आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणिताचे 50 गुण वजा; अभ्यासक्रमातील काही भाग वगळला

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- एरवी अवघड वाटणारा गणिताचा विषय आता सोपा करण्यात आला असून दहावीच्या गणित विषयातील काही भाग अभ्यासक्रमातून वगळण्यात आला आहे. आता विषय केवळ शंभर गुणांचा असल्यामुळे विद्यार्थ्यांना दिलासा मिळणार आहे. हा नवीन बदल येत्या शैक्षणिक वर्षापासून अमलात येणार आहे.

गणिताचा पेपर 150 गुणांऐवजी 100 गुणांचा करण्यात आला आहे. बीजगणित व भूमितीच्या पाठय़पुस्तकातील उपघटक वगळण्यात आली असल्याची माहिती शिक्षण मंडळाच्या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

या बदलामुळे प्रश्नपत्रिका अगदी सोपी होणार आहे. गणिताविषयी विद्यार्थ्यांच्या मनात असलेली भीती निश्चितच कमी होईल, असे मत गणित विषयाच्या शिक्षकांनी व्यक्त केले आहे. वगळण्यात आलेल्या अभ्यासक्रमाची माहिती शाळांना कळण्यात आली असून नवीन बदलाचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यात येणार आहे. याबरोबरच यावर्षी दहावीचे विज्ञान आणि गणित वगळता सर्व अभ्यासक्रम बदलण्यात आला आहे.


अशी असेल गुणांची वर्गवारी
गणित आता 100 गुणांचे झाले असून यात 40 गुणांसाठी बीजगणित आणि 40 गुणांसाठी भूमिती असेल. त्यात 20 गुण हे प्रात्यक्षिके आणि गृहपाठासाठी असणार आहेत.

प्रमेयही आता नसेल
महत्त्व मापन प्रकरणातील क्षेत्रफळ काढणे हा विद्यार्थ्यांना अवघड वाटणारा आणि पेचात टाकणारा भाग वगळण्यात आला आहे. तसेच एकरूप त्रिकोणामधील 30,60,90 अंशांच्या कोनांचे प्रमुख व रेषा खंडाचा लंब दुभाजक आणि कोन दुभाजक प्रमेयदेखील वगळण्यात आला आहे.

असे आहेत अभ्यासक्रमातील बदल
असा होईल फायदा
बोर्डाने सर्व अभ्यासक्रम सीबीएसईच्या धर्तीवर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार हळूहळू अभ्यासक्रमात हे बदल करण्यात येत आहेत. कारण यामुळे राष्ट्रीय स्तरावरील पूर्व परीक्षांत विद्यार्थी गुणवत्ता सिद्ध करू शकतील. तसेच यामुळे विद्यार्थ्यांच्या मनातील अवघड विषयांची भीती दूर होण्यास मदत मिळेल.
-बाळासाहेब चोपडे , गणित शिक्षक, बाल ज्ञान मंदिर

गुणोत्तर, प्रमाण, चलन घटक आता नाही
गुणोत्तर आणि प्रमाणमधील चलन उपघटक आता अभ्यासक्रमात नाहीत, तर सांख्यिकीमधील आयतालेख आणि वारंवारता बहुजाकृती हे आलेख काढण्यात आले आहेत. भूमितीच्या रेषा, कोन प्रकरणातून वगळण्यात आल्या आहेत.

भूमिती
भूमितीच्या समरूपता या प्रकरणातून प्रमाणाचे मूलभूत प्रमेयाचा व्यत्यास, पायथागोरसचे प्रमेय आणि 30,60 90 कोन असलेला त्रिकोनाच्या प्रमेयांचा भाग वगळण्यात आला आहे. तसेच वतरुळमधील चक्रीय चौकोन या प्रमेयाचा आणि स्पर्शिका छेदिका या प्रमेयाचा अत्यंत अवघड वाटणारा भागही वगळण्यात आला आहे.

बीजगणित
दहावीच्या बीजगणिताच्या पहिल्या प्रकरणामधील अंकगणितीय मध्य आणि भूमितीय मध्य हे भाग आणि त्या संबंधीचे सर्व घटक वगळण्यात आले आहेत. तसेच या प्रकरणातील बेरजेचा गुणधर्म हा भागदेखील वगळण्यात आला आहे, तर सांख्यिकी भाग 2 मधील आयतालेख काढून बहुलक म्हणजे मोड आदी भाग नव्या रचनेत वगळण्यात आला आहे.