आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 11 Citizen Of Aurangabad Out Of Coverage In Uttarakhand

उत्तराखंडमध्ये अडकलेले औरंगाबादेतील 11 जण अजूनही संपर्काबाहेर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - चारधाम यात्रेसाठी गेलेल्या शहरातील झंवर आणि लाहोटी परिवारातील 12 जणांपैकी केवळ राजेश झंवर यांच्याशी संपर्क झाला असून इतर 11 जण बेपत्ता असल्याचे समोर आले आहे. सोनार, बिरारे आणि अतकरे कुटुंबांतील सर्व सदस्य सुखरूप असून त्यांच्याशी संपर्क झाला. औरंगाबादहून सोनार आणि बिरारे कुटुंबीयांचे तीन सदस्य हरिद्वारमध्ये आलेल्या सदस्यांना घेण्यासाठी डेहराडूनला शुक्रवारी (21 जून) विमानाने रवाना झाले आहेत.
आठ जून रोजी राजेंद्र झंवर, विनोद लाहोटी, ओम लाहोटी, अशोक अतकरे, भगवान पवार, बिरारे, वर्धमान रणदिवे, दयानंद भालेराव यांच्यासह 48 जण शहरातील विविध ठिकाणांहून रवाना झाले होते. त्यात काही जण अगोदर केदारनाथला, काही बद्र्रीनाथला, तर काही गुप्तकाशीला गेले होते. या वेळी ढगफुटी आणि नदीच्या प्रलयाने या ठिकाणी मृत्यूचे तांडव केल्याने हजारो यात्रेकरूंसह या लोकांचेही हाल झाले होते.


झंवर कुटुंबातील एकाच सदस्याशी संपर्क : राजेश झंवर यांच्यासह विनोद लाहोटी यांचे 12 जणांचे कुटुंब केदारनाथला गेले होते. त्यात तीन पुरुष, तीन महिला आणि सहा मुलांचा समावेश होता. त्यापैकी केवळ राजेश झंवर यांच्याशी 15 जूननंतर थेट 20 जून रोजी संपर्क झाला. 15 जून रोजी ते गौरीकुंडाजवळ होते. सर्वजण सोबत असताना अचानक मुसळधार पावसाला प्रारंभ झाला होता. दहा मिनिटांच्या आतच महापूर येऊन सर्वच जण विभक्त झाले. या वेळी राजेश झंवर हे बेशुद्धावस्थेत बचाव पथकाला सापडले होते. त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले. त्यांना शुद्ध आली तेव्हा त्यांच्याजवळ कोणीही नव्हते. त्यांनी इतर सदस्यांना शोधण्याचा प्रयत्न केला, पण कुणीच आढळून आले नाही. त्या दिवसापासून घरच्यांशीही त्यांचा संपर्क झाला नव्हता. मात्र, 20 जून रोजी गुप्तकाशीच्या पोलिस कंट्रोल रूममधून झंवर यांनी औरंगाबादला रात्री आठ वाजता फोन करून मी चांगला असल्याचे सांगितले.
सोनार आणि बिरारे परिवाराचा परस्परांशीही संपर्क तुटला : सोनार आणि बिरारे कुटुंबीयांचे आठ सदस्य होते. त्यात दोन महिला, चार मुले आणि दोन पुरुष आहेत. त्यांच्यातील संपर्कही तुटल्याने त्यांची परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यांना परत आणण्यासाठी औरंगाबादमधून सतीश सोनार, विजय बिरारे, तुषार थोरात हे डेहराडूनला रवाना झाले आहेत.


अतकरे, पवार कुटुंबीय सुखरूप : या महाप्रलयातून चौधरी ट्रॅव्हल्समध्ये असलेले अतकरे आणि पवार परिवाराचे 17 सदस्य सुखरूप असून त्यांना गौरीकुंडामध्ये दोन दिवस थांबावे लागले होते. त्यानंतर त्यांनी गुप्तकाशीला मुक्काम केला. तेथून केदारनाथला आणण्यात आले. तेथून हरिद्वार. तेथून दिल्लीपर्यंतची गाडी आठ वाजता असून दिल्लीहून शनिवारी (22 जून) दुपारी तीन वाजता औरंगाबादकडे रवाना होणार असल्याचे अशोक अतकरे यांच्या पत्नीने सांगितले.


भालेराव कुटुंबीय अडकले जंगलात : महाप्रलयातून सावरलेले दयानंद भालेराव व मधुमालती भालेराव आपल्या राजू कांबळे या भाच्यासह रामकुंड आणि रामपाडादरम्यान असलेल्या जंगलात अडकले असून त्यांच्यासोबत नांदेड, बीड, परभणी आणि इतर जिल्ह्यांतील भाविकही अडकलेले आहेत. त्यांना दोन दिवसांपासून कोणतीच सुविधा मिळत नसून ते मदतीच्या प्रतीक्षेत असल्याचे संजय भालेराव यांनी सांगितले.


रणदिवे कुटुंब परतले
वर्धमान रणदिवे, अनिता रणदिवे आणि अंकिता रणदिवे हे शुक्रवारी (21 जून) दुपारी औरंगाबाद शहरात तपोवन एक्स्प्रेसने मुंबईमार्गे पोहोचले आहेत. 14 जून रोजी वातावरणाचा अंदाज घेऊन बद्रीनाथहून केदारनाथला न जाता परत फिरले होते. त्यामुळे आमच्यावरील संकट टळले असल्याचे रणदिवे यांनी सांगितले.


खासदार खैरे उत्तराखंडला रवाना
उत्तराखंडातील भाविकांच्या मदतीसाठी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे हे शनिवारी सकाळी 7 वाजता दहा कार्यकर्त्यांसह जेट विमानाने दिल्लीला रवाना होणार आहेत, तर पंधरा कार्यकर्ते आधीच उत्तराखंडला रवाना झाले आहेत.