आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन दिवाळीत कोंडी: 2600 पैकी 1900 एसटी कर्मचारी संपावर; 500 पैकी 497 बसेस स्थानकातच उभ्या

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
औरंगाबाद - ऐन दिवाळीत वेतनवाढीसह विविध मागण्यांसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी सोमवारी मध्यरात्रीपासून संप पुकारलेल्या संपात औरंगाबाद विभागातील २६०० पैकी १९०० कर्मचारी सहभागी झाले असून ५०० पैकी केवळ तीन बस मध्यवर्ती बसस्थानकातून पुणे, बऱ्हाणपूर आणि सोलापूरसाठी रवाना होऊ शकल्या. सिडको बसस्थानकातून एकही बस बाहेर पडली नाही.
 
उर्वरित ४९७ बस जागेवरच उभ्या होत्या. यामुळे २३ हजारांवर प्रवाशांचे हाल झाले. त्यांना खासगी वाहनातून मनमानी भाडे देऊन प्रवास करावा लागला. तसेच महामंडळाला ६० लाखांच्या वर आर्थिक नुकसान झाल्याची नोंद घेण्यात आली आहे. एसटी महामंडळ कर्मचारी संघटनेची कृती समिती आणि सरकार यांच्यात १६ ऑक्टोबर रोजी वेतनवाढीची चर्चा निष्फळ ठरली. त्यामुळे कर्मचाऱ्यांनी सोमवारी रात्री १० वाजेपासूनच संपाला सुरुवात केली. त्यामुळे मध्यवर्ती सिडको बस स्थानकातून मध्यरात्रीपासून बस धावणे कायमचे बंद झाले ते दुसऱ्या दिवशी मंगळवारीही तिच स्थिती कायम होती. पोलिस, आरटीओ पथकाच्या मदतीने सकाळी केवळ तीन बस सोडण्यात आल्या. याची माहिती संपकरी कर्मचाऱ्यांना मिळताच त्यांनी सर्वांनी एकत्रित येऊन बसस्थानकातील बस, खासगी वाहनातून प्रवाशी वाहतूक बंद पाडली. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर दिवसभर बंद पाळण्यात आला. संपामुळे एका दिवसांत ६० लाखांचे नुकसान झाल्याचे विभाग नियंत्रक आर. एन. पाटील यांनी सांगितले. 
 
संपात सहभागी होणाऱ्यांना बांगड्या भेट : ९७ टक्के कर्मचारी संपात सहभागी झालेले आहेत. उर्वरित तीन टक्के कर्मचारी हे मोठ्या अधिकाऱ्यांचे काम पाहतात. त्यांनी कामावर येणे पसंत केले. अशा कर्मचाऱ्यांना संपकरी कर्मचाऱ्यांनी बांगड्या भेट देण्याचा प्रकारही घडला. 
 
बसस्थानकातील खासगी वाहने बाहेर काढली : संप मोडून काढण्यासाठी गृह विभागाने खासगी वाहनातून प्रवासी वाहतुकीची परवानगी दिली. दिवाळीत प्रवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून आदेशाची कठोर अंमलबजावणी करावी, असे निर्देश आरटीओ पोलिसांना दिले होते. त्यामुळे मध्यरात्रीपासूनच स्कूल बस, काळी पिवळी, कंपनीच्या बसेस आदी वाहनधारकांनी प्रवासी वाहतुकीला सुरुवात केली. बसस्थानकात खासगी वाहन लावून सेवा देण्याचा प्रयत्न झाला. यासाठी आरटीओचे पथक उपस्थित होते. मात्र, संपकरी कर्मचाऱ्यांनी हा डाव हाणून पाडला. पोलिस, एसटी अधिकाऱ्यांना ही बाब माहिती नव्हती यामुळे आरटीओ, पोलिसांत खडाजंगी झाली. त्यात संतप्त कर्मचाऱ्यांनी तोडफोडीसाठी दगड उचलले. त्यामुळे बसस्थानकातून सर्व खासगी वाहने बाहेर काढली. 
 
मराठवाड्याची स्थिती : हजारांवर बस, १९ हजार कर्मचारी, सुमारे कोटींचे आर्थिक नुकसान. 
 
संप सुरूच राहणार 
न्याय मागण्यांसाठी चालक, वाहक, अधिकारी, कर्मचारी संपावर गेले आहेत. जोपर्यंत न्याय मिळणार नाही तोवर संप सुरूच राहील. आम्ही लोकशाही मार्गाने संप करत आहोत. सुरेश जाधव, राज्य संघटक सचिव, इंक. 

सिटी बसचे साडेदहा लाखांचे नुकसान 
एसटीमहामंडळाच्या वतीने सिटी बस सेवा दिली जाते. मात्र, संपामुळे सिटी बससेवा ठप्प होती. त्यामुळे १०.५० लाख रुपये आर्थिक नुकसान झाले आहे. तसेच प्रवाशांना अतिरिक्त भाडे देऊन प्रवास करावा लागला. 
 
भाडे आकारणी अशी 
बसभाडे ६४ रुपये, खासगी जालना १५० ते २०० रुपये होते. तर बीड, लातूर, परभणी, हिंगोली आदी भाडे दुपटीने वाढवले होते. मेहकर, अकोला, नागपूर, वाशीम, शेगाव, चिखली, बुलडाणा, पुणे, कोल्हापूर, सोलापूर, तुळजापूर, आदी लांब पल्ल्याच्या मार्गावरील प्रवाशांना नाइलाजास्तव खासगी ट्रॅव्हल्सने ३० ते ४० टक्के अधिक भाडे देऊन प्रवास करावा लागला. 
 
कामावर येऊ इच्छिणाऱ्यांना पोलिस संरक्षण 
एसटीच्या ज्या चालक, वाहक इतर कर्मचाऱ्यांना या संपात सहभागी होता काम करण्याची इच्छा असेल, अशा कर्मचाऱ्यांना संरक्षण देऊ. अव्वाच्या सव्वा भाडे आकारणाऱ्या खासगी वाहनांवर कारवाई करू.’ 
- अारती सिंह, पाेलिस अधीक्षक 
 
दिवाळीच्या सुटीसाठीपुसद गावी जायचे आहे. नाशिक येथून खासगी वाहनाने धक्के खात औरंगाबादेत आलो. येथेही तीच स्थिती असल्याने नियोजन हुकले. दुप्पट भाड्यावर खर्च झाला. 
- ओंकार राठोड, प्रवासी, पुसद 
 
एसटी कर्मचाऱ्यांनीसंप पुकारला याची माहितीच नव्हती. सकाळी वाजेपासून बसची वाट पाहत बसलो. शेवटी बस धावणार नसल्याचे कळले. पाच तासांपासून प्रतीक्षा करावी लागली. 
- मादनी शहा, प्रवासी घनसावंगी. 
 
खासगी वाहनधारकांकडून प्रवाशांची लूट 
दिवाळीसाठीगावी निघालेल्या प्रवाशांची दोन्ही बसस्थानकांत प्रचंड गर्दी होती. संपामुळे बस धावणार नसल्याने त्यांना खासगी वाहने शोधावी लागली. पाच हजारांवर खासगी वाहनधारकांनी प्रवाशांना मनमानी पद्धतीने दुप्पट तिप्पट आकारलेले भाडे देऊन त्यांना प्रवास करावा लागला. परंतु ज्यांना हे भाडे परवडत नाही, ते पाच ते सात तास बसस्थानकात खोळंबून राहिले. 
बातम्या आणखी आहेत...