आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

फडक्यात बांधून ठेवलेले १४ लाख रुपये पळवले

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- गावाकडे दुष्काळाची स्थिती. त्यामुळे चोरट्यांची भीती. म्हणून शेतजमीन विक्रीतून आलेले १४ लाख रुपये संजयकुमार धनाड कुटुंबाने त्यांच्या सिडकोतील (बळीराम पाटील शाळेजवळील म्हाडा कॉलनी) घरात पाच महिन्यांपूर्वी आणले.

कुटुंबातील विवाह समारंभासाठी कष्टाच्या कमाईतून जमा केलेले सात लाख २५ हजार रुपयांचे सोनेही घरातच ठेवले. कधी चोरट्यांची नजर पडलीच तर हा ऐवज सुरक्षित राहावा म्हणून अलमारीत ठेवण्याऐवजी टीव्ही ठेवण्याच्या कोनाड्यात एका फडक्यामध्ये रक्कम आणि त्याच्या बाजूच्याच एका डब्यात सोने दडवले. मात्र घडला प्रकार उलटाच. टीव्ही चोरण्यासाठी आलेल्यांची कोनाड्यावर नजर गेली आणि त्यांनी धनाड कुटुंबीयांची कष्टाची कमाई गुरुवारी (११ जून) मध्यरात्री लंपास केली. या घटनेची माहिती मिळताच पोलिस आयुक्त अमितेशकुमार घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी चोरीच्या घटनेचे धागेदोरे स्वत: अभ्यासत अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
साजापूर येथे पेट्रोल पंपावर व्यवस्थापक म्हणून काम करणाऱ्या धनाड यांच्या नातेवाइकावर पुणे येथे शस्त्रक्रिया होणार होती. त्यांना भेटण्यासाठी त्यांच्या घरातील सर्व सदस्य मंगळवारीच पुण्याला गेले होते. गुरुवारी पहाटे घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे समजले. घरासमोर असलेला लोखंडी ग्रीलचा दरवाजा, त्याची दोन कुलपे आणि लाकडी दरवाजाचे एक कुलूप तोडून या चोरट्यांनी प्रवेश केला.
गुरुवारी रात्री धुवाधार पाऊस सुरू होता. शिवाय अनेक भागात वीजही नव्हती. त्याचा फायदा या चोरट्यांनी घेतला असावा, असा पोलिसांचा कयास आहे. पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे, उपायुक्त संदीप आटुळे, सहायक आयुक्त सुखदेव चौघुले, बाबाराव मुसळे, निरीक्षक अशोक कदम यांनीही घटनास्थळाची पाहणी केली.
सीसीटीव्ही असते तर
धनाडयांच्या घरासमोर चार किरकोळ साहित्य विक्रीची दुकाने आहेत. त्यांच्यापैकी एकानेही सुरक्षेसाठी सीसीटीव्ही लावले नाहीत. अन्यथा चोरट्यांचे धागेदोरे तत्काळ हाती लागले असते.
बाहेर जाताना पोलिसांना सांगा
घरातमोठ्या प्रमाणावर सोन्या-चांदीचे दागिने, रक्कम ठेवू नका. दोन दिवसांपेक्षा अधिक काळ घराला कुलूप ठेवणार असाल तर पोलिसांना त्याची माहिती द्या, असे आवाहन सिडको पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक राजकुमार डोंगरे यांनी केले आहे.
पावसामुळे आवाज आला नाही
सुमारे दोन तास चोरटे धनाड यांच्या घरात उलथापालथ करत होते. मात्र, धनाड राहत असलेल्या इमारतीतील त्यांच्या शेजाऱ्यांना त्याचा साधा आवाजही आला नाही. याबद्दल पोलिसांनी विचारणा केली असता जोरदार पावसामुळे आम्हाला काहीच ऐकू आले नाही, असे शेजाऱ्यांनी सांगितले.
महिनाभरातील दुसरी घटना
गोलवाडी येथे दोन आठवड्यांपूर्वी दरोडेखोरांनी २४ लाख रुपये पळवले होते. त्या प्रकरणात अजून कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. पोलिस आयुक्तांनी रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अलंकार सभागृहात बोलावून त्यांना तंबीही दिली होती. मात्र, त्याचा कोणताही परिणाम झाला नसल्याचे घरफोडीवरून स्पष्ट होत आहे.
भुरट्या चोरांना सापडले घबाड
ही घरफोडी भुरट्या चोरांनी केली असावी, असा संशय पोलिसांना आहे. कारण चोरट्यांनी आधी घरातील टीव्ही, भांडी, चादरी आणि साडीत बांधून ठेवले. त्यानंतर त्यांना ही रक्कम आणि सोने दिसले असावे. त्यामुळे त्यांनी टीव्ही, भांडी तशीच ठेवून दिली.
खेड्यात चोरी होईल म्हणून...
धनाडयांच्या सासूबाईची बदनापूर रस्त्यावरील जमीन काही महिन्यांपूर्वी विकली होती. त्याचे पैसे या कुटुंबाकडे आले होते. त्यातून एक फ्लॅट खरेदी केल्यानंतर उरलेले पैसे बँकेऐवजी अन्य कुठे ठेवावे, असा प्रश्न होता. पाच महिन्यांपूर्वी दुष्काळी स्थितीमुळे खेड्यांमध्ये चोरीच्या घटना वाढल्या होत्या. म्हणून रक्कम सिडकोतील घरातच ठेवण्याचा निर्णय झाला. धनाड कुटुंबात एक लग्न असल्यामुळे सोने आणून ठेवण्यात आले होते. दोन दिवसांपूर्वी त्यांना गावाला जावे लागले आणि ही घटना घडली.