आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Crore Loan Distribute To Women In Hands Of Ajit Pawar

उपमुख्यमंत्र्यांचा हस्‍ते महिलांना 15 कोटींचे कर्ज वितरण

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळाच्या वतीने महिलांना 15 कोटी रुपयांच्या कर्जाचे वितरण शुक्रवारी (12 जुलै) सिडकोतील संत तुकोबाराय नाट्यगृहात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले.

कार्यक्रमास महामंडळाचे अध्यक्ष रमेश कदम, उच्च व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, आमदार लक्ष्मण ढोबळे, आमदार वंदना चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत रमेश कदम यांनी गृह खात्याचे वाभाडे काढले. एवढेच नव्हे तर कदम यांनी क्रांती चौक व बेगमपुरा ठाण्याच्या पोलिस निरीक्षकांना चोर म्हणून संबोधले. उपमुख्यमंत्री पवार मात्र शांत बसून गृह खात्यावरील टीका ऐकत होते. बोगस प्रकरणांना टेक्निकल स्वरूप देण्यास पोलिस निष्णात असल्याचा हल्ला कदम यांनी गृह विभागावर चढवला. पवार यांनी आपल्या भाषणात कदम यांच्या वक्तव्याचा खुलासा न करता कदमांना जेलमध्ये जावे लागले, परंतु आपण चांगले काम करूया, असे म्हणत त्यांची बोळवण केली. कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड केली जावी, असा सल्ला देत पवार यांनी अण्णाभाऊ साठे महामंडळाची कर्जवसुली केवळ 2 टक्के असल्याचे सांगितले. अपंग महामंडळाची वसुली 90 ते 95 टक्के असल्याचे निदर्शनास आणून देत आपलीही वसुली वाढवण्याचा सल्ला पवार यांनी याप्रसंगी दिला. महामंडळाने 27 वर्षांत 313 कोटी रुपयांचे कर्ज वितरित केले असून त्यातील 80 टक्के प्रकरणे बोगस आहेत. यामुळे कर्जास जबाबदार असलेल्या व्यक्तीविरुद्ध कारवाई करावी, असेही पवार यांनी सांगितले.


कमिशन मागणार्‍यास इंगा दाखवणार
पन्नास हजार रुपये महिलांच्या खात्यावर जमा होतील. यात एक दमडीही कुणाला दलालीपोटी देऊ नका. दलाली मागणार्‍याचे नाव मला सांगा. मग त्यांना मी माझा इंगा दाखवतो, असा दमही पवार यांनी बोलताना दिला. पवार यांच्या हस्ते 25 महिलांना अनुदानाच्या धनादेशाचे वितरण करण्यात आले. या वेळी उच्च् व तंत्रशिक्षणमंत्री राजेश टोपे, माजी मंत्री आमदार लक्ष्मण ढोबळे, आमदार वंदना चव्हाण आदींची भाषणे झाली.

पवारांची घोषणा
अनुसूचित जातींवरील अत्याचाराची प्रकरणे निकालात काढण्यासाठी प्रत्येक विभागात एक याप्रमाणे राज्यात सहा विशेष न्यायालयांची स्थापना केली जाणार आहे. गरिबांना एक रुपयात एक किलो ज्वारी, बाजरी दिली जाईल. दोन रुपये किलो गहू व तीन रुपये किलो तांदूळ देण्यात येतील. यासाठी केंद्राच्या वतीने 1 लाख 25 हजार कोटींचे अनुदान देण्यात येणार आहे. महिन्याला एका कुटुंबास 25 किलो धान्य देण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले.

दलित महासंघाचा कार्यक्रम रद्द
दलित अत्याचारविरोधी महासंघाच्या वतीने धनादेश वाटपाच्या कार्यक्रमाविरोधात निदर्शने करण्याचे जाहीर केले होते, परंतु महासंघाचे संजय ठोकळ यांचे पवार यांनी निवेदन स्वीकारून म्हणणे ऐकून घेतल्यामुळे निदर्शने रद्द करण्यात आली.

कदम सर्मथकांचे पवारांना निवेदन
रमेश कदम यांनी सुरू केलेल्या प्रकरणांची चौकशी थांबवण्याची मागणी राष्ट्रवादी कॉँग्रेसचे शहर सरचिटणीस शेषराव नाडे यांनी सुभेदारी विर्शामगृहावर पवार यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.