आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तेरावर्षीय तन्वी बनली मुख्यमंत्री!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शारदा मंदिर कन्या प्रशालेत शनिवारी वातावरण जल्लोषमय होते. तन्वी नरसापूर हिची यंदाची मुख्यमंत्री म्हणून घोषणा होताच विद्यार्थिनींनी एकच जल्लोष केला. टाळ्या आणि शिट्यांच्या आवाजाने शाळेचा परिसर दणाणला. तेरा वर्षीय तन्वीला मैत्रिणींनी डोक्यावर उचलून घेतले. शाळेच्या विद्यार्थी संसदेची निवडणूक शनिवारी (5 जुलै) सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान पार पडली.

शारदा मंदिर प्रशालेची विद्यार्थी संसद सचिव, अध्यक्ष आणि उपाध्यक्षांची निवडणूक उत्साहात पार पडली. लोकसभेच्या निवडणुकांप्रमाणेच विद्यार्थिनींनी या निवडणुकीची तयारी केली होती. यासाठी मतपेट्या आकर्षक पद्धतीने सजवण्यात आल्या होत्या. विद्यार्थिनींना निवडणुकीचा प्रचार करण्यासाठी दोन दिवसांची मुदत देण्यात आली. कोणत्याही प्रलोभनाचा वापर न करता शाळा सुटण्याआधी दोन तास विद्यार्थिनींनी प्रचाराचे काम केले. अखेर महत्त्वाचा टप्पा शनिवारी पार पडला. 36 सदस्यांपैकी तीन उमेदवार रिंगणात होते. यातून तन्वी नरसापूर या आठवीतील विद्यार्थिनीची निवड मुख्यमंत्री म्हणून करण्यात आली. शाळेची अध्यक्ष म्हणून दहावीची कल्याणी तोडकरी आणि उपाध्यक्ष म्हणून इयत्ता नववीतील प्रियंका गाडेकरची निवड करण्यात आली. या वेळी संसदेचे काम शिक्षिका सविता मुळे, अनुराधा पांडे यांनी पाहिले. निवडणूक अधिकारी म्हणून लता मुखेडकर, आशा आल्टे, अलका कलकोटे, हेमलता जगताप, अरुणा मुल्हेरकर यांनी काम पाहिले. या वेळी निवडून आलेल्या विद्यार्थिनीचे मुख्याध्यापिका ज्योती शास्त्री, उपमुख्याध्यापिका प्रतिभा काकडे, पर्यवेक्षिका उज्ज्वला निकाळजे यांनी अभिनंदन केले.
पर्यावरण संकल्पनेवर काम
- निवडून आलेंल्या मुख्यमंत्री, अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदावरील विद्यार्थिनींनी मैत्रिणींचे प्रश्न सोडवण्याची ग्वाही दिली. विकास आणि पर्यावरण संवर्धनासाठी शाळेत वर्षभर विविध उपक्रम राबवण्याचा मानसही व्यक्त केला.

अधिकाराची जाणीव व्हावी
- विद्यार्थ्यांना शालेय जीवनातच निवडणूक म्हणजे काय असते. आपली कर्तव्ये काय आहेत, याची जाणीव व्हावी यासाठी शाळेत लोकशाही पद्धतीने निवडणूक घेण्यात आली. यात विद्यार्थिनींचा सर्वच प्रक्रियेत सक्रिय सहभाग असतो. प्रतिभा काकडे, उपमुख्याध्यापिका
फोटो - विद्यार्थी संसदेच्या अध्यक्षपदी निवड होताच कल्याणी तोडकर हिला मैत्रिणींनी असे उचलून जल्लोष केला. इन्सेट : मुख्यमंत्री तन्वी नरसापूर. छाया: रवी खंडाळकर