आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Exclusive: पोलिसांचा 100 नंबर कनेक्ट होतो पुणे अन् उल्हासनगरला, तीन वर्षांपासून समस्या कायम

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद-  पोलिस नियंत्रण कक्षाचा १०० हा नंबर लोक कुठल्याही अडचणीत असले की लावला जातो. मात्र, हा नंबर कधी पुणे, कधी उल्हासनगर, तर कधी मुंबईच्या नियंत्रण कक्षाला लागतो. हा प्रकार गेल्या चार-दोन दिवसांपासून होत नाही, तर गेल्या तीन वर्षांपासून ही गंभीर समस्या कायम आहे. आता तर पोलिस आयुक्तालयाच्या नूतनीकरणाचे कारण पोलिस देत आहेत. मात्र, गेल्या तीन वर्षांत ही समस्या सोडवली गेली नाही.  यासारखा  दुसरा हलगर्जीपणा नसावा. डीबी स्टार चमूनेही काही दिवसांच्या अंतराने तीनदा हा क्रमांक लावून पाहिला असता हाच प्रकार समोर आला. एवढ्या महत्त्वाच्या सेवेबाबत ही अवस्था असेल तर गुन्हेगारी कशी नियंत्रणात येणार,  हा खरा प्रश्न आहे. 

अनेक महिन्यांपासून आम्हाला फोन...
गेल्या अनेक महिन्यांपासून औरंगाबादहून आम्हाला वारंवार फोन येतात. बहुतांश वेळा आम्ही ते औरंगाबाद कंट्रोल रूमला कळवतो; पण हा काय प्रकार आहे हे नागरिकांना कळत नाही. ते बुचकळ्यात पडतात. 
- चव्हाण, सहायक फौजदार, उल्हासनगर येथील बिनतारी संदेश यंत्रणा. 

आम्हालाही औरंगाबादहून असे फोन येतात. येथील बीएसएनएलच्या कार्यालयाशी आम्ही संपर्क करून आमच्या यंत्रणेची तपासणी केली असता ही समस्या आमच्याकडून नाही. त्यासाठी औरंगाबाद विभागानेच प्रयत्न करणे गरजेचे आहे. 
- पुणे येथील नियंत्रण कक्ष

२२ मे रोजी आलेला अनुभव

पहिला फोन...
प्रतिनिधी : हॅलो औरंगाबाद पोलिस नियंत्रण कक्ष ?
पोलिस हवालदार :– नाही हा नंबर पुणे नियंत्रण कक्षाला लागला आहे.
प्रतिनिधी : अहो पण मी औरंगाबादेत आहे आणि १०० नंबरला फोन केल्यावर तिकडे कसा लागतो ?
पोलिस हवालदार – : साहेब गेल्या अडीच-तीन वर्षांपासून अशीच बोंब सुरू आहे.
प्रतिनिधी : मग मी आता काय करू? मला अर्जंट औरंगाबाद पोलिसांशी बोलायचे आहे ?
पोलिस हवालदार – : मला सांगा, मी तेथील नियंत्रण कक्षाला तुमचा निरोप देतो किंवा तुम्ही अजून दोन-तीनदा फोन लावा. कदाचित  औरंगाबाद पोलिस नियंत्रण कक्षाला फोन लागेल.
प्रतिनिधी : ओके, मी फोन लावतो.

दुसरा फोन...
प्रतिनिधी : सर नमस्कार, औरंगाबाद पोलिस नियंत्रण कक्षाला फोन लागला आहे का ?
पोलिस कर्मचारी : हो सर, बोला, काय तक्रार आहे?
प्रतिनिधी : सर मी दिव्य मराठी प्रतिनिधी आहे, आम्हाला नागरिकांच्या तक्रारी आल्या होत्या की पोलिस नियंत्रण कक्षाला फोन लागत नाही, तो दुसऱ्या शहराच्या नियंत्रण कक्षाला लागतो. त्यामुळे ते तपासण्यासाठी फोन केला होता. याच्या आधीचा फोन पुणे पोलिस नियंत्रण कक्षाला लागला होता.
पोलिस कर्मचारी : होय, खूप दिवसांपासून हा प्रकार सुरू आहे. आपल्याकडचे फोन पुणे, उल्हासगर, मुंबई येथील पोलिसांना जात आहेत.
प्रतिनिधी : या समस्येवर तोडगा काय ?
पोलिस कर्मचारी : सर आम्ही बीएसएनएलला पत्रव्यवहार केला आहे, पण अद्यापही काम झालेले नाही, अजून पुढे किती दिवस लागतील हे सांगता येणार नाही.
प्रतिनिधी : ठीक आहे.

- ३० मे रोजी पुन्हा स्थिती जाणून घेण्यासाठी पोलिस कंट्रोल रूमला तीन वेगवेगळ्या नंबरवरून पाच ते सहा वेळा फोन केला असता सबस्क्रायबर उपलब्ध नाही, असा आयव्हीआर एेकायला येत होता आणि फोन कट होत होता.

फायबर ऑप्टिक केबलमुळे ही समस्या...
पोलिस प्रशासनाने फायबर ऑप्टिक वायरचा वापर नियंत्रण कक्षाच्या फोनसाठी केला असल्याने ही समस्या येते. याबाबत पोलिसांना आम्ही कॉपरच्या वायरचा वापर करण्यास सांगितले आहे. मात्र, त्यांनी पोलिस आयुक्तालयाचे नूतनीकरण सुरू असल्यामुळे ते झाल्यानंतर कॉपर वायर टाकू, असे आम्हाला सांगितले. आम्हीही प्रयत्न करत असून लवकरच ही समस्या सुटेल.
- बी. एन. चिटणीस, जनसंपर्क अधिकारी, बीएसएनएल.

समस्या दूर होईल
मला अशी समस्या आहे हे तुमच्याकडूनच कळत आहे. आता मी लगेचच नेमकी ही समस्या कशामुळे उद््भवली आणि त्यावर तत्काळ कोणता मार्ग काढता येईल हे पाहतो. ही समस्या लवकरात लवकर दूर होईल.
- यशस्वी यादव, पोलिस आयुक्त

मी स्वत: पाहणी करते
मला अाताच हा प्रकार कळाला आहे. या आधी काय होत होते आणि आता काय होत आहे याची माहिती घेते. नियंत्रण कक्षाला येणारे फोन खरेच दुसरीकडे जात आहेत का हे पाहून लवकरात लवकर यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न करते.
- दीपाली धाटे-घाडगे, पोलिस उपायुक्त

...इमर्जन्सीमध्ये या नंबरवर लावा फोन
औरंगाबाद नियंत्रण कक्षाला १०० नंबर लागत नसल्याने नागरिकांनी  ०२४० -२२२४०५०० या नंबरवर संपर्क करावा. हा नंबर शहर पोलिस नियंत्रण कक्षाचा लँडलाइन नंबर असून या नंबरवर फोन केल्यास आपल्याला मदत प्राप्त होईल.
बातम्या आणखी आहेत...