आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोम्बिंगने घेतला निष्पापाचा बळी; १७ वर्षांच्या मुलाची आत्महत्या !

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद वाळूज - शहरातील गुन्हेगारीला आळा बसवण्यासाठी पोलिसांनी दोन दिवसांपूर्वी केलेल्या कोम्बिंंग ऑपरेशनमुळेे एका १७ वर्षीय निष्पाप मुलाचा बळी गेला. पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांनी आदेश देऊनही वाळूज पोलिस ठाण्यातील कर्मचाऱ्यांनी या मुलाच्या वडिलांना सोडण्यात दिरंगाई केली. त्यामुळे बदनामीच्या भीतीने नैराश्यग्रस्त झालेल्या या मुलाने जीवन संपवले. दरम्यान, आत्महत्येस दोषी असलेल्यांची चौकशी करण्याचे आयुक्तांनी जाहीर केले.
२५ वर्षांपूर्वी हाणामारीचे दोन गुन्हे दाखल असलेल्या हरिश्चंद्र नाडे (५३, रा. जिकठाण) यांना पोलिसांनी त्यांना सोमवारी रात्री कोम्बिंंग ऑपरेशनमध्ये घरातून उचलले. मात्र, ते सऱ्हाईत गुन्हेगार नसल्यामुळे पोलिस आयुक्तांनी त्यांना सोडून देण्याचे मंगळवारी सकाळीच आदेश दिले होते. पण वाळूज पोलिस ठाण्याने त्यांना सोडण्यात दिरंगाई केली. नाडे यांचा १७ वर्षीय मुलगा सागर ऊर्फ अमोल माझ्या वडिलांना सोडा, अशी पोलिसांकडे गयावया करत होता. मात्र, पोलिसांनी त्यालाच शिवीगाळ केली. या घटनेमुळे नातेवाईक आणि स्थानिकात कुटुंबाची बदनामी झाली, असे त्याला वाटू लागले. आणि त्याने थेट जिकठाण परिसरात असलेल्या एका विहीरीत उडू मारून जीव दिला. वाळूज ठाण्यातील शिरसाट, बोरडे, पडवळ या कर्मचाऱ्यांनी शिवीगाळ केल्याचा आरोप अमोलचा भाऊ गणेशने केला आहे. बुधवारी दुपारी दोनच्या सुमारास जिकठाण येथे अमोलच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. या वेळी परिसराला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते.

विहिरीत आढळला मृतदेह : जिकठाणगावालगतच्या गट क्र.२१४ मधील भास्कर नाडे यांच्या शेतममळ्यातील विहिर पोलिसांनी गाठली. तेव्हा दुचाकी उभी करून त्याने विहिरीत उडी घेतल्याचे स्पष्ट झाले. विहिरीला पाणी असल्याने अग्निशमन दलास बोलावण्यात आले. मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास मृतदेह काढण्यात आला. पोलिसांनी अमोलचा मृतदेह घाटी शासकीय रूग्णालयात हलविला. बुधवारी सकाळी सव्वा दहाच्या सुमारास उत्तरीय तपासणीनंतर पार्थिव मोठ्या बंदोबस्तात अमोलच्या घरी नेण्यात आले.

अंत्यसंस्कारास नातलगांचा नकार : अमोलचामृतदेह घरी आणल्यानंतर ‘ज्या पोलिसांनी हरिश्रृंद्र नाडे यांना नेले होते,त्या पोलिसांविरूध्द कार्यवाही करा.त्यानंतरच अमोलवर अंत्यसंस्कार करण्यात येतील,’अशी भुमिका नातलगांनी घेतल्याने तणाव निर्माण झाला .तब्बल तीन तास नातलगांची पोलिसांनी विनवणी करून अंत्यसंस्कार करण्यास राजी करण्याचा प्रयत्न केला. पंढरपूरचे सामाजिक कार्यकर्ते संजय मिसाळ, राजू अहिरे, मारूती गायकवाड, सरपंच नवाज पटेल, महात्मा गांधी तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष बालचंद बोडखे, रतन बत्तिसे यांनी पोलिस उपायुक्त वसंत परदेसी यांची भेट घेऊन पोलिसांविरुद्ध तक्रार दाखल करून घेण्याची विनंती केली. ती त्यांनी मान्य केल्यावर नातलगांनी माघार घेतली.

