आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मैत्रिणीला दिलेल्या चिठ्ठीने घेतला अंजलीचा जीव, गावाच्याच विहिरीत सापडला मृतदेह

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - एका मुलाने दिलेली चिठ्ठी आपल्या मैत्रिणीला नेऊन दिल्याची शिक्षा म्हणून १४ वर्षे वयाच्या मुलीला आपला जीव गमवावा लागला. मैत्रिणीच्या मामाकडून होणाऱ्या मारहाणीला घाबरून तिने थेट विहिरीत उडी मारली, अशी तक्रार तिच्या पालकांनी करमाड पोलिस ठाण्यात नोंदवली आहे.

घारेगाव पिंप्री येथील ही घटना असून ५ एप्रिल रोजी दुपारी हा प्रकार घडला. अंजली ज्ञानेश्वर गलधर हिला तिच्या मैत्रिणीचा मामा सुदर्शन कृष्णा काजळे याने रस्त्यात थांबवून मारहाण केली. त्याला त्याच्या काही नातलगांनीही साथ दिली. आपल्या दहावीत शिकणाऱ्या भाचीला एका तरुणाची चिठ्ठी का आणून दिली, याचा जाब विचारत त्याने मारण्यासाठी काठी काढली. त्यामुळे घाबरून अंजली पळत सुटली. दुसऱ्या दिवशी तिचा मृतदेह ग्रामपंचायतीच्या विहिरीत आढळून आला. त्यानंतर ७ एप्रिल रोजी या प्रकरणी सुदर्शन काजळेसह ९ जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आणि कट रचून मारहाण केल्याचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. मात्र, कोणावरच कारवाई होत नसल्याची तिच्या पालकांची तक्रार आहे.
कारवाईबाबत थंड प्रतिसाद
अंजलीच्या कुटुंबीयांनी दिलेल्या तक्रारीवरून सुदर्शन आणि त्यांच्या कुटुंबीयांविरुद्ध करमाड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. तक्रार देऊन आठ दिवस उलटून गेले तरी पोलिसांनी काहीही कारवाई केली नसल्याचा आरोप मृत मुलीच्या कुटुंबीयांनी केला आहे. पोलिस उपनिरीक्षक ए. बी. तांगडे तपास करीत आहेत.