आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आईसोबत भाजीपाला विकून दिली दहावीची परीक्षा, शिवना येथील शीतल सपकाळचे यश

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शिवना: अख्या कुटुंबाचे ओझे खांद्यावर पेलणाऱ्या आईसोबत भाजीपाला विकून हातभार लावणाऱ्या सिल्लोड तालुक्यातील शिवना येथील शीतल यशवंता सपकाळ हिने अत्यंत प्रतिकूल परिस्थितीचा सामना करत दहावीच्या परीक्षेत ९५.२० टक्के गुण मिळवून यश संपादन केले आहे. तिच्या या यशाबद्दल सर्व स्तरातून तिचे कौतुक होत आहे. पुढे तिचे क्लास वन अधिकारी होण्याचे स्वप्न असले, तरी तिच्या स्वप्नाला दातृत्वाच्या पंखांची गरज आहे.

 पारंपारिक भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करणारी शीतलची आई धृपताबाई यशवंता सपकाळ यांच्यावरच कुटुंबाची सर्वस्वी जबाबदारी आहे. भूमिहीन असलेले हे कुटुंब तसे हातावरचेच काम, दिवसभर आठवडी बाजार करून, सायंकाळी भाजी मंडीत पुन्हा भाजीपाला विकायचा असाच त्यांना दिनक्रम. दोन मुली व एका मुलाच्या शिक्षणाची जाबाबदारीही धृपताबाईंवरच आहे. त्यात शाळेत अंत्यत हुशार व जिद्दी असलेली शीतल आईला भाजीपाला विक्रीत मदत करत असते. शीतलचे पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण येथील जिल्हा परिषद शाळेत झाले. परिस्थिती बिकट असल्याने ती नववीपर्यंत खाजगी क्लासेसलाही मुकली. मात्र शाळा आणि स्वयं अध्ययनावर तिने हे यश मिळविले. गणित हा तिचा आवडता विषय असून या विषयाला धरूनच तिला आता पुढचे करिअर करायचे आहे. शाळेचे मुख्याध्यापक ए.वाय.जुमडे, एन.बी. जाधव, श्रीमती तायडे एस.एल, गुरुवर्या क्लासेसचे पी.आर.राऊत, बी.एस.मैराळे, व्ही.ए.काळे यांचं मोलाचं मार्गदर्शन मिळाल्याचं ती सांगते. मुलीच्या शिक्षणासाठी वाट्टेल ते कष्ट सोसण्याची आईची तयारी आहे. पण शिक्षणावर येणाऱ्या खर्चाची चिंताही तिला सतावत आहे. शीतलच्या या जिद्द व मेहनतीला दातृत्वाच्या पंखांची गरज आहे.

एन.एम.एम.एस मध्येही यश..
आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटकातील एन.एम.एम.एस शिष्यवृत्ती परीक्षेतही शितलने इयत्ता आठवीत असताना यश मिळविले आहे. अशा विविध शिष्यवृत्तीसह शितलला सामाजिक पाठबळाची गरज असल्याची आई धृपताबाई यांनी दिव्य मराठीशी बोलताना सांगितले. तर दहावी परीक्षेत विशेष प्राविण्य घेऊन यश मिळविलेल्या शीतल काळे,वृषाली होळकर,संजीवनी साबळे,पूजा काळे यांच्या सोबत राहून केलेला स्पर्धत्मक अभ्यासाचा मोठा फायदा झाल्याचे शितलने सांगितले.
 
 
बातम्या आणखी आहेत...