आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

औरंगाबाद: भाजपचा श्रेय डाव, दीडशे कोटींच्या रस्त्यात सेनेला ‘वाटा’ मिळू न देण्याचा प्रयत्न

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद- शहरातील रस्त्यांच्या विकासासाठी १५० कोटी रुपये लवकरच मिळणार आहेत. यासाठी महापौर भगवान घडामोडे यांनी शहरातील सर्वपक्षीय आमदारांची बैठक घेतली. परंतु मंगळवारी मुंबईला भाजपचेच शिष्टमंडळ गेले. उपमहापौर, स्थायी समितीचे सभापती किंवा सेनेच्या अन्य कोणत्याही पदाधिकाऱ्याला सोबत नेण्यात आले नाही. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे जेव्हा होतील तेव्हा त्याच्या श्रेयात सेनेला ‘वाटा’ मिळणार नाही, याची खबरदारी तसेच प्रयत्न भाजपकडून सुरू असल्याचा आरोप सेनेकडून हाेत आहे. 

मंगळवारी महापौर घडामोडे यांनी मुंबईत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची भेट घेतली, तेव्हा त्यांच्यासमवेत आमदार अतुल सावे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. भागवत कराड, प्रदेश प्रवक्ते शिरीष बोराळकर, माजी उपमहापौर प्रशांत देसरडा ही मंडळी होती. त्याआधी शनिवारी घडामोडे यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्या उपस्थितीत शहराच्या तिन्ही मतदारसंघांचे आमदार, स्थानिक स्वराज्य संस्था आमदार सतीश चव्हाण सुभाष झांबड यांच्या उपस्थितीत महापौर बंगल्यावर बैठक घेऊन विकासासाठी मी सर्वांना सोबत घेत असल्याचे सांगितले होते. मंगळवारी या सर्वांच्या उपस्थितीत बैठक होऊन १५० कोटींच्या रस्त्यांची नावे अंतिम केली जातील, असेही सांगितले होते. 

श्रेयासाठीच भाजपचा खटाटोप 
विधानसभानिवडणुकीत भाजप सेनेची युती झाली नव्हती. प्रचारादरम्यान शहराच्या रस्त्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी आणला जाईल, असे आश्वासन भाजपने दिले होते. तीनपैकी एका मतदारसंघात म्हणजेच पूर्वमधून अतुल सावे हे भाजपचे आमदार म्हणून विधानसभेत पोहोचले. विजयानंतर गुंठेवारीसह रस्त्यांसाठी मोठा निधी आणण्याचे आश्वासन लवकरच पाळले जाईल, असे त्यांनी सांगितले. 

सावे यांनी पाठपुरावा करून पहिल्या टप्प्यात २४ कोटी रुपये पालिकेला मिळवून दिले. तेव्हाही हा निधी फक्त भाजपच्या पाठपुराव्यामुळे आला असून त्याचा वापर पूर्व विधानसभा मतदारसंघात कसा होईल, याची खबरदारी भाजप तसेच सावे यांनी घेतली. थोडक्यात भाजप म्हणजे विकास अन् सेनेचा विकासाशी काहीही संबंध नाही, असे चित्र निर्माण करण्याचा प्रयत्न झाला. 

शहराच्या रस्त्यांसाठी निधी मागितला जात हेता. परंतु हा निधी भाजपचा महापौर झाल्यानंतरच यावा याचीही खबरदारी घेतली जात होती. एकदाचे महापौरपद भाजपकडे गेले. परंतु अजूनही पैसे आले नाहीत. आता जेव्हा ते येताहेत तेव्हा ते फक्त भाजपमुळेच आले अन् भाजपमुळेच शहराचा विकास होतोय, त्यात सेनेचा वाटा नाही, हे दाखवण्याचा हा प्रयत्न असल्याचा सेनेचा जाहीर आरोप आहे. विकासासाठी सर्वांना सोबत घेण्याचे चित्र शनिवारी रंगवण्यात आले आणि मंगळवारी भाजपच्या महापौरांनी आपले रंग दाखवले, असा आरोप सेनेचे जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी केला आहे. 

रस्ते होण्याशी मतलब 
सर्वपक्षीय पदाधिकाऱ्यांना बोलावायला हवे होते. परंतु महापौरांना ते शक्य झाले नाही. पण आपल्याला पैसे मिळण्याशी मतलब आहे. एवढी मोठी मदत पालिकेला पहिल्यांदाच मिळते आहे. पूर्ण रस्ते चांगले होतील. रस्ते करताना पक्षभेद केला जाणार नाही. काही चुकांकडे दुर्लक्ष झाले पाहिजे.
- डॉ.भागवत कराड, प्रदेश उपाध्यक्ष, भाजप. 

सर्वांना बरोबर घेतो 
तातडीने निधी मिळून रस्त्यांची कामे सुरू व्हावीत, यासाठी मी प्रयत्न करतोय. यात राजकारण आणण्याचा प्रश्नच नाही. मंगळवारी मी पालिका पदाधिकाऱ्यांना सोबत घेतले नाही. पण पुढील वेळी नक्कीच सर्व जण सोबत असू. वेळ कमी आहे, त्यामुळे गतीने कामे व्हावीत, ही इच्छा आहे. - भगवान घडामोडे, महापौर. 

हे तर दाखवण्याचे दात 
विकासासाठी सर्व सोबत आहोत, हे दाखवण्यासाठी सेनेसह एमआयएमच्या आमदारांनाही शनिवारी सोबत घेतले अन् मंगळवारी महापौर एकटेच गेले. हे भाजपचे दाखवण्याचे दात आहेत. खाण्याचे दात वेगळेच आहेत. शहराच्या विकासासाठी आम्ही प्रयत्न करतो आहोत. खासदार चंद्रकांत खैरे यांनी आधीच मुख्यमंत्री तसेच अर्थमंत्र्यांची भेट घेऊन मागणी केलीच होती. - अंबादास दानवे, जिल्हाप्रमुख, शिवसेना. 

मंगळवारी काय झाले? 
मंगळवारी सर्व स्थानिक आमदार पुन्हा एकत्र बसून रस्त्यांची यादी अंतिम करणार होते. त्यासाठी अधिवेशनादरम्यान मुंबईत बैठक होणार होती. परंतु मंगळवारी तसे झाले नाही. घडामोडे स्वत: मुंबईला रवाना झाले. त्यांनी उपमहापौर स्मिता घोगरे, स्थायी समितीचे सभापती मोहन मेघावाले, सभागृह नेते गजानन मनगटे यांच्यापैकी कोणालाही याची कल्पना दिली नाही की तुम्ही सोबत चला ,असे म्हटले नाही. ते एकटे मुंबईत पोहोचले. भाजपचे आमदार तसेच अन्य पदाधिकाऱ्यांना सोबत घेत त्यांनी अर्थमंत्र्यांची भेट घेतली. 
बातम्या आणखी आहेत...