आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

...अन‌् आयुष्याचा दोर तुटला, गच्चीवर पतंग उडवताना विजेच्या तारेचा धक्का लागून 15 वर्षीय मुलाचा अंत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शेजा-यांच्या गच्चीवर जाऊन पतंग उडवताना इमारतीला लागून असलेल्या हायपॉवर टेंशनच्या तारेला हात लागल्यामुळे १५ वर्षीय मुलाच्या आयुष्याचा दोर कायमचा तुटला. ही दुर्दैवी घटना गुरुवारी सकाळी हडको एन-१३ भागातील भारतनगरात घडली. आतिष परमेश्वर बोरकर असे मृत मुलाचे नाव आहे.
मकर संक्रांतीनिमित्त त्यालाही पतंग उडवण्याचा मोह आवरला नाही. तो चक्री आणि पतंग घेऊन गच्चीवर गेला. पतंगाला उंच उंच उडवण्याचा नादात त्याचा धक्का विजेच्या तारेला लागला आणि तो जागीच गतप्राण झाला. हा प्रकार पतंग उडवणाऱ्या इतर मुलांनी पाहिला आणि त्यांनी आरडाओरड केली. काहीच मिनिटांत लोक घटनास्थळी जमले. त्याला तातडीने घाटीत दाखल केले. मात्र, डाॅक्टरांनी त्याला मृत घोषित केले. तो एकुलता एक असल्यामुळे
त्याच्या आई-वडील खचलेल्या अवस्थेत घाटीतील शवागृहासमोर बसलेले होते. रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर शवविच्छेदन सुरू होते. तो मराठा हायस्कूलमध्ये ७ व्या वर्गात शिकत होता.

एकुलता एक मुलगा
परमेश्वर बोरकर यांना चार मुली असून आतिष हा एकुलता एक मुलगा होता. परमेश्वर आणि त्यांची पत्नी पूर्वी भाजीपाला विक्रीचा व्यवसाय करत होते. काही वर्षांपूर्वी ते एका ऑटो कंपनीत कामाला लागले.

यापूर्वीच्या दोन घटना
१७ जून २०१० रोजी राम गोविंद काळे हा तरुण गच्चीवर गेला होता. सहज त्याने हात वर करताच त्याच्या उजव्या हाताला झटका बसला आणि त्याची बोटे भाजली होती. त्याच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार केले असता साडेचार लाख रुपये खर्च आला. त्यांनाही वीज कंपनीकडून कसलीच मदत मिळाली नव्हती. चार वर्षांपूर्वीदेखील असाच प्रकार या भागात घडला होता. १६ वर्षीय मुलाचा उजवा हात विजेच्या धक्क्यामुळे निकामी झाला होता.

घेराव घालू
हायटेंशन तारेमुळे लोकांचा जीव टांगणीला आहे. अशा घटना वारंवार घडत आहेत. यासंबंधी महावितरणाकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नाही. या भागात ड्रिम प्रोजेक्ट राबवण्यात यावा. वेळीच दखल न घेतल्यास कार्यालयास घेराव घालू.
राजगौरव वानखेडे, नगरसेवक