आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

समृद्धीच्या भूसंपादनासाठी जिल्ह्यात 1300 कोटी निधी, 29 जूनला जमिनीचे दर होणार जाहीर

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- औरंगाबाद जिल्ह्यातून समृद्धी महामार्ग ६१ गावांतून जाणार आहे. यामध्ये साधारण ११२ किमी रस्त्यासाठीची जमीन संपादित करण्यात येणार आहे. २९ जूनला याबाबतचे दर जाहीर करण्यात येणार आहेत. जिल्ह्यात भूसंपादनाच्या मोबदल्यापोटी १३०० कोटी रुपये इतका निधी लागेल, अशी माहिती जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.  

समृद्धी महामार्गाला विरोध वाढत असताना प्रशासनाकडूनदेखील हालचालींना वेग आला आहे. त्यामुळे जमीन खरेदी लवकरात लवकर करण्यासाठी प्रशासनाच्या वतीने एक पाऊल पुढे टाकण्यात येत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना समाधान देईल, अशा पद्धतीने भाव देऊन ही प्रक्रिया गतीने राबवण्याचे प्रशासनाचे प्रयत्न आहेत. औरंगाबाद जिल्ह्यात औरंगाबाद, वैजापूर आणि गंगापूर या तीन तालुक्यांतून समृद्धी महामार्ग जाणार आहे.  ११२ किमीच्या रस्त्यासाठी साधारण १६०० हेक्टर (चार हजार एकर)   जमीन संपादित करण्यात येणार आहे. त्यासाठी प्रशासनाकडून जमिनीचे दर निश्चिती करण्याचे काम सुरू आहे. जमिनीचे दर आणि त्याबाबत देण्यात येणारा मोबदला पाहता साधारण १३०० कोटी रुपये इतका निधी लागणार आहे.   

अनेक गावांत जमीन बागायती असली तरी कोरडवाहू दाखवण्यात आली आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यात हा प्रकार उघड झाला आहे. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने खरेदीपूर्वी आक्षेपदेखील नोंदवले जाणार आहेत. तसेच जमिनीबाबत वाद तयार होऊ नये यासाठी लीगल सर्चदेखील करण्यात येणार आहे.   

गावनिहाय दर जाहीर होणार   
या महामार्गाअंतर्गत संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा गावनिहाय दर जाहीर केला जाणार आहे. यामध्ये कोरडवाहू व बागायतीसाठी दर वेगवेगळे असणार आहेत.  ग्रामीण भागात गेल्या तीन वर्षांतले खरेदी-विक्री व्यवहार पाहून त्यानुसार दर जाहीर करण्यात येणार आहेत.खरेदीपूर्वी आक्षेपही नोंदवले जाणार आहेत.

औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक निधी मिळणार   
औरंगाबाद तालुक्यात सर्वाधिक ३५ गावे, तर वैजापूर तालुक्यात १५ गावे व गंगापूरमध्ये ११ गावांच्या मधून हा रस्ता जाणार आहे.  औरंगाबाद तालुक्यात शहराजवळील जमिनीचे रेडीरेकनरचे दर सर्वाधिक आहेत. त्यामुळे औरंगाबादमध्ये शेतकऱ्यांना सर्वाधिक भाव मिळणार आहेत.