आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जलयुक्त शिवारच्या अपुऱ्या कामांसाठी हवेत १२०० कोटी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - मराठवाड्यात जलयुक्त शिवार योजनेअंर्तगत गेल्या वर्षी १६८२ गावांची निवड करण्यात आली. या वर्षी राज्य सरकारने जलयुक्त शिवारसाठी अर्थसंकल्पात हजार कोटींची तरतूद केली असली तरी प्रलंबित कामांसाठीच १२०० कोटी रुपये लागणार आहेत. त्यामुळे अपूर्ण राहिलेली कामे पूर्ण केली तरच त्याचा फायदा पावसाळ्यात पाहायला मिळणार आहे. त्यामुळे पालकमंत्र्यांनी प्रलंबित कामांचा आढावा घेण्याची मागणी आमदार प्रशांत बंब यांनी केली आहे.
मराठवाड्यात गेल्या वर्षी १६८२ गावांची निवड करण्यात आली होती. निधीअभावी मार्चपर्यंत ही कामे पूर्ण होण्याची शक्यता नाही. एकीकडे निधीअभावी ही कामे खोळंबली असताना या वर्षासाठी १५२२ गावांत नव्याने कामे करण्यात येणार असल्यामुळे प्रलंबित कामे आणि नवीन कामे करण्याचे आव्हान प्रशासनासमोर आहे. मराठवाड्यात २०१५-१६ अंतर्गत १६८२ गावांत ६७,३३३ कामांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी ४२,७५२ कामे पूर्ण झाली. मात्र, अजूनही २४,७६१ कामे अपूर्ण आहेत.

यापैकी एकट्या उस्मानाबाद जिल्ह्यात सर्वाधिक १९,०४० कामे प्रगतिपथावर आहेत. लातूर जिल्ह्यात १९८४, औरंगाबाद १२९०, जालना ८७६, बीड २६२, परभणी ६९६, हिंगोली ९९ आणि नांदेड जिल्ह्यात ५१४ कामे करणे बाकी आहेत. मार्चपर्यंत ही कामे पूर्ण करण्याचे आदेश मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच दिले आहेत.

मात्र, अपुऱ्या निधीअभावी ही कामे खोळंबली आहेत. या कामांसाठी १२०० कोटी रुपये लागणार असल्याचा प्रस्ताव पाठवण्यात आलेला आहे. १६८२ गावांसाठी २२६६ कोटी ६८ लाख रुपयांचे नियोजन करण्यात आले होते. त्यापैकी राज्य केंद्र शासनामार्फत ६८९ कोटी ६० लाखांचा निधी मिळाला. यामध्ये गॅप फंडिंगच्या माध्यमातून ३४१ कोटी रुपयांचा निधी मार्चअखेरपर्यंत आणि एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात मिळणार आहे. अजूनही १२०० कोटींचा निधी लागणार आहे.

अतिरिक्त निधी द्यावा
^जलयुक्तशिवारची कामे पूर्ण झाल्यास कमी वेळेत चांगला परिणाम पाहायला मिळेल. त्यामुळे शासनाने मराठवाड्यासाठी उर्वरित निधी देऊन प्रलंबित कामे पूर्ण केली पाहिजेत. नवीन गावात कामे करताना आधीची कामे पूर्ण करावी. - शंकरराव नागरे, सदस्य,मराठवाडा विकास मंडळ

कामांचा आढावा घ्या
^जलयुक्त शिवारमध्ये हजार ते १२०० कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यामुळे हा निधी तातडीने देणे गरजेचे आहे. मराठवाड्यातील सर्व पालकमंत्र्यांनी कामाचा आढावा घ्यावा. ही कामे पूर्ण केली तरच पावसाळ्यापूर्वी त्याचा फायदा मिळेल. - प्रशांत बंब, आमदार

नियोजन केले
१६८२ गावांत जलयुक्त शिवार योजनेअंतर्गत कंपार्टमेंट बंडिंग, पाणलोट क्षेत्र विकासाची कामे, सिमेंट नाला बांध, शेततळे, माती नाला बांधाची दुरुस्ती, नाला खोलीकरण, गाळ काढणे, विहीर पुनर्भरण आदी कामांचे नियोजन करण्यात आले आहे. मात्र, ही कामे सुरू असली तरी १०० टक्के पूर्ण झालेल्या गावांची संख्या फक्त ३७ इतकी आहे. १४४ गावांत ८० टक्के कामे पूर्ण, ३२५ गावांत ५० टक्के, तर ५१० गावांत ३० टक्के आणि ६६६ गावांत ३० टक्क्यांपेक्षा कमी कामे झाली आहेत.

इतर योजनांतून निधी मिळवावा लागेल
^गेल्या वर्षीच्या१६८२ कामांसाठी निधीची कमतरता असून तसा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे. त्यासाठी इतर अनेक योजनांमधून आणखी निधी मिळवावा लागेल. जूनपर्यंत ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करावे लागतील. नव्याने जी गावे निवडली आहेत त्यांचे कामदेखील सुरू करण्यात येणार आहे. -डॉ. उमाकांत दांगट, विभागीयआयुक्त
बातम्या आणखी आहेत...