आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 13 Quintal Mangos Saixed Issue At Jadhavwadi, Divya Marathi

जाधववाडीतून 13 क्विंटल आंबे जप्त, व्यापार्‍यावर होणार दंडात्मक कारवाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- जिल्हा कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील मदिना फूड सप्लायर्सवर अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने शनिवारी सकाळी धाड टाकून कॅल्शियम कार्बाइडमध्ये पिकवलेले 13 क्विंटल 20 किलो आंबे ताब्यात घेऊन नारेगाव कचरा डेपोत नष्ट केले. या आंब्यांचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. त्याचा अहवाल मिळाल्यानंतर दोषी विक्रेत्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे.
शहरात दररोज 250 क्विंटल अपरिपक्व आंबे परराज्यातून दाखल होत आहेत. आंबे पिकवण्यासाठी बहुतांश व्यापारी कॅल्शिअम कार्बाइडचा सर्रास वापर करतात. यामुळे शहरवासीयांचे आरोग्य धोक्यात आल्याचे वृत्त ‘दिव्य मराठी’ने 22 एप्रिल रोजी प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन अन्न व प्रशासन विभागाचे सह आयुक्त चंद्रशेखर साळुंके यांनी 24 एप्रिलनंतर विशेष मोहीम राबवणार असल्याचे सांगितले होते. त्यानुसार दोन दिवसांपासून ही मोहीम हाती घेण्यात आली. पहिल्या दिवशी या पथकाच्या हाती काहीच लागले नाही. मात्र, शनिवारी जाधववाडी येथील गाळा क्रमांक 41, मदिना फूड सप्लायर्समध्ये कॅल्शियम कार्बाइडद्वारे आंबे पिकवले जात असल्याचे आढळून आले. यासाठी सुमारे तीन ते चार किलो कॅल्शियम कार्बाइड वापरण्यात आले असून ते या पथकाने ताब्यात घेतले आहे. सादीर खान रझाक खान असे गाळेधारकाचे नाव असून त्याच्या विरोधात नियमाप्रमाणे कारवाई करू, असे अन्न सुरक्षा अधिकारी सुलक्षणा जाधववर यांनी सांगितले. सहआयुक्त मिलिंद शहा, अस्मिता गायकवाड, वर्षा रोढे, गोपाल कासार, अनिल पवार आदींचा पथकात समावेश होता.
माफ करणार नाही
फळे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइडचा वापर करणार्‍यांना माफ केले जाणार नाही. त्यांचा शोध घेण्यासाठी विभागात विशेष पथक नियुक्त करण्यात आले आहे. जाधववाडी येथे शनिवारी कारवाई करून 13 क्विंटल आंबा जप्त केला. तसेच 16 दुकानांची तपासणी केली आहे. त्याचे नमुने पुण्याला लॅबमध्ये पाठवले असून नियमानुसार कारवाई केली जाईल. चंद्रशेखर साळुंके, सहआयुक्त, अन्न व औषध प्रशासन