आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कॉलेजांची शिक्षा विद्यार्थ्यांना; बोर्ड सचिवांना घेराव, दोन दिवसांत निर्णयाची शक्यता

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेस बसू द्यावे, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना आणि शिवसेना युवा सेनेच्या वतीने मंगळवारी महाराष्ट्र माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचे सचिव प्रकाश पठारे यांना घेराव घालण्यात आला.

दहावीच्या परीक्षेत 40 टक्के गुण असतानाही शहरातील काही महाविद्यालयांनी या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश दिला. बोर्डाच्या नियमानुसार हा प्रकार गैर आहे, पण दोन वर्षे बोर्डाचे पदाधिकारी झोपले होते काय, अशा आशयाचे वृत्त सर्वप्रथम ‘दिव्य मराठी’ने प्रसिद्ध केले. बोर्डाने 103 विद्यार्थ्यांना परीक्षेस बसण्यास अपात्र ठरवले आहे. या विरोधात मंगळवारी मनविसे आणि शिवसेना विद्यार्थी आघाडीच्या वतीने एसएससी बोर्डासमोर जोरदार आंदोलन केले. पालकही सहभागी झाले होते. आंदोलनानंतर विद्यार्थी नेत्यांनी बोर्डाच्या सचिवांना निवेदन सादर केले.

दरवर्षी महाविद्यालयांची तपासणी शिक्षण उपसंचालक आणि शिक्षण विस्तार अधिकारी यांच्यामार्फत केली जाते. बोर्डाच्या नियमानुसार 40 टक्केपेक्षा कमी गुण असणार्‍या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेत प्रवेश देता येत नाही. बोर्डाचा नियम डावलून काही महाविद्यालयांनी विज्ञान शाखेत प्रवेश दिला. या नियमाबद्दल पालक आणि विद्यार्थ्यांना अनभिज्ञ ठेवण्यात आले. प्रवेश देणार्‍या शिक्षण संस्था या राजकीय नेत्यांच्या आहेत. महाविद्यालयांच्या चुकीची शिक्षा विद्यार्थ्यांना का? असा सवाल आंदोलनात सहभागी झालेल्या पालकांनी केला. दोन वर्षांपूर्वीच वस्तुस्थिती कळली असती तर विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला नसता. या प्रकरणात महाविद्यालये दोषी आहेत, पण त्यांच्याकडे कानाडोळा करणारे बोर्डदेखील दोषी असल्याचा आरोप या वेळी करण्यात आला. निर्णय विद्यार्थ्यांसाठी अन्यायकारक आहे. त्यांना परीक्षेस बसू द्यावे, अशी मागणी संघटनांनी केली.

युवा सेनेचे जगन्नाथ काकडे, ऋषिकेश खैरे, संतोष माने, सतीश पवार, अविनाश जाधव, धीरज पवार, गणेश तेलोरे, मिथुन व्यास आणि मनविसेचे जिल्हाध्यक्ष सुमीत खांबेकर, राज वानखेडे, जयकुमार जाधव, अमोल खडसे, विशाल आहेर, सचिन जिरे, अमजद खान, सुभाष साबळे आदींची उपस्थिती होती.

अपात्र विद्यार्थी संख्या वाढली : कमी गुण असतानाही विज्ञान शाखेला प्रवेश दिलेल्या आणि बारावी बोर्डाने परीक्षेस अपात्र ठरवलेल्या विद्यार्थ्यांची संख्या वाढली आहे. तसेच ही संख्या आणखी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रविवारपर्यंत ही संख्या 903 होती. ती आता 1 हजार 63 पर्यंत गेली आहे. आणखी 158 महाविद्यालयांची तपासणी करावयाची आहे.

40 गुणांपेक्षा कमी विद्यार्थी संख्या असलेल्या विद्यार्थ्यांना विज्ञान शाखेस प्रवेश देण्यात येऊ नये हा नियम माहीत नव्हता. माझ्या मुलीला परीक्षेस अपात्र ठरवल्याचे पत्र मिळाल्यावर कळले. महाविद्यालयांना नियम माहिती होते तर त्यांनी पालकांची आणि विद्यार्थ्यांची दिशाभूल करायला नको होती. विद्यार्थ्यांचे नुकसान होऊ नये आता एवढीच इच्छा आहे अशी भावना पालक एस. आर. जोशी यांनी व्यक्त केली.