आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

डास मारण्याच्या बॅटपासून तयार केला मीटर हँग करण्याचा रिमोट, 10वी पास इलेक्ट्रिशियन घरोघरी बसवायचा रिमोट

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शंभर रुपयांची डास मारण्याची बॅट बाजारात मिळते.  त्यातील किट काढून आरोपींनी मीटर हँग करण्याचा रिमोट कंट्रोल तयार केल्याचे समोर आले आहे. २०१३ पूर्वीचे मीटर या रिमोटने हँग होते. त्यानंतर महावितरणने मीटर बदलल्यानंतर हा रिमोट उपयोगी नसल्याचे लक्षात येताच या आरोपींनी चायनाचे सर्किट वापरून मीटरचे रीडिंग थांबवण्याचे तंत्र विकसित केले, अशी माहिती तपासात समाेर आली आहे.

शुक्रवारी अटक करण्यात आलेला किशोर रमेश राईकवार हा गेल्या दोन ते तीन वर्षांपासून लोकांच्या घरी जाऊन मीटरमध्ये तांत्रिक बदल करण्याचे काम करतो. त्याच्यासोबत मोठी टोळी असल्याचा संशय पोलिसांना आहे. किशोर हा फक्त दहावी पास आहे. मीटर उघडून मी काम करत असे, अशी कबुली त्याने पोलिसांना दिली आहे. रीडिंग कशी बंद करायची हे यूट्यूबवर पाहून शिकल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले.
 
चीनमधून येणाऱ्या सर्किटची देशभरात विक्री : चीनमधून भारतात येणाऱ्या या किटची लाखोंनी विक्री होते. इलेक्ट्रिक दुकानात केवळ २७० रुपयांना हे किट आणि रिमोट कंट्रोल मिळतो. हे सर्किट कशातही लावता येते. शहरातदेखील दर महिन्याला हजारोंच्या संख्येने हे किट विकले जातात. त्यामुळे याची विक्री करणाऱ्याला हे किट मीटरची रीडिंग थांबवण्याकरता उपयोगात आणले जाते याची कल्पना असावी, असा पोलिसांना अंदाज आहे. अशा प्रकारचा रिमोट बॉम्ब बनवण्यासाठीदेखील वापरला जाऊ शकतो. २० मीटरच्या आवारातून याचा वापर होऊ शकतो. त्यामुळे याच्या विक्रीवर निर्बंध असावेत, असे पत्र गृह खात्याला लिहिण्यात येणार असल्याचे पोलिस आयुक्त यादव यांनी सांगितले.
 
किमान एका घरात दोन हजारांची चोरी : अशाप्रकारे रिमोटचा उपयोग करणाऱ्या एका घरात किमान दोन हजार रुपयांची विजेची चोरी होते. महावितरणने केलेल्या पाहणीनुसार ज्या घरात हे रिमोट वापरण्यात आले आहेत, त्या ठिकाणी ३०० ते ४०० युनिटचा फरक पडतो. एका युनिटची किंमत ही पाच ते सहा रुपये असते. त्यामुळे एका घरात किमान दोन हजारांची चोरी होते, असा महावितरणचा अंदाज आहे. सिंगल फेज मीटरसाठी याचा वापर होतो. काही शाळा आणि कार्यालयांतदेखील अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याचे समोर आले आहे. ज्या घरात दोन ते तीन एसी आणि अत्याधुनिक इलेक्ट्रिकल साधने आहेत, त्या घरांनादेखील दर महिन्याला हजार-बाराशेच रुपये बिल येत असे, असेही तपासात समोर आले आहे.
बातम्या आणखी आहेत...