छायाचित्र: उत्तरपत्रिका फोडल्याच्या प्रकरणात औरंगाबादेत रविवारी अटक करण्यात आलेले आरोपी.
औरंगाबाद - यवतमाळ जिल्हा परिषदेअंतर्गत कृषी विस्तार अधिकारीपदाच्या लेखी परीक्षेच्या उत्तरपत्रिका विकणा-या विक्रीकर निरीक्षक, जिल्हा बँकेच्या दूध संघ शाखेतील लिपिक व परभणी आरटीओतील लिपिकासह ११ जणांना रविवारी आर्थिक गुन्हे अन्वेषण विभागाने अटक केली. त्यांच्याकडून इनोव्हा गाडी,
मोबाइल असा १६ लाख ५७ हजार ५५० रुपयांचा ऐवज व उत्तरपत्रिकेच्या हस्तलिखित प्रती जप्त करण्यात आल्या. प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी एस. आर. शर्मा आरोपींना ८ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली.
यवतमाळ जिल्हा परिषदेत कृषी विस्तार अधिकारी, कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) या पदांसाठी दोन नोव्हेंबर रोजी लेखी परीक्षा होती. या परीक्षेच्या उत्तरपत्रिका औरंगाबाद येथील विक्रीकर निरीक्षक मकरंद मारुती खामणकर (४३) व इतर साथीदार विकत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार आर्थिक गुन्हे शाखेने छापा टाकून त्यांना अटक केली. शाखेचे उपनिरीक्षक विश्वास रोहिदास पाटील यांच्या फिर्यादीवरून आरोपींविरुद्ध सातारा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. तपास अधिकारी म्हणून शाखेचे निरीक्षक मधुकर सावंत यांनी काम पाहिले. न्यायालयात सरकार पक्षातर्फे अॅड. शोभा विजयसेनानी यांनी काम पाहिले.
अटकेतील आरोपी : मकरंद मारुती खामणकर (४३), दादासाहेब राघोबा वाडेकर (५०, किणी, सोयगाव), भागीनाथ साहेबराव गायके (३६, शेवगा), विनोद दत्तात्रय वरकड (४०, लिपिक, जिल्हा बँक, शाखा जिल्हा दूध संघ, औरंगाबाद), पोपट नथू कऱ्हाळे (३४, लिपिक, आरटीओ ऑफिस, परभणी), महेश आनंदराव गायकवाड (२५, विद्यार्थी, धामणगाव रेल्वे, जि. अमरावती), महादेव रामदास नायसे (२५, विद्यार्थी, बोरगाव मंजू, अकोला), सुरेश भीमराव आरसूळ (२२, विद्यार्थी, परंडा, अंबड), काळुसिंग पन्नालाल नायमनी (२६, वाहनचालक, शेवगाव, औरंगाबाद), केशव लिंबाजी सोनकांबळे (४२, वाहनचालक), सचिन वाल्मीकराव गायकवाड (३१, वाहनचालक).
असे पकडले आरोपी : उत्तरपत्रिका विकल्या जात असल्याची माहिती पोलिस आयुक्त राजेंद्रसिंह यांना मिळाली. त्यानंतर उपायुक्त वसंत परदेशी, अरविंद चावरिया, एसीपी बाबाराव मुसळे, निरीक्षक मधुकर सावंत, एपीआय कृष्णा शिंदे, उपनिरीक्षक विश्वास पाटील यांनी सातारा परिसरात सापळा रचून दोन इनोव्हा,
होंडा सिटी आणि इंडिका कारमध्ये फिरणा-या ११ जणांना अटक केली.
क्लासेसच्या माध्यमातून कारस्थान
मकरंद व त्यांचा साथीदार दादासाहेब वाडेकर यांनी स्पर्धा परीक्षांचे क्लासेस सुरू केले होते. मकरंद नोकरीला लागण्यापूर्वीपासून ते सुरू होते. दरम्यान, परीक्षेच्या प्रश्नपत्रिका मिळवून हस्तलिखित उत्तरपत्रिका तयार करून विकताना त्यांना अटक झाली. हाती लागलेल्या कागदपत्रांनुसार पैसे कोडवर्डमध्ये लिहिले होते. या प्रकरणात राज्यस्तरावरील टोळी असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.