आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मदतीची अपेक्षा: विभागात साडेअकरा लाख शेतकऱ्यांचा पीक विमा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- दुष्काळ स्थितीमुळे यावर्षी पीक विम्याचे संरक्षण घेण्यासाठी सर्वत्र झुंबड उडाल्याचे दिसून आले. २८ जून ते ३१ जुलैदरम्यान खरीप २०१५ राष्ट्रीय पीक विमा योजनेंतर्गत औरंगाबाद, जालना आणि बीड जिल्ह्यातील ११ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी सुमारे ८७ कोटी ४७ लाख रुपयांचा विमा हप्ता भरून खरीप पिकांचा विमा उतरवल्याची प्राथमिक नोंद औरंगाबाद कृषी सहसंचालक विभागाने घेतली आहे. पुढे १ ते ७ ऑगस्ट दरम्यान पेरणी करणाऱ्यांना ७ ऑगस्टपर्यंत विमा घेण्याची सुविधा बँकेमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे.
कमी अथवा जास्त पाऊस, कीड व रोगाचा प्रादूर्भाव, पूर, चक्रीवादळ, गारपीट, दुष्काळ आदी नैसर्गिक आपत्तीपासून होणाऱ्या नुकसानाची भरपाई सरकार देते. त्यासाठी राज्यातील सर्व जिल्ह्यांसाठी पीक विमा योजना राबवण्यात येत आहे. यंदा भीषण दुष्काळ पडला आहे. पावसाअभावी औरंगाबाद विभागात(६ लाख २० हजार हेक्टर) १५ टक्के क्षेत्रावर खरीप पेरणी होऊ शकली नाही. सलग पाच आठवड्यांपासून पावसाने दडी मारली आहे. परिणामी राज्यातील १०६ लाख २८ हजार २०० हेक्टरवरील पिके धोक्यात आली आहेत.

कोरडवाहू क्षेत्रावरील पिके जळाली आहेत. दुबार पेरणीची वेळही निघून गेली आहे. यामुळे शेतकरी हवालदील झाला आहे. पीक विमा घेतल्यास केलेल्या खर्च तरी भरून निघेल, या आशेपोटी शेतकऱ्यांनी पीक विम्याला विशेष प्राधान्य दिले आहे.

गतवर्षी विभागातील १३ लाख ८५ हजार शेतकऱ्यांनी विमा उतरवला होता. त्या पैकी १२ लाख ७० हजार शेतकऱ्यांना ६०४ कोटी ६३ लाख ४२ हजार रुपये विम्याचा लाभ मिळाला. यंदाही भीषण दुष्काळाचे दाट सावट आहे. त्यामुळे प्रथमिक महितीनुसार ११ लाख ६९ हजार शेतकऱ्यांनी विमा घेतल्याची नोंद कृषी विभागाने केली आहे. आठ दिवसांत नवीन अहवाल बँकांकडून कृषी विभागाला प्राप्त होईल. त्यामध्ये हा आकडा आणखी वाढलेला असेल, असा विश्वास विभागीय कृषी अधीक्षक अधिकारी पंडित लोणारे यांनी दिव्य मराठीशी बोलताना व्यक्त केला.

नुकसानीची माहिती ४८ तासांत द्या
नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी मंडळ किंवा मंडळगट आणि तालुका गट या पैकी लागू असणाऱ्या अधिसूचित क्षेत्रावर आधारित पीक कापणी प्रयोगावार आधारित सरारी उत्पन्नाची आकडेवारी ग्राह्य धरली जाणार आहे. तसेच भारतीय कृषी विमा कंपनीकडून वैयक्तिक स्तरावर पंचनामे करून आपत्तीत होणारे नुकसान निश्चित करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांनी नुकसान झाल्यापासून ४८ तासांच्या आत कृषी विभागाला माहिती देणे आवश्यक आहे.

तीन जिल्ह्यांचा आलेख
जिल्हा शेतकरी संख्या रक्कम कोटीमध्ये
औरंगाबाद २ लाख १५ हजार १० कोटी ७५ लाख
जालना २ लाख ५४ हजार २१ कोटी ७२ लाख
बीड ७ लाख ५५ कोटी
एकूण ११ लाख ६९ हजार ८७ कोटी ४७लाख रुपये विमा हप्ता
बातम्या आणखी आहेत...