आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दहा जणांना डेंग्यूची लागण, पावसाळ्यापूर्वीच डासांचे आक्रमण

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पावसाळ्याची चाहूल लागताच एडिस इजिप्ती डासांनी आक्रमणाला सुरुवात केली आहे. शहरात गेल्या काही दिवसांत डेंग्यूचे ते १० रुग्ण समोर आले आहेत. शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार घेत असलेले हे रुग्ण जाधववाडी, हडको एन-११, देवानगरी भागातील आहेत. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. काही रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. मात्र, या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. सुहास जगताप यांनी केले आहे.

डॉ. सुहास जगताप म्हणाले, रुग्णांवर उपचार करण्यात आले आहेत. मात्र, त्यांच्या रक्ताचे नमुने शासकीय प्रयोगशाळेकडे पाठवण्यात आले आहेत. हे निकाल पॉझिटिव्ह आल्यास डेंग्यू झाल्याचे म्हणता येईल. जाधववाडीतील एका रुग्णावर घाटीत उपचार सुरू असून त्याचा निकाल पॉझिटिव्ह आल्याचे मनपा वैद्यकीय अधिकारी डॉ. मनीषा भोंडवे यांनी सांगितले. शहरातील डॉ. हेडगेवार रुग्णालय, वरद बाल रुग्णालय, निमाई रुग्णालय, एमजीएममध्येही डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण दाखल आहेत. याशिवाय मनपाकडे नोंद नसलेल्या रुग्णांचे प्रमाणही इतकेच असू शकते.

कूलर्समध्ये सापडतात सर्वाधिक डास : उन्हाळ्याच्याकाळात घराघरात कूलर्स वापरले जातात. मात्र, उन्हाळा संपल्यावर कूलर्समधील पाणी काढून ते कोरडे करून ठेवले जात नाहीत. अशा कूलर्समध्ये सर्वाधिक प्रमाणात डेंग्यूचे डास अाढळून येतात. कूलर्स स्वच्छ कोरडे करून ठेवावेत. यासाठी घरगुती वापराचे पाणी झाकून ठेवावे, असे डॉ. भोंडवे म्हणाल्या.

डेंग्यूच्या तीन पातळ्या : १. डेंग्यूताप-लहान मुलांमध्ये सौम्य ताप येतो, तर मोठ्यांना तीव्र ताप, डोकेदुखी, डोळे दुखणे, अंगदुखी, अशक्तपणा आणि अंगावर लाल चट्टा येतो.
२.डेंग्यूरक्तस्राव ताप- तापासोबतच बाह्य रक्तस्राव हा गंभीर प्रकार आहे. अंगावर लाल चट्टे उठतात. हिरड्यांमध्ये रक्तस्राव होतो किंवा अंतर्गत रक्तस्रावही होतो. यामध्ये प्लेटलेट्स कमी होऊन पोटात किंवा छातीत पाणी होते.
३.डेंग्यूअतिगंभीर आजार-डेंग्यू रक्तस्रावाचीच ही पुढची अवस्था आहे. रुग्ण अस्वस्थ होणे, थंड पडणे, नाडी मंदावणे, रक्तदाब कमी होऊन शेवटी रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.

ही घ्या काळजी
>पाणी उघडे ठेवू नका, परिसर स्वच्छ आणि कोरडा ठेवा
>डासांपासून बचाव करण्यासाठी मच्छरदाणी, कॉइल आणि वडीचा वापर करा.
>पांढरे, फिक्या रंगाचे कपडे घाला, संपूर्ण अंग झाकून राहील असे कपडे वापरा.

घाबरू नका, काळजी घ्या : डेंग्यूची लागण झालेल्या रुग्णाला पहिले पाच दिवस ताप असतो. मात्र, ताप उतरल्यानंतर प्लेटलेट्स झपाट्याने कमी होऊ लागतात. अशा वेळी तज्ज्ञांच्या निगराणीत राहणे गरजेचे आहे. उगाच घाबरून जाऊन प्लेटलेट्स देण्याचा आग्रह करू नका असे आवाहन बालरोगतज्ज्ञ डॉ. राजेंद्र खडके यांनी केले आहे.

असा पसरतो डेंग्यू : एडिस इजिप्ती नावाच्या डासापासून डेंग्यूचे संक्रमण होते. ताज्या आणि साठलेल्या पाण्यात हा डास अंडी घालतो. टायर, कुंड्या, नारळाच्या कवट्या आणि प्लास्टिकची भांडी यामध्ये डास वाढतात. या डासांचे चावा घेण्याचे प्रमाण दिवसा अधिक असते. दिवसांचे डासांचे जीवनचक्र आहे.

येथे मिळेल मदत
मनपाच्या आरोग्य केंद्रांमध्ये सकाळी ते या वेळेत मदत मिळू शकेल. याशिवाय २४ तास नियंत्रण कक्ष सुरू करण्यात आला आहे. ०२४०-२३३३५३६ या क्रमांकावर संपर्क साधावा.

अशी आहेत लक्षणे
>ताप येणे
>जबर डोकेदुखी
>डोळे दुखणे
>उलटी होणे
>मळमळ होणे
>रक्तस्राव होणे
>अंगावर लाल रंगाचे चट्टे येणे
बातम्या आणखी आहेत...