आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • 16 Bikes Find In Police Checking In Aurangabad City

नाकेबंदी, कोम्बिंग ऑपरेशनमध्ये सापडल्या चोरीच्या १६ दुचाकी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
वाळूज - वाळूज महानगर परिसरात दिवसेंदिवस दुचाकी वाहने चोरीच्या घटना वाढत आहेत. याची धास्ती घेऊन पोलिस प्रशासन खडबडून जागे झाले असून पोलिसांनी शहरातील वर्दळीच्या ठिकाणी १३ ते २५ ऑगस्टदरम्यान विशेष नाकेबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबविले. यात चोरीच्या १६ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत. पोलिस आता दुचाकी मालकांचा शोध घेत आहेत.

वाहनांच्या मूळ कागदपत्रांची छाननी करून चोरीची वाहने जप्त करण्यासाठी ही मोहीम राबवण्यात येत असल्याचे सहायक पोलिस आयुक्त अविनाश आघाव यांनी स्पष्ट केले. या कारवाईदरम्यान वाळूज पोलिसांनी एक एमएटी दुचाकी, तर वाळूज एमआयडीसी पोलिसांनी तब्बल १५ दुचाकी जप्त केल्या. वाहनांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी प्रादेशिक परिवहन िवभागाशी पत्रव्यवहार करण्यात येत आहे.

विशेष कोम्बिंग ऑपरेशन
परिसरातील वाळूज एमआयडीसी व वाळूज पोलिस ठाण्याच्या हद्दीत १३,२३ व २५ ऑगस्ट रोजी पोलिस आयुक्तांच्या आदेशानुसार सहायक वाहतूक पोलिस, छावणी विभाग, गुन्हे शाखा आदींनी संयुक्त नाकेबंदी व कोम्बिंग ऑपरेशन राबवले. वाहनाची मूळ कागदपत्रे, वाहन चालविण्याचा परवाना आढळून न आल्यास सदरील वाहन जप्त करण्यात आले. वाळूज एमआयडीसी पोलिसांत जवळपास ७०० तर वाळूज पोलिसांत ३०० वाहने जमा करण्यात आली. यातील सोळा दुचाकी चोरीच्या असल्याचे आढळून आले.

कागदपत्रांची तपासणी
नाकेबंदीच्या वेळी ज्या वाहनधारकांकडे मूळ कागदपत्रे नव्हती त्यांना मूळ कागदपत्रे घेऊन पोलिस ठाण्यात बोलावण्यात आले. तेथे कागदपत्रांची खातरजमा करून त्यांची वाहने परत करण्यात आली. तसेच विनापरवाना वाहन चालवणाऱ्यांकडून दंडाची रक्कमही वसूल करण्यात आली.

वाहनाची मूळ कागदपत्रे सोबत बाळगा
चोरीचे वाहन विक्री करण्यासाठी चोरटे मध्यमवर्गीय नागरिकांना टार्गेट करत असल्याचे पोलिसांच्या तपासातून निष्पन्न झाल्यामुळे पोलिसांनी वाळूज महानगर परिसरात ही मोहीम राबवली. पोलिस कारवाईचा फटका कंपनीत जाणाऱ्या अनेक कामगारांना बसला. यापुढे वाहन चालवताना मूळ कागदपत्रे सोबत बाळगण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे. यादरम्यान परिसरातून तब्बल १६ चोरीची वाहने सापडली. या वाहनांचे मूळ मालक अद्याप समोर आले नाहीत.
मूळ मालकांनी पुढे यावे
सदरची कारवाई चोरीचे वाहन खरेदी-विक्रीवर पायबंद घालण्याच्या हेतूने करण्यात आली. वाळूज एमआयडीसी पोलिसांना १६ दुचाक्या सापडल्या. त्या सोडवून घेण्यासाठी कोणीच समोर आले नाही. सदरील वाहनधारकांच्या मूळ मालकांचा शोध घेण्यासाठी आम्ही आरटीओ कार्यालयाशी पत्रव्यवहार केला आहे. परिसरातील वाहन चोरीला गेलेल्या मूळ मालकांनी पोलिस ठाण्यात येऊन वाहनांची खातरजमा करून घ्यावी. संजय आहिरे, पोलिस उपनिरीक्षक