आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

प्रश्‍न आरोग्याचा : 4 वर्षांत 10 पत्रे, तरीही ‘एनआयसीयू’ बंदच !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चार वर्षांपूर्वी उद्घाटन होऊनही नवजात शिशू अतिदक्षता कक्ष (एनआयसीयू) विभाग अद्याप सुरूच झालेला नाही. या विभागातील उपकरणांच्या दुरुस्तीसाठी एल अँड टी कंपनीला घाटी प्रशासनाने किमान 10 पत्रे पाठवली असल्याचा अंदाज आहे, तरीही हा विभाग सुरू होण्याच्या काही हालचाली नाहीत. विशेष म्हणजे यासाठी आणखी किती दिवस लागणार हेही प्रशासन सांगू शकत नाही.

नवजात शिशूंच्या वेगवेगळ्या गंभीर आरोग्य समस्यांसाठी एनआयसीयू हे वरदान समजले जाते. त्यामुळेच ‘टर्न की प्रोजेक्ट’अंतर्गत साडेपाच कोटी खचरून ‘एनआयसीयू’ आणि ‘ट्रॉमा’ विभाग उभारण्यात आले. त्यासाठी अत्याधुनिक उपकरणे उपलब्ध करण्यात आली.


2009 मध्ये थाटात उद्घाटन झाले; परंतु दोन्ही विभाग आजतागायत सुरूच झाले नाहीत. 2011 पासून म्हणजेच एनआयसीयूच्या उपकरणांचा वॉरंटीचा काळ संपायच्या आत एल अँड टी कंपनीशी पत्रव्यवहार सुरू झाल्याचे प्रशासन म्हणते. मात्र, तेव्हापासून केवळ पत्रव्यवहारच सुरू आहे. दुसरी कुठलीही हालचाल होताना दिसत नाही. दररोज घाटीमध्ये 50 ते 60 प्रसूती होतात. त्यातील काही जणांना जरी ‘एनआयसीयू’ची आवश्यकता पडली तरी विभागातील अत्याधुनिक उपकरणांचा उपयोग होऊ शकत नाही.


दरम्यान, ‘दिव्य मराठी’ने वैद्यकीय अधीक्षक डॉ. पी. एल. गट्टाणी यांना आतापर्यंत किती पत्रे पाठवली, याबाबत विचारणा केली असता आकडा सांगणे शक्य नसल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, सातत्याने पाठपुरावा सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.


खर्चाला मिळेना मान्यता
कंपनीने उपकरणांची चाचपणी, प्रसंगी दुरुस्ती करण्यासाठी फार मोठा कालावधी लागत असल्याने विद्युत विभागाकडून दुरुस्ती करून घेण्याबाबत प्रयत्न केल्याचे प्रशासन म्हणते. मात्र, विद्युत विभागाने सुमारे साडेचार लाखांचा खर्च सांगितला. त्याला मान्यता मिळवण्यासाठी प्रस्ताव पाठवण्यात आला. मात्र, अद्याप त्याबाबत संचालनालयाकडून कुठलाही प्रतिसाद मिळाला नसल्याचे स्पष्ट झाले.


कंपनीने सुरू केली प्रक्रिया
कंपनीने पत्रव्यवहाराला प्रतिसाद दिला असून आपली प्रक्रिया सुरू केली आहे. त्यासाठी काम करून देणार्‍या उपकंपनीने कोटेशन मागवल्याचे समजते. कंपनीने काम करून दिले नाही तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. मात्र, उपकंपनी काम करून देण्याबाबत सकारात्मक पावले उचलते आहे. डॉ. पी. एल. गट्टाणी, वैद्यकीय अधीक्षक, घाटी.