आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जादुई हात, फूल उमलावं तशी सहज काढतो चित्रे, 7 व्या वर्षीच श्रीगणेशा

11 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

दशमेशनगरमध्ये राहणार्‍या आणि टेंडर केअर शाळेत 7 वीच्या वर्गात शिकणार्‍या या प्रतिभावान मुलाचे नाव आहे अथर्व. वडील महेश पांडे शासकीय कंत्राटदार, तर आई मनीषा गृहिणी. आपल्या कलावंत मुलाची कला विकसित व्हावी आणि जगभरात त्याचे नाव व्हावे यासाठी अत्यंत विपरीत परिस्थितीत हे दांपत्य संघर्ष करत आहे. एवढय़ा लहान वयात अशी जगावेगळी प्रतिभा असू शकते हे ऐकूण डीबी स्टारनेही उत्सुकतेपोटी अथर्वची भेट घेतली. गप्पा मारतानाही तो कागद पेन्सिल घेऊनच बसला होता. सहज रेघोट्या ओढता ओढता अथर्वने अवघ्या अध्र्या तासात आमच्या प्रतिनिधीचे चित्र हुबेहूब रेखाटले.
बाळाचे पाय पाळण्यात दिसतात
शाळेतील कला शिक्षक प्रमोद दवले यांना सर्वप्रथम अथर्वच्या बोटातील जादू लक्षात आली. पाचवीत असताना शाळेत महान व्यक्तींचे चित्र काढण्याचा प्रोजेक्ट देण्यात आला. बहुतेक विद्यार्थ्यांनी चित्रपट कलाकार तसेच क्रिकेटपटूंची चित्रे इंटरनेटवरून डाऊनलोड करून आणली. अथर्वने शास्त्रज्ञ लुई पाश्चर यांचे चित्र काढले. या चित्राचे खूप कौतुक झाले. मग शाळेने सर्वच शास्त्रज्ञांची चित्रे काढून आणण्याचा ग्रुप प्रोजेक्ट दिला. याची जबाबदारी अथर्वकडे सोपवण्यात आली. त्याला पोट्रेटचा सराव नव्हता. घराशेजारीच गायत्री दास नावाच्या एक कला शिक्षिका राहायच्या. त्यांनी पोट्रेटची मूलभूत माहिती त्याला दिली. यानंतर अवघ्या 7 दिवसांत अथर्वने 13 शास्त्रज्ञांचे पोट्रेट काढून शाळेत दिले.
विश्वास बसत नाही
एवढा लहान मुलगा एखाद्या कसलेल्या मोठय़ा कलाकाराप्रमाणे चित्रे काढतो, यावर कुणाचाही विश्वासच बसत नाही. लिम्का बुकने नोंद घ्यावी यासाठी वडील महेश पांडे यांनी अथर्वचा प्रोफाइल पाठवला होता, पण त्यांना प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे पांडे हे पुन्हा नव्याने ही प्रक्रिया करणार आहेत.
सर्व काही मुलासाठी..
अथर्वच्या कलागुणांना चालना देण्यासाठी त्यांच्या वडिलांनी या क्षेत्रातील तज्ज्ञांच्या भेटी आणि त्यातून मार्गदर्शन घेण्यास सुरुवात केली. कोणताही क्लास न लावता स्वयंस्फूर्तीने त्याची कला विकसित होऊ द्या, असे काही तज्ज्ञांनी सांगितले. आई-वडिलांनी आपले जीवन मुलावर केंद्रित केले आहे. त्याने याच क्षेत्रात यश मिळवावे यासाठी ते अथर्वच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत.
यांना साकारले कॅनव्हासवर
राष्ट्रपती प्रतिभा पाटील, स्वामी विवेकांनद, स्वातंत्र्यवीर सावरकर, गोपाळ गणेश आगरकर, कुमार गंधर्व, जयंत नारळीकर, होमीभाभा, आर्यभट्ट, आइनस्टाइन.
बंद केले रॅपिड स्केचिंग
सातवीत असताना अथर्वने रॅपिड स्केचिंग प्रकारातील चित्रे काढण्यास सुरुवात केली होती. या प्रकारात 2-3 मिनिटांत चित्रे काढली जातात. मात्र, तज्ज्ञांनी हा प्रकार कलेसाठी घातक असल्याचे सांगितले. यामुळे त्याने रॅपिड स्केचिंग पूर्णपणे थांबवली आहे.
मूर्तिकाम, स्वीमिंग आणि अभ्यासही
एवढय़ा लहान वयातच अथर्वचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी बनले आहे. तो सुरेख मूर्तिकामही करतो. त्याने गणपतीच्या आकर्षक मूर्ती बनवल्या आहेत. अँबॅकस स्पध्रेत त्याने आठ लेवल पूर्ण केल्या आहेत. पोहण्यातही तो तरबेज असून विविध स्पर्धेत त्याने सुवर्णपदकांची कमाई केली आहे. हे सगळे करताना त्याने अभ्यासाकडे कधीच दुर्लक्ष केलेले नाही. आतापर्यंत अथर्वने कधीही 90 टक्क्यांच्या खाली मार्क घेतलेले नाहीत.
विविध पुरस्काराने सन्मानित
केंद्र सरकारच्या सेंटर फॉर कल्चर रिसोर्सेस अँण्ड ट्रेनिंगच्या वतीने दिल्या जाणार्‍या शिष्यवृत्तीसाठी निवड.
> मुंबईच्या स्मार्ट किड्स क्रिएशन संस्थेच्या वतीने आयोजित राष्ट्रीय पातळीवरील चित्रकला स्पध्रेत तिसरे पारितोषिक.
> झी-मराठी वाहिनीच्या मराठी पाऊल पडते पुढे कार्यक्रमात तिसर्‍या लेव्हलपर्यंत मजल.
> राष्ट्रपती बालर्शी पुरस्कारासाठी नामांकित.
> गरवारे कम्युनिटी सेंटरच्या वतीने आयोजित महाराष्ट्र माझा थीमवरील चित्रकला स्पध्रेत प्रथम पुरस्कार
> आंतरराष्ट्रीय सायन्स आणि मॅथेमॅटिक्स ऑलम्पियाडमध्ये पारितोषिक
अजून खूप शिकायचेय
माझ्या चित्रांचे कौतुक पाहून मला चांगले वाटते. माझे आई-बाबा आणि माझे कला शिक्षक यांच्या मार्गदर्शनामुळेच मला हे शक्य होत आहे. अजून खूप शिकायचेय. नवनवीन तंत्रज्ञान आत्मसात करायचे आहे.
-अथर्व पांडे, चित्रकार
खूप मोठे व्हायचे आहे
अथर्वला चित्रकलेची नैसर्गिक देणगी मिळालेली आहे. कोणतेही चित्र हुब्ेाहूब काढण्याचे त्याचे कसब कोणालाही आश्चर्यचकित करून जाते. ही चित्रे त्यानेच काढली आहेत, हे पटवून देताना आमची दमछाक होते. त्याला अजून खूप मजल गाठायची आहे. आपले शहर, देशाचे नाव मोठे करायचे आहे. -मनीषा आणि महेश पांडे, अथर्वचे आई-वडील