आयुक्तांनी केले सांत्वन : बुधवारीदुपारी दोनच्या सुमारास अमितेशकुमार यांनी वाळूज पोलिस ठाण्यात हरिशचंद्र नाडे यांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. एमआयडीसी वाळूज पोलिस ठाण्याचे निरीक्षक रामेश्वर थोरात चौकशी करून चार दिवसात अहवाल देतील. त्यानंतर दोषींविरुद्ध कारवाईचेआश्वासनही त्यांनी दिले. दरम्यान, या घटनेची निष्पक्ष चौकशी व्हावी, अशी मागणी डेमोक्रेटिक पार्टी ऑफ इंडीयांचे सुरेश चव्हाण यांनी आयुक्तांकडे केली.

मित्रांनी चिडवले म्हणून...
^अमोल पेट्रोलपंपावर कामाला असल्याने मला चांगला परिचित हाेता. त्याने माझी भेट घेतली असती, तर आज ही घटना घडलीच नसती. वडिलांना पोलिसांनी नेल्यामुळे त्याच्या काही टवाळखोर मित्रांनी त्याला चिडवले. म्हणून त्याची मन:स्थिती बिघडली असावी. सी.एम.तांबडे,प्रभारीपोलिस निरीक्षक, वाळूज.

तो बारावीत शिकत होता
नाडे कुटुंब जिकठाण झोपडपट्टीत राहते. नाडे गवंडीकाम करतात. त्यांना तीन मुले एक मुलगी. शिक्षणाची अावड असलेला अमोल सर्वात लहान होता. तो इयत्ता १२ वीत शिकत होता.

२५ वर्षांपूर्वीचे गुन्हे
१९९० मध्ये हरिश्चंद्र नाडे यांच्याविरुद्ध वाळूज पोलिस ठाण्यात भादंवि कलम ३२५ चे दोन गुन्हे नोंद आहेत. वाळूज पोलिसांनी जून रोजी मध्यरात्री कोम्बिंंग ऑपरेशन राबवले. पहाटे तीनच्या सुमारास वाळूज भागातून १५ जणांना उचलले. जून रोजी पोलिस आयुक्तांनी स्वत: नाडेंची चौकशी करून त्यांना सोडून देण्याचे आदेश दिले. त्यानंतर नाडे यांना पोलिस वाहनातून वाळूज पोलिस ठाण्यात आणून डांबण्यात आले.

वडिलांना सोडा नाहीतर जीव देतो
वडिलांना अटक झाल्याने अमोलने रागाच्या भरात वाळूज पोलिस ठाणे गाठले. सकाळी साडेआठच्या सुमारास पोलिसांची भेट घेतली. त्यांना तो म्हणाला, वडिलांच्या नावावर जे गुन्हे नोंद आहेत ते खूप जुने आहेत. त्यानंतरच्या काळात त्यांच्या हातून कोणताही गुन्हा घडलेला नाही. त्यामुळे त्यांना सोडून द्या, अशी विनवणी त्याने केली. त्यावर पोलिसांनी नकार दिला. त्यामुळे संतापलेला अमोल आत्महत्येची धमकी देऊन ठाण्याबाहेर पडला. काही वेळानंतर अमोलने विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचे कळताच गडबडलेल्या पोलिसांनी नाडे यांना सोडून दिले.

कोटा पूर्ण करण्यासाठी
पोलिस आयुक्तांनी सराईत आणि दोन गंभीर गुन्हे असलेल्या आरोपींना ताब्यात घेण्याचे आदेश दिले होते. नाडेंवर भाऊबंदकीच्या वादातून गुन्हे दाखल होते. मागील पाच वर्षांपासून त्यांच्यावर कुठल्याही नवीन गुन्ह्याची नोंद नव्हती. मात्र, आयुक्तांचा २० गुन्हेगार आणण्याचा कोटा पूर्ण करण्यासाठी नाडेंना उचलले, असे नातेवाइकांचे म्हणणे आहे. बुधवारी सकाळी घाईघाईत शवविच्छेदन करण्यात आले. उपायुक्त, सहायक उपायुक्तांसह मोठा फौजफाटा घाटीत तैनात करण्यात आला होता. विशेष म्हणजे अमोलचे नातेवाईक असतानादेखील त्याचा मृतदेह पोलिसांनी ताब्यात घेऊन जिकठाण येथे नेला. या प्रकरणाची अधिक चर्चा होऊ नये यासाठी पोलिसांची धावपळ सुरूच होती.
बातम्या आणखी आहेत...