आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शहर खड्डेमुक्त करण्यासाठी १५० कोटींचा प्रस्ताव मांडणार

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पालकमंत्री रामदास कदम यांनी बुधवारी दुपारी महापौर बंगल्यावर महानगरपालिका तसेच जिल्ह्याच्या विविध मुद्द्यांवर मॅरेथॉन बैठक घेतली. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी शहरात होणाऱ्या मंत्रिमंडळ बैठकीसमोर १५० कोटींचा प्रस्ताव सादर करण्यात येणार असल्याची शहरवासीयांसाठी सुखद माहिती त्यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

बुजवलेले खड्डे बघण्यासाठी आदित्य येणार : खड्डे बुजवण्यासाठी न्यायालयाला आदेश द्यावा लागतो ही लाजिरवाणी बाब असल्याचे कदम यांनी या वेळी सांगितले. औरंगाबाद हे पर्यटन शहर आहे. त्यामुळे येथे खड्डे असता कामा नये. रस्ते खड्डेमुक्त करण्यासाठी दीडशे कोटी रुपयांची गरज आहे. ऑक्टोबरला पालकमंत्री पुन्हा शहरात येणार असून संबंधितांशी चर्चा करून १५० कोटी रुपयांचा प्रस्ताव तयार केला जाईल. त्यावर मंत्रिमंडळ बैठकीत निर्णय होईल, असे त्यांनी सांगितले. शहरातील खड्डे बुजवल्यानंतर रस्त्यांची पाहणी करण्यासाठी आदित्य ठाकरे शहरात येणार आहेत. दिवसांत हे खड्डे बुजवले जावेत, असे त्यांनी स्पष्ट केले. आदित्य १० ऑक्टोबरला शहरात येऊ शकतात. मनपाच्या रस्त्यांची तपासणी क्वालिटी कंट्रोलद्वारे केली जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले. ग्रामीण भागातील रस्त्यांची तपासणीही ही यंत्रणा करणार आहे.

ठाकरे स्मारक, सफारी पार्कच्या पाहणीसाठी उद्धव येणार : एमजीएमपरिसरातील साडेसोळा एकर जागेवर स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक उभारण्यात येणार आहे. तेथील १०० झाडे तोडावी लागणार आहेत. ही झाडे तोडून तातडीने सपाटीकरण करावे, अशा सूचना त्यांनी पालिकेला दिल्या. प्रत्येकी दोन एकरांचे प्लॉट पाडले जाणार असून तेथे जिराफ, झेब्रा, हरिण, ससे हे प्राणी सोडले जातील, जेणेकरून तेथे शालेय विद्यार्थ्यांच्या सहली येतील. या स्मारकाच्या निमित्ताने आणखी एक पर्यटनस्थळ विकसित होईल, अशी योजना आहे. येत्या ऑक्टोबरपर्यंत पालिकेने सपाटीकरणाचे काम करायचे आहे. येथील १०० झाडे हर्सूल तलाव परिसरातील जांभूळवनात स्थलांतरित करायची आहेत. या स्मारकाची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ बैठकीत करणार आहेत. त्याचबरोबर मिटमिटा येथील सफारी पार्कच्या परिसरात अांबा, जांभूळ, काजूची मिळून २० हजार झाडे लावण्यात येतील. स्व. बाळासाहेब ठाकरे स्मारक सफारी पार्कच्या पाहणीसाठी १० ऑक्टोबरला उद्धव ठाकरे शहरात येऊ शकतात.

भूमिपूजनानंतर लगेच काम सुरू करा
निविदा प्रक्रिया झालेल्या औरंगाबाद-पैठण या रस्त्याच्या चौपदरीकरणाच्या कामाचे भूमिपूजन ऑक्टोबरला होणारआहे. भूमिपूजन झाल्यानंतर लगेच काम सुरू व्हायला हवे, असे निर्देश कदम यांनी रस्ते विकास महामंडळाला दिले.

डीपीसीच्या कामात सेना पदाधिकाऱ्यांची गडबड
सत्ता आल्यानंतर आपल्या कार्यकर्त्यांना कामे मिळावीत, दोन पैसे त्यांच्या खिशात जावेत यासाठी पालकमंत्र्यांनी तालुकाप्रमुखांमार्फत कार्यकर्त्यांना कामे देण्याचे सुचवले होते. तालुकाप्रमुखांनी नावे दिल्यानंतर कार्यकर्त्याला २५ लाखांपासून कोटी रुपयांपर्यंत ही कामे दिली गेली. कार्यकर्ते खुश झाले असतील, असे पालकमंत्र्यांना वाटले होते. परंतु ही कामे देताना सेनेच्याच स्थानिक नेत्यांनी कार्यकर्त्यांकडून कमिशन घेतल्याचा आरोप महापौर बंगल्यावर झालेल्या तालुकाप्रमुखांच्या बैठकीत करण्यात आला. यामुळे कदम कमालीचे चिडले होते. यापुढे कार्यकर्त्यांना कामे देताना स्वत: कदम, खासदार चंद्रकांत खैरे त्यांचे स्वीय सहायकच निर्णय घेतील, असे स्पष्ट झाले.
बातम्या आणखी आहेत...