आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • सचिनच्या पहिल्या शतकाचा साक्षीदार

सचिनच्या पहिल्या शतकाचा साक्षीदार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - सचिनशी निगडित बाबींमध्ये जगातील त्याचा प्रत्येक प्रशंसक आपला आनंद शोधत असतो. क्रिकेटच्या या देवाला टीव्हीवर बघूनच प्रत्येक जण सुखावतो. त्याच्याशी प्रत्यक्ष भेट झाली म्हणजे स्वर्गातील आनंदच मिळाल्यासारखे होते. नेमके असेच मलाही झाले होते. जेव्हा मी विदेशी भूमीवर सचिन तेंडुलकरचे साक्षात दर्शन घेऊन तिकिटावर स्वाक्षरी मिळवली होती, अशा शब्दांत मँचेस्टर येथे 1990 मध्ये सचिनने झळकावलेल्या पहिल्या कसोटी शतकाचे साक्षीदार ठरलेले विद्यापीठाच्या नाट्यशास्त्र विभागाचे प्रमुख डॉ. शशिकांत बर्‍हाणपूरकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

विशेष म्हणजे त्याची ही स्वाक्षरीदेखील एक ऐतिहासिक घटनेपेक्षा कमी नाही. कारण, सचिनने तिकिटावर केवळ इंग्रजीतच नाही, तर मराठीमध्येही स्वाक्षरी केली आहे.

मी 1990 मध्ये मँचेस्टर येथे नाट्यशास्त्रात पीएच.डी. करत होतो. मँचेस्टर येथे 14 ऑगस्ट 1990 रोजी भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामना होता. भारत सतत सपाटून मार खात असल्याने माझा विदेशी मित्र टोमणे मारत म्हणाला, ‘चल, भारताचा क्रिकेट सामना पाहायला जाऊ.’ मला सचिनला पाहण्याची उत्सुकता असल्याने मीही गेलो.’ त्या वेळी संपूर्ण माध्यमामध्ये 17 वर्षांच्या सचिनच्या बातम्या झळकत होत्या. सर्वांचे लक्ष या छोट्या क्रिकेटपटूच्या कामगिरीकडे लागून होते. पहिल्या डावात भारतीय संघ चांगला खेळला. दुसर्‍या डावात सचिनने 118 धावांची नाबाद खेळी करत आपल्या कारकीदींतील पहिले शतक झळकावले. सचिनच्या खेळीमुळे हा सामना बरोबरीत सुटला होता. त्यानंतर मी सचिनला भेटण्यासाठी गर्दीमध्ये गेलो.

सचिनला मराठीमध्ये आवाज दिल्याने त्याचे लक्ष एकदम माझ्याकडे वेधले गेले. त्याला मी स्वाक्षरी मागितली. त्यांने इंग्रजीमध्ये सही केली. ते पाहून मी त्याला पुन्हा म्हटले, ‘तू मराठी आहेस, मराठीत सही कर.’ त्याने त्या सामन्याच्या तिकिटावर इंग्रजी आणि मराठीत एका वेळी सही केली. हेच या तिकिटाचे वैशिष्ट्य आहे.