आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 12th Mass Copy In Kannad, Aurangabad News In Marathi

औरंगाबादजवळ \'मास कॉपी\', संस्थाचालकाच्या घरातच सोडवला पेपर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कन्नड, औरंगाबाद - इंग्रजीचा पेपर म्हणजे विद्यार्थी व संस्थाचालकांना कायम धास्ती. संस्थेच्या अस्तित्वाचा व प्रतिष्ठेचा हा प्रश्न. यावर संस्थाचालक-शिक्षकांनी शुक्रवारी नामी उपाय शोधला. विद्यार्थ्यांना ‘मदत’ करण्यासाठी शिक्षकही सरसावले आणि ही मंडळी संस्थाचालकाच्या घरीच पेपर सोडवत बसली. बिंग फुटले तेव्हा पोलिसांनी दोन शिक्षकांसह पाच जणांना रंगेहाथ पकडले. कन्नड तालुक्यातील तेलवाडी येथे कै. वसंतराव नाईक माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळेचे अध्यक्ष उत्तमराव राठोड यांच्या घरात सकाळी साडेअकराच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला.
पोलिसांनी बारावी इंग्रजी विषयाच्या चारही सेटच्या प्रश्नपत्रिकांचे झेरॉक्स व त्यातील काही प्रश्नांची उत्तरे लिहिलेले कागद जप्त करण्यात आले आहेत. विद्यार्थ्यांना सामूहिक कॉपी पुरवण्यासाठी शिक्षक व काही मतदनीसांची ही उठाठेव सुरू होती, असे पोलिसांनी सांगितले. या प्रकरणी संस्थाचालक उत्तमराव राठोड यांच्यासह पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तहसीलदार महेश सुधळकर, प्रभारी गटशिक्षणाधिकारी संगीता सावळे, नायब तहसीलदार दत्ता निलावाड, पर्यवेक्षिका के. एस. पदकोंडे यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आला असून आरोपी पोलिसांच्या ताब्यात आहेत. पोलिस पथकात निरीक्षक खुशाल शिंदे, सहायक पोलिस निरीक्षक प्रमोद भातनाते, कैलास निंभोरकर, जालिंदर तमनार, केशरसिंग राजपूत, अंकुश सरोदे, अशोक मुळे, सुरेश साळवे यांचा समावेश होता.
शिक्षकांनाच उत्तरांची घाई!
या आश्रमशाळेत 392 विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत. कॉप्या सुरू झाल्याचा सुगावा लागताच पोलिस दाखल झाले. संस्थाचालक उत्तमराव राठोड यांच्या घरी त्यांनी छापा मारला. या वेळी अंधानेर वस्तीशाळेचे शिक्षक शिवाजी फकीरराव सारंग, तेलवाडीचे शिक्षक हरीश प्रभाकर इंगळे, चाळीसगाव तालुक्यातील संतोष उत्तमराव राठोड, तेलवाडीचेच गोरख धर्मा राठोड व प्रकाश मोहन राठोड ही मंडळी प्रश्नपत्रिकांच्या झेरॉक्सवरून कोर्‍या कागदावर प्रश्नांची उत्तरे लिहीत होती.
म्हणे सराव परीक्षेची तयारी : पोलिसांनी पकडले तेव्हा या मंडळींनी पुढील सराव परीक्षांची तयारी सुरू असल्याचे अफलातून कारण सांगितले. सापडलेली प्रश्नपत्रिका पोलिसांनी तपासली तेव्हा ते मूळ प्रश्नपत्रिकेचे चार संच असल्याचे स्पष्ट झाले.
नेमलेले बैठे पथक निवडणुकीच्या कामात
कॉपीमुक्तीसाठी शासनाने प्रत्येक केंद्रावर बैठ्या पथकाची नेमणूक केली आहे. तेलवाडी शाळेत पंचायत समितीचे कृषी अधिकारी एम. आर. मामीडवार व ग्रामविकास अधिकारी सी. एस. ढवळे यांची पथकात नेमणूक असल्याचे प्रभारी गटशिक्षणाधिकारी संगीता सावळे यांनी सांगितले; परंतु परीक्षा सुरू झाल्यापासून संपेपर्यंत दोन्ही अधिकारी परीक्षा केंद्राकडे फिरकलेच नाहीत. याबाबत मामीडवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सध्या आपण निवडणुकीच्या कामात असल्याचे सांगितले.

छायाचित्र - गदाना केंद्रावरही सापडल्या 55 झेरॉक्स प्रती.
छाया : अरुण तळेकर
महाराष्ट्रातील शिक्षण पद्धत आणि काही ठिकाणी होत असलेली 'मास कॉपी' यावर आपल्याला काय वाटते...आपली प्रतिक्रिया द्या...आमच्या फेसबुक पेजला भेट द्या....