आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

14 वर्षांच्‍या मुलाची व्हाइटनरची नशा, पोलिसांनी 21 दिवस समुपदेशन केल्‍यानंतर म्‍हणाला असे काही

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद - संग्रामनगर उड्डाणपुलाखाली १२ नोव्हेंबर रोजी संध्याकाळी व्हाइटनरच्या नशेत असलेला योगेश (१४, नाव बदलेले आहे रा. छोटा मुरलीधरनगर) विशेष पोलिस अधिकारी श्रीमंत गोर्डे पाटील यांना आढळून आला. त्यांनी तत्काळ उस्मानपुरा पोलिसांसमोर हजर केले. त्या दिवसापासून रोज त्याची पोलिस ठाण्यात हजेरी सुरू झाली. वेळ मिळेल तेव्हा उपनिरीक्षक राहुल चव्हाण आणि श्रीमंत गोर्डे पाटील त्याचे समुपदेशन करू लागले. २१ दिवसानंतर योगेशची संपूर्ण दिनचर्या बदलली आहे. शाळेचे नाव घेताच दूर पळणारा योगेश आता शिक्षण घेऊन मोठा माणूस बनेन, असे आत्मविश्वासाने सांगत आहे. 

 

योगेशची आई भंगार गोळा करते तर वडील कंत्राटी कामगार आहेत. दोघे कामाला गेल्यानंतर तो लहान भावंडांना घरीच सोडून मित्रांसोबत व्हाइटनरची नशा करण्यासाठी निघून जात असे. नशेच्या आहारी गेल्यामुळे आपण नेमकं काय करतोय हे त्याला समजत नव्हते. समुपदेशनादरम्यान त्याने अनेक धक्कादायक गोष्टी पोलिसांना सांगितल्या. नशेमुळे त्याचा मित्र काही महिन्यांपूर्वी पोटाच्या आजारामुळे मृत्युमुखी पडला. नशा करण्यासाठी पैसे नसतील तर आम्ही रेल्वेस्टेशनवर जाऊन मोबाइल चोरण्याचा प्रयत्न करायचो. एकदा लोकांनी पकडले होते. उस्मानपुऱ्यात एका वकिलाच्या घरात चोरीचा प्रयत्न केल्याचे त्याने सांगितले.

 

उपनिरीक्षक राहुल चव्हाण यांनी योगेशच्या आई-वडिलांची भेट घेतली आणि या सगळ्या गोष्टीची कल्पना देत त्याची रोज पोलिस ठाण्यात हजेरी सुरू केली. तो परिसरातील मित्रांना भेटणार नाही यासाठी पालकांनी प्रयत्न करावे, अशी ताकीदच दिली. त्यानंतर योगेश हजेरीसाठी पोलिसांकडे नियमित येऊ लागला. नशेच्या आहारी गेल्यानंतर माणूस कशा प्रकारे गुन्हेगार होतो आणि त्याचा शेवट किती भयावह होतो हे त्याला प्रत्यक्ष उदाहरण देऊन चव्हाण गोर्डे यांनी समजून सांगितले. त्यानंतर मात्र योगेशमध्ये आमूलाग्र बदल दिसायला लागले. 

 

एक सुधारताच दुसरा सापडला 

व्हाइटनरआणि इतर नशेच्या आहारी गेलेले अनेक अल्पवयीन मुले शहरात आहेत. यातील योगेशला सुधारण्याचा प्रयत्न करत असताना शुक्रवारी रात्री मोसीन युसूफ पठाण (१८, रा.अंबिकानगर) हा ज्ञानेश विद्या मंदिर शाळेच्या मैदानावर स्टिक फास्टची नशा करताना आढळला. विशेष पोलिस अधिकाऱ्यांना पाहून त्याने पळ काढला. मात्र एक किलोमीटर पाठलाग करून राजेश मगर, अभिजित शेळके यांनी त्याला पकडून मुकुंदवाडी पोलिस ठाण्यात नेले. 

 

बोलताही येत नव्हते 
नशेच्या आहारी गेल्याने योगेशला एक वाक्यही बोलता येत नव्हते. नशेत नसतानादेखील तो प्रत्येक शब्दाला अडखळत होता. एक चपातीपेक्षा जास्त जेवत नव्हता. नशा करणाऱ्या मित्राचा मृत्यू झाला होता. तरीही त्याने नशा सोडली नाही. पोलिसांच्या समुपदेशनानंतर मात्र त्याचे जेवण वाढले. सातवीनंतर शाळा सोडलेला योगेश आता पुन्हा शाळेत जाईन, असे म्हणतोय. 

 

पुढील स्‍लाइडवर वाचा, एक सुधारताच दुसरा सापडला...

बातम्या आणखी आहेत...