आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पिस्तुलाच्या धाकावर 15 हजार रुपयें लुटले

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - ट्रान्सपोर्ट कंपनीतील दोन कर्मचा-यांना पिस्तूल व चाकूच्या धाकावर एटीएममध्ये नेऊन त्यांच्या खात्यातील 15 हजार रुपये बळजबरीने काढून घेतल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी पंढरपूरच्या तिरंगा चौकात घडली. वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तक्रारकर्त्यांना तब्बल सहा तास ताटकळत बसून ठेवून ‘बाद मे देखेंगे’ असे म्हणत परतवून लावले. त्यानंतर शनिवारी गुन्हा नोंदवला.

टीसीआय ट्रान्सपोर्ट कंपनीतील सुपरवायझर योगेशकुमार यादव व अकाउंटंट संदीपकुमार शर्मा शुक्रवारी काम आटोपून घरी निघाले होते. तिरंगा चौकातून ते महाराणा प्रताप चौकात जाण्यासाठी रिक्षात बसत असताना दोघांनी योगेशकुमार यांच्याशी विनाकारण वाद घालून दोघांनाही भाजी मंडईमागील निर्मनुष्य जागेत नेले. त्यांना पिस्तुलाचा धाक दाखवून संदीपकुमारच्या कानशिलाला चाकू लावून खिशातील हजार रुपये तसेच दोघांचे एटीएम कार्ड काढून घेतले. त्यांना आयसीआयसीआय बँकेच्या एटीएममध्ये नेले. मात्र, हे एटीएम बंद असल्याने पंढरपुरातील अ‍ॅक्सिस बँकेच्या एटीएममध्ये नेले. एकाने योगेशकुमारला एटीएममधून तीन हजार रुपये काढण्यास भाग पाडले.

सहा तास ताटकळवले : या दोन कर्मचा-यांसह सहव्यवस्थापक ए. के. शुक्ला, मुकेश चौधरी यांनी वाळूज एमआयडीसी पोलिस ठाणे गाठून घटनेची माहिती दिली. पोलिस निरीक्षक इंदलसिंग बहुरे यांनी ‘आम्ही लुटारूंचा माग काढतो. तुम्ही बसा’असे सांगून रात्री अकरापर्यंत पोलिस ठाण्यात बसवून ठेवले. त्यानंतर ‘एटीएममधील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून लुटारूंची ओळख पटवू , आता तुम्ही जा, सकाळी बघू’ असे बोलून घरी जाण्यास सांगितले. शनिवारी दुपारनंतर या प्रकरणी दरोड्याचा गुन्हा नोंदवला.

औरंगाबादेत 12 हजार काढले
तीन हजार रुपये काढल्यानंतर लुटारूंनी त्यांना तिरंगा चौकात आणले. तेथून एका अ‍ॅपेरिक्षात दोघांनाही औरंगाबादच्या बाबा पेट्रोल पंप परिसरात नेले. तेथे एटीएममधून संदीपकुमारच्या खात्यावरील 12 हजार रु. काढले. रक्कम हाती येताच दोघांना पेट्रोल पंपाजवळ सोडून लुटारूंनी पोबारा केला.