आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

पोलिसांवर हल्ला करणाऱ्या 2 अतिरेक्यांना 10 वर्षे शिक्षा; संशयितांना हटकताच केला होता गोळीबार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील हिमायतबाग एन्काउंंटरनंतर पोलिसांनी पकडलेल्या अकिल खिलजी व अबरार ऊर्फ मुन्ना यांना जिल्हा सत्र न्यायालयाने मंगळवारी १० वर्षांच्या सक्तमजुरीची शिक्षा सुनावली. हे दोघेही मूळ मध्य प्रदेशातील आहेत. या प्रकरणात इतर दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली असली तरी हे दोघेही इतर गुन्ह्यांमध्ये देशातील अन्य तुरुंगात आहेत. २०१२मध्ये झालेल्या या चकमकीत एक संशयित अतिरेकी मारला गेला होता.
 
दहशतवादी कारवायांच्या उद्देशाने औरंगाबादेत काही अतिरेकी घुसले असल्याची माहिती मिळाल्यानंतर हिमायतबागेत लपलेल्या संशयितांविरुद्ध पोलिसांनी कारवाई केली होती. या कारवाईदरम्यान संशयितांनी पोलिसांवर हल्ला करून गोळीबार केला होता. यात  मध्य प्रदेशातील खंडवा येथील अजहर उर्फ खलील अब्दुल वकील कुरेशी (२२) ठार झाला होता. तर, पोलिसांवर हल्ला करणारा मूळ इंदूरचा रहिवासी मोहंमद अबरार ऊर्फ मुन्ना ऊर्फ ईस्माईल ऊर्फ अब्दुल बाबू खाँ ( ३२) आणि खंडवा येथील मोहंमद शाकेर हुसेन उर्फ खलील अकिल खिल्जी (२०)   या दोघांना अटक करण्यात आली होती. या दोघांना तीन गुन्ह्यांत एकूण १४ वर्षाची शिक्षा भोगावयची असून तीनही शिक्षा एकाच वेळी भोगायचा असल्यामुळे शिक्षेचा कार्यकाळ १० वर्षांचा आहे. या दोघांनाही प्रत्येकी १५ हजारांचा दंड ठोठावण्यात आला असून तो न भरल्यास एक वर्ष तुरुंगवास भोगावा लागेल.

२३ साक्ष १६ दिवसात निकाल  : या प्रकरणात २३ साक्षीदार तपासले गेले. यात तत्कालीन निरीक्षक शिवा ठाकरे, नवीनचंद्र रेड्डी, शेख आरेफ, प्रशांत जायभाय, डॉक्टर संतपूरे, तत्कालीन पोलिस आयुक्त संजय कुमार, न्यायवैद्यक विभागाचे डॉक्टर यांच्यासह २३ जणांचा सहभाग होता. दोन गोपनीय साक्षीदारांची साक्षदेखील महत्वाची ठरली. ११ सप्टेंबर २०१७ ते २७ सप्टेंबरदरम्यान सर्व साक्षी नोंदवल्या. यानंतर दोन्ही पक्षांनी युक्तिवाद केला आणि मंगळवारी न्यायालयाने निकाल सुनावला.सरकारी पक्षातर्फे अॅड अविनाश देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अॅड. सुदेश शिरसाठ यांनी काम पाहिले. त्यांना नितीन मोने यांनी सहकार्य केले. पोलिसांकडून पैरवी अधिकारी म्हणून उपनिरीक्षक विठ्ठल चासकर आणि दीपाली निकम यांनी तर सीआयडीकडून संजय वाकळे यांनी पैरवी अधिकारी म्हणून काम पाहिले. आरोपी पक्षाकडून अॅड. तैवर पठाण, आय. ए. खान यांनी बाजू मांडली.
 
संशयितांना हटकताच सुरू केला होता गोळीबार
अहमदाबाद बॉम्बस्फोटातील फरार अतिरेकी शहरात येणार असल्याची माहिती २६  मार्च २०१२ रोजी एटीएसला मिळाली होती. तत्कालीन पोलिस अधीक्षक नवीनचंद्र रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक शिवा ठाकरे यांच्यासह पथक हिमायतबागेत दुपारी दाखल झाले. काही संशयितांना हटकताच त्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला.  यात हवालदार शेख आरेफ यांच्या खांद्याला गोळी लागली. पथकाने केलेल्या गोळीबारात अजहर उर्फ खलील अब्दुल वकील कुरेशी मारला गेला. पथकाने पाठलाग करून अबरार उर्फ मुन्ना यास  पकडले. चौकशीनंतर जफर हुसेन व अकिल खिलजीस अटक झाली.
 
जखमी पोलिसास मदत
या चकमकीत पोलिस कर्मचारी शेख आरेफ जखमी झाले होते. त्यांना ३० हजार रुपयांची मदत देण्याचे आदेश न्यायालयाने दिले.  या चकमकीनंतर तपासादरम्यान अटक करण्यात आलेला खंडव्याचा जफर हुसेन इक्बाल हुसेन कुरेशी (३३) आणि इंदूरचा अन्वर हुसेन इब्राहिम हुसेन खत्री (४०) यांची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता करण्यात आली. मात्र हे दोघेही त्यांच्यावर असलेल्या इतर गुन्ह्यात अटकेत आहेत.
 
चार गावठी कट्टे, दोन रिव्हॉल्व्हर केल्या होत्या जप्त
एन्काऊंटरनंतर पकडण्यात आलेल्या तिघांकडून पोलिसांनी चार गावठी कट्टे, दोन  रिव्हॉल्व्हर, १७  जिवंत काडतूस जप्त केली होती. त्या तिघांविरुद्ध भादंवि कलम ३०७, ३३३, ३५३, ३२५, ३३८, ३५२, ३३८ सह ३४, तसेच भारतीय हत्यार कायदा ३, २५, २७ आणि मुंबई पो. अॅक्ट १३५ नुसार गुन्हा दाखल करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते. यापैकी तीन गुन्ह्यांत दोन दोषींना शिक्षा सुनावण्यात आली. त्यांना एकत्रित १० वर्षांची शिक्षा आता भोगावयाची आहे. 
बातम्या आणखी आहेत...