औरंगाबाद - पावसाने दडी मारल्यामुळे मराठवाड्यातील मूग, कापूस, सोयाबीन आणि तूर ही पिके धोक्यात आली असून पेरणी झालेल्या क्षेत्रापैकी तब्बल १० लाख हेक्टरवर दुबार पेरणी करावी लागणार आहे, असे विभागीय आयुक्त डॉ. उमाकांत दांगट यांनी सांगितले. चार वर्षांत यंदा प्रथमच सात जूनलाच पावसाचे जोरदार हजेरी लावल्याने मराठवाड्यातील ४३ लाख हेक्टर क्षेत्रापैकी ३२ लाख हेक्टरवर पेरणी झाली आहे. मात्र, अनेक तालुक्यांत तुरळक पाऊस झाल्याने साडेअकरा लाख हेक्टरवर पेरणी झालीच नाही.
गेल्या सव्वा महिन्यापासून पावसाने दडी मारल्यामुळे उगवलेली पिके सुकू लागली आहेत. त्यामुळे विभागीय आयुक्तांनी सूक्ष्म आढावा घेण्याचे आदेश जिल्हाधिका-यांना दिले होते. त्यानुसार अहवाल आले आहेत. चार दिवसांत अंतिम अहवाल तयार होतील.
पावसाच्या लहरीपणाचा सर्वाधिक फटका परभणी,बीड,उस्मानाबाद व लातूर या जिल्ह्यांना बसला. या चारही जिल्ह्यांत पावसाची सरासरी ४० टक्यापेक्षा कमी आहे. परभणी, बीड आणि उस्मानाबादमध्ये तर ३३ टक्केच पाऊस झाला. या चार जिल्ह्यांत १२ लाख ७१ हजार ७०० हेक्टरवर पेरणी झाली. जालना, औरंगाबादेतील काही तालुक्यांतही दुबार पेरणीची वेळ आली आहे.
कमी पावसामुळे चा-याची परिस्थितीही गंभीर आहे. त्यामुळे ७० हजार हेक्टरवर चा-याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी दहा कोटी रुपयाची तरतूद करण्यात आली आहे. शेतक-यांना चारा लागवडीसाठी हेक्टरी १५०० रुपयांची बियाणे देण्यात येणार आहेत. त्यात निळवा ज्वारी, बाजरी आदी प्रकारातील चारा घेतला जाऊ शकतो. पाऊसच नसल्यामुळे मराठवाड्यातील पाणीटंचाईचे संकट गंभीर बनले आहे.
पुढे वाचा, एप्रिलपेक्षा गंभीर पाणीटंचाई