आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बारावी परीक्षेवर संक्रांत!

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - दहावीत 40 टक्क्यांहून कमी गुण असतानाही कॉलेजांनी अकरावीत प्रवेश दिलेले आणि यंदा बारावीच्या परीक्षेला बसलेले विज्ञान शाखेचे एक हजार विद्यार्थी अडचणीत आले आहेत. येत्या 21 फेब्रुवारीपासून सुरू होणार्‍या परीक्षेच्या तयारीला लागलेले असतानाच एचएससी बोर्डाने परीक्षेचे आवेदनपत्र रद्द करत त्यांना अपात्र ठरवले आहे. 2010-11मध्ये दहावी झालेले विद्यार्थी यंदा बारावी विज्ञानची परीक्षा देत आहेत.
एका तक्रारीनंतर ही बाब बोर्डाच्या लक्षात आली. विशेष म्हणजे या विद्यार्थ्यांनी यंदाच्या परीक्षेसाठी अर्जही सादर केले आहेत आणि परीक्षाही तोंडावर आली आहे. अशा वेळी बोर्डाने असा निर्णय घेतल्याने सुमारे एक हजार विद्यार्थ्यांची दोन वर्षे वाया जाण्याची भीती निर्माण झाली आहे. तथापि, शिक्षण मंडळाने मात्र संपूर्ण दोष महाविद्यालयांच्या माथी मारला आहे. विद्यार्थिसंख्या वाढवण्यासाठी खासगी संस्था दहावीत कमी गुण असले तरी विद्यार्थ्यांना हव्या त्या शाखेला प्रवेश देतात. त्यामुळेच असे प्रकार होतात, असे काही संघटनांचे म्हणणे आहे.
चौकशी केली जाईल : शिक्षण राज्यमंत्री
नियम महाविद्यालयांनी पाळायला हवेत. अद्याप हे प्रकरण माझ्यापर्यंत आलेले नाही. तथापि, संपूर्ण चौकशी करूनच या प्रकरणी निर्णय घेतला जाईल, अशी प्रतिक्रिया राज्याच्या शिक्षण राज्यमंत्री फौजिया खान यांनी दिली आहे.

बोर्ड म्हणते, चूक कॉलेजांची; प्राचार्य म्हणतात, बोर्डाची!


नियम काय आहे
शाळासंहिता 1965-67च्या नियमान्वये 10वीत 40पेक्षा
कमी टक्केवारी असलेल्यांना सायन्सला प्रवेश देता येत नाही.

कॉलेजांना कळवले
नियमावर बोट ठेवून बोर्डाने 903 विद्यार्थ्यांना परीक्षेपासून वंचित ठेवण्याचा निर्णय संबंधित महाविद्यालयांना कळवला आहे.

नियमावली दिली जाते
शिक्षणसंहितेच्या नियमावलीची प्रत दरवर्षी कॉलेजांना दिली जाते. तरीही अशा रीतीने प्रवेश दिला जातो, असे बोर्डाचे सचिव पठारे म्हणतात.

आंदोलनाचा इशारा
देवगाव रंगारी (ता. कन्नड) येथील गणेश कनिष्ठ कॉलेजातील विद्यार्थ्यांच्या पालकांनी बोर्डाकडे निवेदन पाठवले आहे. निर्णय न बदलल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. या प्रकरणी न्यायालयात जाण्याचेही त्यांनी म्हटले आहे. निवेदनावर 11 पालकांच्या सह्या आहेत.

परीक्षा तोंडावर...
बारावी सायन्सची महिनाभर चालणारी परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरू होत आहे. औरंगाबाद बोर्डात 1 लाख 13 हजार 540, तर शहरात 40 हजार 816 विद्यार्थी परीक्षा देत आहेत.

प्राचार्यांशी चर्चा करू
नियम डावलून कॉलेजांनी प्रवेश दिले आहेत. त्यामुळे कॉलेजांनी अशा चुका कशा काय केल्या? अशी किती महाविद्यालये आहेत, हे प्राचार्यांशी चर्चा केल्यावरच स्पष्ट होईल. 26 जानेवारीपूर्वी निर्णय घेऊ.’
प्रशांत पठारे, विभागीय सचिव

शिक्षणमंत्र्यांना भेटू
आमच्या कॉलेजचे काही विद्यार्थी अपात्र ठरले आहेत. बोर्डाने पूर्वीच कागदपत्रे तपासायला हवी होती. चूक बोर्डाची आहे. आता पालक कॉलेज व बोर्ड दोघांनाही दोष देत आहेत. या प्रकरणी आम्ही शिक्षणमंत्र्यांची भेट घेऊन दाद मागणार आहोत.’
भागवत कटारे, मत्स्योदरी कॉलेज, अंबड.

बोर्डाने केले 903 अर्ज रद्द

प्रवेश देतानाच महाविद्यालयांनी नियम पाळायला हवा होता. तसे न करता महाविद्यालयांनी कमी गुणधारकांना प्रवेश दिला. याबाबत बोर्डाकडे एक तक्रार आली होती. त्यावरून बोर्डाने अशा प्रकारच्या 903 विद्यार्थ्यांचे परीक्षेसाठीचे अर्ज अवैध ठरवले आहेत. तथापि, याबाबत विचार करूनच निर्णय घेऊ, असे मंडळाच्या सहायक सचिव डॉ. लतिका नरवडे यांनी म्हटले आहे.