आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पैठण रोडवरील शंभर वर्षे जुन्या 175 खोडांचे पुनर्रोपण होणार

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - पैठणरोडवरील महानुभाव आश्रम ते कांचनवाडी हा अडीच किलोमीटरचा पट्टा घनदाट वृक्षांनी चिंचोळा झाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून हा रस्ता मोठा करण्याचा प्रस्ताव या वृक्षांमुळे लांबला होता. याबाबत विभागीय आयुक्तांच्या दालनात वृक्षसंवर्धन समितीसह सा.बां.विभागाची बैठक झाली. वादळी चर्चेनंतर आयुक्तांनीच मार्ग काढला. विकासासाठी ही जुनी झाडे कापावी लागली तरी खोडांचे सुरक्षित जागी स्थलांतर करून पुनर्रोपण करावे, असा प्रस्ताव सर्वांनी मान्य केल्याने पैठण रोडच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.
 
शनिवारी विभागीय आयुक्त पुरुषोत्तम भापकर यांच्या दालनात पैठण रस्ता रुंदीकरणाबाबत बैठक झाली. त्यात या रस्त्यावरील वड, पिंपळ, चिंच, उंबर अशी शंभर ते दीडशे वर्षे जुनी झाडे कापावी लागणार, असे सा. बां. विभागाने सांगितले. मात्र वृक्षसंवर्धन समितीने त्यास प्रखर विरोध केला. या वेळी विभागीय वनसंरक्षक अशोक गिरपुजे, मानद वन्यजीव तज्ज्ञ डॉ. दिलीप यार्दी, पक्षिमित्र डॉ. किशोर पाठक यांच्यासह मनपाचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. बीड बायपासवरील दहा हजार झाडे तोडली. मात्र रस्ते विकास महामंडळाने ती लावली नाहीत, असा गंभीर आक्षेप डॉ. किशोर पाठक यांनी घेतला. त्यामुळे या जुन्या झाडांच्या फांद्या तोडून त्यांची खोडे स्थलांतरित करून दुसरीकडे लावावीत, अशी सूचना आयुक्त भापकर यांनी केली.
 
स्थलांतराचा खर्च सा.बां.विभाग करणार : यारस्त्यावरील १७५ झाडे रस्ता रुंदीकरणासाठी कापण्याची अनुमती वृक्षसंवर्धन समितीने दिली. या वृक्षांच्या खोडांचे स्थलांतर आणि पुनर्रोपण करण्यावर सर्वांचे एकमत झाले. खोडांच्या पुनर्रोपणाचा खर्च सा.बां.विभाग करणार आहे. त्या मोबदल्यात दुप्पट झाडे शहरात इतरत्र ठिकाणी सा.बां. विभागाने लावावीत, असाही प्रस्ताव मंजूर करण्यात आला.
 
स्थलांतराचा खर्च मोठा..
वृक्षसंवर्धन समितीने जरी या वृक्षतोडीला परवानगी दिली असली तरी सा.बां. विभागाने दुप्पट झाडे लावली पाहिजेत याकडे लक्ष दिले पाहिजे. कारण खोडे स्थलांतराचा खर्च मोठा आहे. तीन मोठ्या खोडांच्या स्थलांतराचा खर्च किमान दीड लाख रुपये येतो.
- डॉ.किशोर पाठक, पक्षिमित्र
 
वृक्षसंपत्ती जपली जाईल
पैठणरोडवरील१७५ पेक्षा जुनी झाडे शहराच्या विकासासाठी तोडली जाणार आहेत. पण त्या बदल्यात त्याच्या दुप्पट झाडे शहरातील दोन-तीन ठिकाणे ठरवून लावली जातील. तसेच खोडांचे पुनर्रोपणही केले जाईल.
- अशोक गिरपुजे, मुख्य वनसंरक्षक
बातम्या आणखी आहेत...