आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

13 हजार 100 ग्रामपंचायती शंभर टक्के पाणंदमुक्त, प्रधान सचिव राजेश कुमार यांची माहिती

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- राज्यात २८ हजार ग्रामपंचायती आहेत. त्यापैकी १३ हजार १०० ग्रामपंचायती शंभर टक्के हागणदारीमुक्त झाल्या आहेत. यात ६ जिल्हे, ९६ तालुक्यांचा समावेश आहे. मार्चअखेरपर्यंत भंडारा, गोंदिया, पुणे आणि ठाणे असे चार जिल्हे पाणंदमुक्त होतील. उर्वरित उद्दिष्टांची पूर्तता करण्यासाठी २ ऑक्टोबरची डेडलाइन निश्चित करण्यात आली आहे, अशी माहिती पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव राजेश कुमार यांनी दिली. कुमार यांच्यासह विभागीय आयुक्त डॉ. पुरुषोत्तम भापकर, मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अार्दड आदींनीही याबाबत संकल्प केला.
   
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छतेला अधिक महत्त्व दिले आहे. देशभर “स्वच्छ भारत मिशन’ अभियान राबवण्यात येत आहे. या माध्यमातून  शौचालय उभारणीचे काम हाती घेण्यात आले आहे. मार्च अखेरपर्यंत महाराष्ट्र शंभर टक्के हागणदारीमुक्त करण्याचा निश्चय करण्यात आला होता. मात्र, त्याला पाहिजे तसे यश आले नाही. ५० टक्क्यांपेक्षा कमी उद्दिष्टाची पूर्तता झाली आहे. उर्वरित रखडलेल्या शौचालयाचे कामे पूर्ण करण्यासाठी आता २ ऑक्टोबरची डेडलाइन राजेश कुमार व विभागीय आयुक्त डॉ. भापकर यांनी ३ मार्च रोजी जाहीर केली.  
 
सोनखत निर्मितीसाठी दोन शोषखड्ड्याला प्राधान्य
खुलताबाद तालुक्यातील खिर्डी गाव १०० टक्के हागणदारीमुक्त झाले असून दोन शोषखड्ड्याच्या माध्यमातून सोनखत निर्मिती करून शेतीची सुपीकता टिकवून उत्पादन वाढवण्यासाठी उपयोग केला जात आहे. त्याची प्रधान सचिव राजेश कुमार, डॉ. भापकर, मधुकरराजे अार्दड यांनी पाहणी केली व येथील प्रेरणा घेऊन राज्यभर अशाच प्रकारे प्रकल्प राबवण्याचा निश्चय केला. प्रशिक्षण, जनजागृती करून सोनखत निर्मिती करा व वापरा धोरण राज्यभर राबवले जाणार आहे, अशी माहिती मिळाली.  

शोषखड्ड्यांपासून तयार होते सोनखत   
हागणदारीमुक्तीसाठी दोन शोषखड्डे करावेत. एक भरले तर दुसऱ्याचा वापर करावा. भरलेले शोषखड्डे सहा महिने बंद ठेवले तर दर्जेदार, सुपीक, दुर्गंधीमुक्त एनपीए सोनखत तयार होते. त्याचा शेती पिकवण्यासाठी वापर करावा. यातून खतावरील खर्चात बचत होईल. जमिनीची सुपीकता वाढीबरोबरच उत्पादनात वाढ होण्यास मोठा हातभार लागेल. स्वच्छता अभियानातून आरोग्य सुदृढ राहील. प्रदूषण रोखले जाऊन पर्यावरण समृद्ध ठेवण्यास मोलाची मदत होईल, असा बहुमूल्य सल्ला मुख्य कार्यकारी अधिकारी मधुकरराजे अार्दड यांनी ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिला.

४० लाख शौचालय उभारण्याचे लक्ष्य 
स्वच्छतेच्या माध्यमातून ग्रामस्थांचे आरोग्य अबाधित ठेवण्याबरोबर पर्यावरण समृद्ध ठेवणे, सोनखताची निर्मिती करून त्याचा शेतात वापर करण्यासाठी घरोघरी शौचालय उभारण्याचे काम प्रगतिपथावर आहे. २ ऑक्टोबरपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रातील गाव पाणंदमुक्त करण्याचे निश्चित केले आहे. तसेच वर्षभरात ४० लाख शौचालये उभारण्याचे लक्ष निश्चित करण्यात आल्याची माहिती राजेश कुमार यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली.

खुलताबाद तालुक्याने मिळवला मान   
२००७ मध्ये जिल्हाधिकारी म्हणून सेवा बजावत असताना ते पाहणी दरम्यान लक्षात आले. तातडीने स्वच्छता अभियान राबवून हागणदारीमुक्तीसाठी शौचालय उभारण्याचे काम हाती घेतले होते. मार्चअखेरपर्यंत जे उद्दिष्ट पूर्ण करायचे होते ते दुर्दैवाने पूर्ण करता आले नाही, याचा खेद वाटतो, पण खिर्डी गाव, देवणी, परतूड, जाफराबादी, खुलताबादसारख्या तालुक्यांनी पाणंदमुक्त होण्याचा मान पटकावला . 
डॉ. पुरुषोत्तम भापकर, विभागीय आयुक्त. औरंगाबाद.   
बातम्या आणखी आहेत...