आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या खात्यांवर ग्रामीण बँकेकडून 13 कोटी 40 लाख जमा; 1896 जणांना धनलाभ

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
करमाड- कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या औरंगाबाद जिल्ह्यातील १८९६ शेतकऱ्यांना दिवाळीनंतर लक्ष्मीदर्शन घडले. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत या शेतकऱ्यांच्या खात्यांवर कर्जमाफीची रक्कम जमा होण्यास प्रारंभ झाला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेने जिल्ह्यातील  ३५ शाखांच्या माध्यमातून १८९६ शेतकऱ्यांच्या नावे शासनाकडून आलेला १३ कोटी ४० लाख रुपयांचा निधी जमा करून सरकारी बाजी मारली आहे.   

गेल्या अनेक दिवसांपासून कर्जमाफीसाठी विरोधकांनी रान उठवले होते. बँकांना पावलोपावली येत असलेल्या तांत्रिक अडचणीमुळे शासनालाही कर्जमाफीची रक्कम जमा करण्यासाठी “तारीख पे तारीख’ सांगावी लागत होती. अखेर बुधवारपासून (दि.१) शासनाने कर्जमाफीची रक्कम पाठवण्यास प्रारंभ केला आहे. महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या औरंगाबाद जिल्ह्यात एकूण ३५ शाखा आहेत. या शाखांमध्ये बुधवारी (दि.१) १८९६ शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठीचे १३  कोटी ४०  लाख १७  हजार ५४९ रुपये शासनाकडून प्राप्त झाले आहेत. या सर्व शाखाधिकाऱ्यांनी ही कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केली असून ज्यांची खाती  माेबाइल क्रमांकाशी जोडली आहेत  त्या सर्व शेतकऱ्यांना कर्ज जमा झाल्याचा संदेश (एसएमएस) प्राप्त झाला आहे. 
 
शेतकऱ्यांना त्वरित कर्ज देऊ   
महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या करमाड शाखेने ३  कोटी ४१ लाख ६८  हजार रुपये पीक कर्ज घेतलेल्या ३६६, तर ४ कोटी २३ लाख ३२ हजार रुपये मुदती व रूपांतरित कर्जमाफीत  बसणाऱ्या ४०३ शेतकऱ्यांची यादी शासनाकडे पाठवली होती. बुधवारी (दि.१) शाखेला ६३ शेतकऱ्यांची ग्रीन लिस्ट प्राप्त झाली. कर्जमाफीचे  ५२  लाख ४  हजार २०९ रुपये गुरुवारी (दि. २) शेतकऱ्यांच्या कर्ज खात्यात जमा केले. ही कर्जमाफीची रक्कम ३१ जुलै २०१७  पर्यंत व्याजासह आहे. एक ऑगस्टनंतर राहिलेले व्याज भरून काही तांत्रिक बाबी वगळता शेतकऱ्यांना लगेच कर्ज देण्यात येईल. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची यादी बँकेच्या नोटीस बोर्डवर लावण्यात आली आहे.   
अशोक कुलकर्णी, वरिष्ठ शाखा व्यवस्थापक, महाराष्ट्र ग्रामीण बँक, करमाड  
 
- कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा करण्यास थोडा उशीरच झाला. हरकत नाही. कर्जमाफीची रक्कम खात्यात जमा झाली आहे. कर्जही लवकर उपलब्ध करून देऊ, असे शाखाधिकाऱ्यांनी सांगितले आहे. यानंतर मिळणाऱ्या कर्जाची रक्कम रब्बी हंगामाच्या उत्पादन वाढीसाठी वापरता येईल. शासनाचे मन:पूर्वक आभार.  
- काकासाहेब शिंदे, शेतकरी, मंगरूळ
बातम्या आणखी आहेत...