. त्यांना हिंगोली येथील सामान्य जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. २० विद्यार्थ्यांना सुटी देण्यात आली असून ७५ जणांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले आहे.

समगा येथील जिल्हा परिषद शाळेत ३०० विद्यार्थी शिक्षण घेतात. शनिवारी सकाळी १०.३० वाजता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना मध्यान्ह भोजनात खिचडी आणि वाटाणे देण्यात आले. खिचडी खाल्ल्यानंतर काही वेळातच विद्यार्थ्यांना चकरा येणे सुरू झाले. एका विद्यार्थ्याने खिचडीत निघालेली पाल दाखवली. यानंतर बहुतांश सर्वच विद्यार्थ्यांनी उलट्या केल्याने ९५ विद्यार्थ्यांना येथील सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. बाबासाहेब रोडगे, डॉ. गोपाल कदम, डॉ. दीपक मोरे आदी डॉक्टरांनी ताबडतोब विद्यार्थ्यांवर उपचार सुरू केले. एक तासाच्या उपचारानंतर त्यातील २० विद्यार्थ्यांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली. जास्त बाधा झालेल्या ७५ विद्यार्थ्यांना डॉक्टरांच्या निगराणीखाली ठेवण्यात आले. प्रकृतीत सुधारणा होताच त्यांना सुटी देण्यात येणार आहे. डॉ. रोडगे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी धोक्याबाहेर आहेत. या प्रकरणी डॉक्टरांनी खिचडी आणि वाटाण्याचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठवले आहेत.

मुख्याध्यापकाला नोटीस
‘घडलेल्या प्रकरणाची चौकशी करण्यात येत असून शाळेचे मुख्याध्यापक शेख जिलानी यांना नोटीसही बजावण्यात आली आहे. घटनेतील सर्व विद्यार्थी सुखरूप असून घटना घडल्यानंतर मी स्वत: शाळेत दाखल झालो आणि विद्यार्थ्यांना रुग्णालयात आणले. प्रथमदर्शनी या प्रकाराला अन्न शिजवणारे कर्मचारी जबाबदार असल्याचे दिसून येत आहे.’ - शिवाजी पवार, शिक्षणाधिकारी, झेडपी

३२ विद्यार्थ्यांना जास्त बाधा
‘समगा शाळेतील विद्यार्थी रुग्णालयात दाखल झाले होते. त्यापैकी बहुतांश जणांवर ताबडतोब उपचार करून त्यांना घरी पाठवण्यात आले, तर ३२ जणांना जास्त विषबाधा झाली असून गरज पडल्यास त्यांना रात्री रुग्णालयात ठेवण्यात येईल.’ डॉ. बाबासाहेब रोडगे, निवासी वैद्यकीय अधिकारी, सामान्य रुग्णालय, हिंगोली.