आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जालना रोडवर उडवले; पादचारी जागीच ठार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - जालनारोड वरील एसएफएस शाळेसमोर रस्ता ओलांडणाऱ्या पादचाऱ्यास भरधाव दुचाकीने ठोकरल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. तर पादचा ऱ्यास ठोकरणारा दुचाकीस्वारही गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. बुधवारी संध्याकाळी सातच्या सुमारास हा अपघात झाला. विजय भगवानदास अग्रवाल (५०, रा. विष्णूनगर) असे मृत पादचाऱ्याचे नाव असून ते सिडको येथील अग्रवाल समाजाच्या गंगा मां छात्रवासाचे प्रमुख काम करीत होते.
विजय अग्रवाल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास आपले काम आटोपून घराकडे पायी निघाले होते. सातच्या सुमारास एस.एफ.एस शाळेसमोर ते रस्ता ओलांडत असतानाच शंतनू देशमुख (रा. मानवत, हल्ली मुक्काम सिडको) हा त्याच्या केटीएम स्पोर्ट दुचाकीने (एम एच २२ एजे ८५८५) वेगाने जात होता. दुचाकीचा वेग अधिक असल्याने तो क्षणार्धात रस्ता ओलांडणा ऱ्या अग्रवाल यांना धडकला. ही धडक एवढी जबरदस्त होती की अग्रवाल अक्षरश हवेत उडाले तर शंतनूची दुचाकी दुभाजकाला धडकून विरुद्ध दिशेला उभ्या कारवर आदळली. अग्रवाल यांना जबर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले. तसेच शंतनूच्या डोक्यात हेल्मेट होते तरीही त्याच्या मेंदूला गंभीर दुखापत झाली. त्याला रक्ताची उलटी झाली. सिग्मा हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

घटनेची माहिती मिळताच जवाहर नगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिस चार्ली रवींद्र लाटे, शत्रुघ्न शिंदे यांनी तात्काळ वाहतुकीचे नियंत्रण करीत दोघांनाही रस्त्यावरील नागरिकांच्या मदतीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. अग्रवाल यांना घाटीत नेण्यात आले असता डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. जवाहर नगर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
पथदिवे प्रखर असते तर अपघात टळला असता : एस.एफ.एस. शाळेसमोरचा हा परिसर अपघात स्थळच बनले आहे. दोन महिन्यांपूर्वी याच ठिकाणी सेव्हन हिल्स परिसरात खाणावळ चालवणारी महिला तिच्या भाच्याचा मृत्यू झाला होता. याच ठिकाणी मंगळवारी रस्ता ओलांडणाऱ्या तरुणाला वाहनाने ठोकरल्याने तो गंभीर जखमी झाला होता. जाणकारांच्या मते या रस्त्यावर पथदिव्यांचा प्रकाश अत्यंत कमी (फ्लेक्स) आहे. रस्त्याच्या आजूबाजूला असलेल्या दुकानांतील लाइटच्या प्रकाशावरच वाहनधारक पादचारी रस्ता ओलांडतात. पांढरा रंग वगळता दुसरा कुठल्याही गडद रंगाचे कपडे घालून रस्ता ओलांडताना पादचारी दिसत नाहीत.

दोन्ही कुटुंबीयांना दु:ख
विजय अग्रवाल हे मूळचे चिखलीचे आहेत. गेल्या दहा वर्षांपासून सिडको येथील अग्रवाल समाजाकडून चालवल्या जाणाऱ्या गंगा मां वसतिगृहाचे ते प्रमुख होते. पत्नी, एक मुलगा दोन मुली असा त्यांचा परिवार असून मुलींची लग्ने झाली तर मुलगा हा खाजगी नोकरी करतो. तर शंतनू देशमुख हा परभणी जिल्ह्यातील मानवताचा असून त्याचे वडील शेतकरी आहेत. तो एमसीएचे शिक्षण घेत आहे. या अपघातामुळे दोन्ही कुटुंब दु:खात लोटेले गेले.

शंतनूच्या बाईकची गती १०० वर
शंतनूयाची दुचाकी ही स्पोर्ट बाईक असून तिची क्षमता २०० सीसीपेक्षा अधिक आहे. प्रत्यक्षदर्शींच्या मते तो ताशी १०० पेक्षा अधिक वेगाने जात होता. तो अनेक दुचाकीस्वारांना ओव्हरटेक करत तो पुढे गेला होता.

बातम्या आणखी आहेत...