आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 15 Percent Water Cutting In 45 Days For Industry

४५ दिवसांमध्ये १५ टक्के पाणी कपातीचा फॉर्म्युला, जिल्हाधिकाऱ्यांना दिला प्रस्ताव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - शहरातील उद्योग बंद पडले तर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन बिअर कंपन्यांचे पाणी दर पंधरा दिवसांनी पाच टक्के म्हणजेच ४५ दिवसांपर्यंत १५ टक्के कपात करावे, असा फॉर्म्युला उद्योजकांनी दिला.

उद्योगाच्या पाणी कपातीबाबत गुरुवारी जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक पार पडली. यामध्ये उद्योजकांनी इतर उद्योगांसाठी आणखी टक्के पाणी कपातीचा ताण सहन करण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती सीएमआयएचे अध्यक्ष आशिष गर्दे यांनी दिली. बैठकीला जिल्हाधिकारी निधी पांडे, उद्योजक मुकुंद कुलकर्णी, उमेश दाशरथी, मुनिष शर्मा, एमआयडीसीचे कार्यकारी अभियंता राजेंद्र गावडे यांच्यासह इतर अधिकारी उपस्थित होते. उच्च न्यायालयात शुक्रवारी बिअर कंपन्यांच्या पाणीपुरवठ्याबाबत सुनावणी होणार आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने आणखी किती पाणी कपात करता येणे शक्य आहे तसेच उद्योगावर त्याचा काय परिणाम काय होईल, याची माहिती उद्योजकांकडून घेतली. सध्या उद्योगांमध्ये २० टक्के पाणी कपात आहे. उद्योगांनी सहकार्याची भूमिका घेतली असून आणखी पाच टक्के पाणी कपात सहन करू शकत असल्याचे सांगण्यात आले. मात्र, त्याच वेळी कंपनी बंद पडणार नाही याकडेही जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे असल्याचे उद्योजकांकडून सांगण्यात आले.

बिअर कंपन्यांची वाढणार कपात : औरंगाबादमध्ये११ मद्यार्क निर्मिती कंपन्या असून त्यांना ३० टक्के कपात लागू आहे. या कंपन्यांना दररोज ३.३१ एमएलडी पाणीपुरवठा केला जातो. या कंपन्यांना प्रोसेसिंग करण्यासाठी किमान पंधरा दिवस लागतात. त्यामुळे लगेच उत्पादन थांबवणे अथवा सुरू करणे शक्य नसल्याचे कंपन्यांच्या प्रतिनिधींकडून सांगण्यात आले. विशेष म्हणजे उन्हाळ्यामध्येच कंपनीचे उत्पादन अधिक होते. त्यामुळे आता उत्पादन कमी करण्याचे नियोजन करावे लागणार आहे. त्यासाठी दर पंधरा दिवसांनी टक्के अशी ४५ दिवसांपर्यंत पंधरा टक्के पाणी कपातीचा ताण सहन करण्यास आम्ही तयार आहोत, अशी तयारी या कंपन्यांकडून दाखवण्यात आली. बैठकीला बिअर कंपन्यांचे प्रतिनिधी, सीएमआयए, वाळूज उद्योग असोसिएशन आणि मसिआ आदी संघटनांचे प्रतिनिधी उपस्थिती होते.

४०० कोटींचा आगामी ४५ दिवसांत महसूल मिळणार आहे.
११ बिअर कंपन्यांत चार हजार कामगार काम करतात.

मराठवाड्यातील ग्रामीण भागातील लोक या कंपन्यांत कामाला आहेत. त्यामुळे रोजगाराचा प्रश्न निर्माण होणार नाही याची काळजी घेणे गरजेचे असल्याचे उद्योजकांनी सांगितले.

सहकार्यास तयार
उद्योगांना कमी पाणी लागते. आगामी काळात उद्योगवाढीबाबत चुकीचा संदेश जाणार नाही, याची काळजी घेणे गरजेचे आहे. उद्योग बंद पडले तर रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण होऊ शकतो. उद्योग सहकार्य करण्यास तयार आहेत, मात्र प्रशासनानेही परिणामाचा विचार करावा. - मुकुंद कुलकर्णी, उद्योजक.

प्रस्ताव दिला
उद्योजक किती पाणी कपात सहन करू शकतात याचा प्रस्ताव दिला आहे. उद्योजकांची भूमिका सहकार्याचीच आहे. मात्र, उद्योग बंद पडणार नाही याचाही विचार होणे आवश्यक आहे. त्यानुसार मद्यनिर्मिती कंपन्यांसाठी पंधरा दिवसांना टक्के आणि इतर उद्योगांना टक्के कपातीचा प्रस्ताव दिला आहे. - आशिष गर्दे, अध्यक्ष,सीएमआयए