आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हनुमान भक्तांसाठी १०० जादा बस

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - हनुमान जयंती निमित्त खुलताबाद येथे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी जिल्हा तसेच राज्यभरातून मोठ्या संख्येने भाविक येतात. त्यामुळे आैरंगाबाद, वैजापूर, गंगापूर, फुलंब्री, कन्नड, सिल्लोड, सोयगाव आदी ठिकाणांहून शंभरवर जादा बसेस सोडण्यात आल्या आहेत. खासगी वाहन घेऊन गेल्यास खुलताबाद येथे तीन ठिकाणी वाहनतळाची व्यवस्था असेल.
आैरंगाबादकडून खुलताबादकडे जाणाऱ्या कन्नडहून आैरंगाबादकडे येणाऱ्या वाहतुकीत बदल करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलिस अधीक्षकांनी दिली. आैरंगाबादहून कन्नडकडे जाणाऱ्या सर्व जड वाहनांना दौलताबाद टी पॉइंट येथून आनंद ढाबा, कसाबखेडामार्गे कन्नडला जाता येईल. या मार्गाने आैरंगाबादकडे जड वाहनांना यावे लागेल. ही व्यवस्था २१ रोजी रात्री वाजेपासून २३ एप्रिल सकाळी वाजेपर्यंत लागू राहील. कार, दुचाकीद्वारे जाणाऱ्या भाविकांसाठी दौलताबाद, अब्दीमंडीमार्गे जाता येईल. तसेच बसेसची अतिरिक्त व्यवस्था केल्याने भाविकांना बसेसद्वारे भद्रा मारुती दर्शनासाठी जाता येणार आहे. भद्रा मारुती दर्शनासाठी गुरुवारी (२१ एप्रिल) रात्रीपासूनच भाविकांनी रांगा लावल्या होत्या. कन्नड, गंगापूर, वैजापूर, फुलंब्री आदी ठिकाणांहून भाविक पायी चालत येत होते. जायंट्स ग्रुपच्या वतीने खाद्यपदार्थांचे खरकटे रस्त्यावर टाकू नये यासाठी दोनशेवर डस्टबिन बसवण्यात आल्याची माहिती प्रवीण सोमाणी यांनी दिली.

खुलताबाद येथे भद्रा मारुतीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांना पाणी पाऊच, खाद्यपदार्थ दिले जातात. त्याचा कचरा रस्त्यावर पडू नये म्हणून जायंट्स ग्रुपतर्फे यंदा औरंगाबाद-खुलताबाद रस्त्यावर डस्टबिन ठेवल्या आहेत.